राज्य शासनांतर्गत जळगावची पहिलीच लॅब 

अमोल कासार
Monday, 25 May 2020

जळगाव जिल्ह्यात "कोरोना'चे मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळून येत आहेत. "कोरोना'ग्रस्तांची चाचणी करण्यासाठी त्यांचे नमुने तपासणीसाठी औरंगाबाद, धुळे व पुणे येथे पाठविले जात होते. मात्र, याठिकाणाहून अहवाल येण्यास विलंब होत असल्याने हे अहवाल अनेक दिवस प्रलंबित राहत होते.

जळगाव : "कोरोना'चे लवकर निदान व्हावे, यासाठी जळगाव शासकीय महाविद्यालयात लॅब कार्यान्वित झाली आहे. या ठिकाणी "कोविड'ची चाचणी केली जात आहे. देशभरातील सर्व लॅब केंद्र शासनाच्या अखत्यारित आहेत. मात्र, जळगावात सुरू झालेली राज्य शासनाच्या अखत्यारितील पहिलीच लॅब ठरलीय. 
जळगाव जिल्ह्यात "कोरोना'चे मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळून येत आहेत. "कोरोना'ग्रस्तांची चाचणी करण्यासाठी त्यांचे नमुने तपासणीसाठी औरंगाबाद, धुळे व पुणे येथे पाठविले जात होते. मात्र, याठिकाणाहून अहवाल येण्यास विलंब होत असल्याने हे अहवाल अनेक दिवस प्रलंबित राहत होते. यासाठी राज्य शासनाने पुढाकार घेत राज्यातील सहा जिल्ह्यांमध्ये कोरोना टेस्ट लॅब उभारणीला मंजुरी दिली होती. यामध्ये जळगावचा देखील समावेश असल्याने जळगावात देखील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कोरोना तपासणीसाठी अत्याधुनिक लॅब सुरू झाली आहे. याठिकाणी दिवसाला सुमारे 130 पेक्षा अधिक नमुन्यांची तपासणी केली जाणार आहे. त्यामुळे प्रलंबित अहवालामुळे जळगावातील रुग्णांचे तत्काळ निदान होऊन उपचार करण्यास सोईस्कर होणार आहे. 

दोन आठवड्यात सज्ज 
राज्यात कोरोनाचे रुग्ण अधिक असल्याने चंद्रपूर, गोंदिया, लातूर, बारामती, नांदेड व जळगाव या सहा जिल्ह्यांमध्ये लॅब तयार करण्यास मंजुरी दिली होती. नंतर तत्काळ जळगावात दोन आठवड्यात अत्याधुनिक लॅबचे काम पूर्ण करण्यात आले. यानंतर गेल्या दोन दिवसांपासून याठिकाणी कोविडची तपासणी देखील केली जात आहे. जिल्ह्यात कोरोनाचे अधिक रुग्ण आढळून येत असल्याने चंद्रपूर येथे देण्यात येणारी मशिन जळगावात मिळाल्याने लॅब देखील तत्काळ सुरू झाली. त्यामुळे राज्य शासनाची पहिली कोरोना चाचणीची लॅब जळगावात सुरू झाली आहे. 

तंत्रज्ञांची आवश्‍यकता 
जळगावात सुरू झालेल्या लॅबमध्ये आरटीपीसीआर ही अत्याधुनिक अशी कोरोना तपासणीची यंत्रणा दाखल झाली आहे. सध्या दोन शिफ्टमध्ये नमुना तपासणीचे काम सुरू असून,,तीन तज्ज्ञ डॉक्‍टर व केवळ 8 तंत्रज्ञांच्या मदतीने दोन शिफ्टमध्ये तपासणीचे काम सुरू आहे. मात्र, तिसऱ्या शिफ्टसाठी अजून तंत्रज्ञांची आवश्‍यकता आहे. 
 
एका तपासणीला साडेतीन तास 
या प्रयोगशाळेंतर्गत चार लहान प्रयोगशाळा असून, 22 यंत्रांवर "कोरोना'ची तपासणी केली जाते. एका नमुन्याच्या तपासणीसाठी सुमारे साडेतीन तास वेळ लागत असल्याने तीन शिफ्टमध्ये 130 पेक्षा अधिक नमुन्यांची तपासणी केली जात आहे. तंत्रज्ञांची उपलब्धता व कामाच्या सरावातून ही गती आणखी वाढू शकेल व 24 तासात 150 नमुने तपासले जाऊ शकतील, असेही सूत्रांनी सांगितले. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon first corona lab in state goverment