खानदेशातील कोरोनाचा पहिला पॉझिटीव्ह जळगावात

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 28 मार्च 2020

परदेशातून किंवा पुणे, मुंबई येथून आलेले संशयीत आढळून आले होते. जळगाव जिल्ह्यातून आतापर्यंत संशयीत रूग्णांची संख्या 44 होती. यातील पहिला 45 वर्षीय पॉझिटीव्ह रूग्ण जळगाव शहरातून आढळून आला आहे. 

जळगाव : जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. यात जळगावात आतापर्यंत संशयीत रूग्णांची संख्या वाढत असताना खानदेशातील पहिला पॉझिटीव्ह रूग्ण जळगावातून आढळला आहे. यामुळे आता आरोग्य प्रशासनाची कसोटी लागणार आहे. 
जगात कोरोना व्हायरसची अनेकांना लागण झाली आहे. राज्यात महाराष्ट्र आणि पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रसार झाला होता. परंतु जळगावात अद्यापर्यंत पॉझिटीव्ह रूग्ण आढळून आलेला नव्हता. परदेशातून किंवा पुणे, मुंबई येथून आलेले संशयीत आढळून आले होते. जळगाव जिल्ह्यातून आतापर्यंत संशयीत रूग्णांची संख्या 44 होती. यातील पहिला 45 वर्षीय पॉझिटीव्ह रूग्ण जळगाव शहरातून आढळून आला आहे. 

मुंबई- जळगाव ट्रॅव्हल्स्‌वर चालक 
कोरोना पॉझिटीव्ह आढळून आलेला रूग्ण जळगाव शहरातील रहिवासी असून, तो एका ट्रॅव्हल्स्‌ एजन्सीत चालक म्हणून कामाला आहे. जळगाव- मुंबई अशी सेवा करत आहे. दरम्यान मुंबई येथे राहिल्यानंतर सदरचा रूग्ण जळगावात आल्यानंतर 27 मार्चला जिल्हा रूग्णालयात तपासणीसाठी गेला होता. त्यांचे नमुने तपासणीसाठी पुणे येथे पाठविण्यात आले होते. जिल्हा आरोग्य यंत्रणेकडून पाठविण्यात आलेल्या नमुन्यांपैकी तीन जणांचे अहवाल आज (ता.28) सायंकाळी प्राप्त झाले. यातील 45 वर्षीय इसमाचे नमुने पॉझिटीव्ह आल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. त्या रूग्णास जिल्हा रूग्णालयातील आयसोलेट कक्षात ठेवण्यात येणार आहे. 

कुटूंबाचीही होणार तपासणी 
पॉझिटीव्ह आढळून आलेल्या रूग्णाच्या कुटूंबियांची देखील तपासणी करून त्यांना आयसोलेट करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे पॉझिटीव्ह आलेल्या रूग्णाचा आणखी किती जणांशी संपर्क झाला; याचा शोध घेणे सुरू असल्याचे जिल्हा आरोग्य प्रशासनातर्फे सांगण्यात आले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon first corona positive patient today khandesh