अखेर "डायलिसिस' पूर्ववत सुरू; रूग्णांना दिलासा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 18 मे 2020

"सकाळ'ने वृत्त प्रकाशित केल्यानंतर प्रशासनाने याची दखल घेत "डायलिसिस' सेंटर सुरू करण्याचे आदेश दिले. यानंतर आजपासून हे सेंटर सुरू करण्यात आले आहे. यामुळे रूग्णांना दिलासा मिळाला आहे. 

जळगाव : किडनीचे विकार असलेल्या रुग्णांना "डायलिसिस' करणे आवश्‍यक असते. शहरात बोटावर मोजण्याइतकीच डायलिसिस केंद्र आहेत. त्यातही महापालिकेच्या शाहू रुग्णालयातील "डायलिसिस सेंटर' बंद करण्यात आल्यामुळे रुग्णांचे हाल होत होते. यासंदर्भात "सकाळ'ने वृत्त प्रकाशित केले होते. या वृत्ताची दखल घेत प्रशासनाने आदेश देताच रुग्णालयातील सेंटर आजपासून (ता. 18) सुरू करण्यात आले आहे. यामुळे तपासणीसाठी येणाऱ्या रुग्णांची सोय झाली आहे. 
"कोरोना'च्या वाढत्या प्रादुर्भावामुळे महापालिकेचे शाहू रुग्णालयात "क्‍वारंटाइन' कक्ष करण्यात आले आहे. जळगाव पीपल्स को.-ऑप. बॅंकेने चालविण्यासाठी घेतल्यानंतर यात "डायलिसिस सेंटर' रेड स्वस्तिकमार्फत रुग्णांसाठी सवलतीच्या दरात चालविण्यात येत आहे. अर्थात शहरातील इतर खासगी सेंटरच्या तुलनेत येथे निम्म्या दरात उपचार केले जातात. यामुळे रुग्णांसाठी हे परवडणारे आहे. मात्र, गेल्या दोन महिन्यांपासून शाहू रुग्णालय "क्‍वारंटाइन' कक्ष करण्यात आल्याने येथे क्‍वारंटाइनची संख्या वाढत असल्याने येथील "डायलिसिस' सेंटर बंद करण्यात आले होते. परिणामी, येथे येणाऱ्या रुग्णांना इतरत्र जावे लागत होते. याबाबत "सकाळ'ने वृत्त प्रकाशित केल्यानंतर प्रशासनाने याची दखल घेत सेंटर सुरू करण्याचे आदेश दिले. यानंतर आजपासून हे सेंटर सुरू करण्यात आले आहे. 

रुग्णांना दिलासा 
शाहू रुग्णालयातील डायलिसिस सेंटर बंद करण्यात आल्याने अनेक रुग्णांचे हाल होत होते. याबाबत वृत्त प्रकाशित झाल्यानंतर जिल्हा प्रशासनाने महापालिकेच्या आरोग्य विभागाला सूचना दिल्या. त्यानुसार शाहू रुग्णालयाचे डॉ. राम रावलानी यांनी तत्काळ रुग्णांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी डायलिसिस सेंटर सुरू करण्याचे आदेश दिले. यानंतर आजपासून सेंटर सुरू झाले असून, आजच्या दिवशी पाच रुग्णांनी येऊन येथे तपासणी केली. अर्थात यात "कोरोना'च्या पार्श्‍वभूमीवर "डायलिसिस' घेणाऱ्या रुग्णांचा त्रास टाळण्यासाठी प्रशासनाने लागलीच दखल घेतली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon Finally comfort the patients; "Dialysis' resumes