esakal | प्रथमच गुढीपाडव्याला सुवर्णनगरी बंद 
sakal

बोलून बातमी शोधा

gold_silver

सुवर्ण प्रतिष्ठानांसह सर्वच व्यावसायिकांनी या "लॉकडाउन'ला उत्स्फूर्त प्रतिसाद देत, गांभीर्य दाखवले. जीवनावश्‍यक वस्तू वगळता सर्वच दुकाने बंद असल्याने बाजारपेठेतील 20-25 कोटींची उलाढाल आज ठप्प होती. 

प्रथमच गुढीपाडव्याला सुवर्णनगरी बंद 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

जळगाव : देशावर भीषण संकट घेऊन आलेल्या "कोरोना' संसर्गाने इतिहासात प्रथमच गुढीपाडव्यासारखे साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त वाया गेला. देशभरात प्रसिद्ध असलेली जळगावची सुवर्णनगरी आज बंद होती, त्यामुळे सोन्या-चांदीसह बाजारपेठेतील वीस कोटींचे व्यवहार आज ठप्प होते. 

हिंदू पंचांगातील महत्त्वपूर्ण अशा साडेतीन मुहूर्तांना ही सुवर्ण बाजारपेठ ग्राहकांनी फुलून जाते. चैत्र शुद्ध प्रतिपदा असो, लक्ष्मीपूजन, कार्तिक प्रतिपदा म्हणजे बलिप्रतिपदा असो की अर्धा मुहूर्त असलेला अक्षय्य तृतीयेचा सण. या सर्व साडेतीन मुहूर्ताला सोन्याच्या खरेदीचे महत्त्व अबाधित. दरवर्षी या सणांना सुवर्णबाजारपेठेत ग्राहकांची मोठी गर्दी होते. 

"लॉकडाउन'ने मुहूर्त वाया 
यंदाच्या गुढीपाडवा कोरोनाचे सावट घेऊन आला. घरगुती वातावरणात हा उत्सव साजरा करताना नागरिकांनी घराबाहेर येण्याचे टाळले. सर्वत्र लॉकडाउन असल्यामुळे बाजारपेठ बंद होती. सोन्या-चांदीची दुकानेही बंद होती. इलेक्‍ट्रॉनिक वस्तू, वाहन खरेदीसाठीही हा मुहूर्त साधला जातो. घर, फ्लॅट व प्लॉटची खरेदीही केली जाते. मात्र, यंदा तसे काहीच झाले नाही. सुवर्ण प्रतिष्ठानांसह सर्वच व्यावसायिकांनी या "लॉकडाउन'ला उत्स्फूर्त प्रतिसाद देत, गांभीर्य दाखवले. जीवनावश्‍यक वस्तू वगळता सर्वच दुकाने बंद असल्याने बाजारपेठेतील 20-25 कोटींची उलाढाल आज ठप्प होती.