जादा दराने किराणा विकणाऱ्यांवर कारवाई होणार ः  जिल्हाधिकारी डॉ.ढाकणे

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 1 एप्रिल 2020

एखाद्याने स्वत:च्या जास्तीच्या फायद्यासाठी भाववाढ केली असेल तर त्याला सुरवातीला कडक शब्दात समज देण्यात येईल. तरी देखील चढ्या भावाने विक्री सुरू असल्यास संबंधित विक्रेत्यावर कारवाई करावी. 

जळगाव  : "कोरोना'मुळे सर्वच लॉकडाऊन आहे. जगावर संकट आले असताना व्यापाऱ्यांनी ग्राहकांना जादा दर लावू नये. अनेक किराणा दुकानदार, व्यापारी जादा दर लावून जीवनावश्‍यक वस्तूंची विक्री करतात अशा तक्रारी जिल्हा प्रशासनाकडे आल्या आहेत. जादा दर लावणाऱ्या व्यापाऱ्यांकडे केव्हाही डमी ग्राहक पाठवू, पंचनामा करून लागलीच जीवनावश्‍यक वस्तू कायद्याप्रमाणे कारवाई करू, असा इशारा जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांनी व्यापाऱ्यांना दिला. 

जळगाव शहरासह जिल्ह्यात काही विक्रेते चढ्या दराने किराणा मालाची विक्री करीत असल्याच्या तक्रारी जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांकडे आल्या होता. तोच धागा पकडत माहिती अधिकार कार्यकर्ते दीपक गुप्ता यांनी विविध साहित्यांचे कमीत कमी आणि जास्तीत जास्त दर ठरविण्यात यावेत, अशी मागणी केली होती. 

यामुळे जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सूर्यवंशी यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जळगाव जिल्हा व्यापारी असोसिएशन, दाणाबाजार व्यापारी असोसिएशन यांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. 

अप्पर जिल्हाधिकारी डॉ. नंदकुमार बेडसे, निवासी उपजिल्हाधिकारी वामन कदम, जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सुर्यवंशी, जिल्हा व्यापारी महामंडळाचे उपाध्यक्ष अनिल कांकरिया, सचिव ललित बरडीया, दाणा बाजार व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष प्रवीण पगारिया, उपाध्यक्ष अशोक धूत, तेल असोसिएशनचे अध्यक्ष राजेश मेहता उपस्थित होते. 

यावेळी व्यापाऱ्यांना तक्रारींची माहिती देण्यात आली. त्यावर व्यापारी म्हणाले. जर भाववाढ करायचीच असती तर सर्वच वस्तूंची केली असती. परंतु आता केवळ तेलाची भाववाढ झाली आहे. तेलाचे भाव सगळीकडेच वाढले आहेत. ज्या ज्या वस्तू आयात होतात, त्या वस्तूंचे भाव वाढले आहेत. 

जिल्हाधिकारी डॉ.ढाकणे यांनी सांगितले की, व्यापाऱ्यांना कमीत कमी भाव वा जास्तीत जास्त भाव असे ठरवून देता येणार नाही. कारण भाव हा नेहमी बदलत राहतो. मात्र व्यापाऱ्यांनी सामाजिक दृष्टिकोन ठेवून ग्राहकांची लूट करू नये. 

व्यापारी म्हणाले, की व्यापाऱ्यांनी स्वतः भाववाढ केलेली नाही, तरीही एखाद्याने स्वत:च्या जास्तीच्या फायद्यासाठी भाववाढ केली असेल तर त्याला सुरवातीला कडक शब्दात समज देण्यात येईल. तरी देखील चढ्या भावाने विक्री सुरू असल्यास संबंधित विक्रेत्यावर कारवाई करावी. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon Extra-rate grocery retailers will take action: District Collector order