गाळेधारकांकडून उपायुक्तांना दुकानात कोंडण्याचा प्रयत्न 

गाळेधारकांकडून उपायुक्तांना दुकानात कोंडण्याचा प्रयत्न 

जळगाव  : महापालिकेच्या मालकीचे मुदत संपलेले फुले व सेंट्रल फुले मार्केट मधील गाळे सील करण्यासाठी आज महापालिकेच्या पथकाने कारवाई सुरू केली. चौथा गाळा सील करीत असताना महापालिकेचे उपायुक्त डॉ. उत्कर्ष गुट्टे यांना गाळेधारकांनी घेराव घालून दुकानात बंद करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे वातावरण चिघळल्याने उप आयुक्तांसह महापालिकेची कर्मचाऱ्यांनी काढता पाय घेत शहर पोलिस ठाण्यात संबंधित गाळे धारकांवर गुन्हा दाखल केला. तर गाळे धारकांनी दुकाने बंद करून महापालिका प्रशासन विरोधात घोषणाबाजी केल्या. 

तीन गाळे केले सील 
महापालिकेच्या मुदत संपलेल्या फुले व सेंट्रल फुले मार्केटमधील साडेनऊशे गाळेधारकांना 81 "क' च्या नोटिसा बजावून 11 ऑक्‍टोबरपर्यंत पैसे भरण्याची मुदत दिली होती. शनिवार व रविवारी सुट्टी असल्याने दोन दिवसाची मुदत वाढ देवून देखील अनेक गाळेधारकांनी थकबाकी भरली नाही. अशा गाळेधारकांवर आज सकाळी अकरा वाजता उपायुक्त डॉ. गुट्टे हे अतिक्रमण व किरकोळ वसुली विभागाच्या पथकासह फुले मार्केटमध्ये गाळे जप्तीची कारवाईसाठी गेले. यावेळी फत्तेचंद जसुमल ललवाणी यांचे 115, 116, 117 नंबरचे गाळे सील केला. तर आनंद रोशनलाल नाथाणी यांचा गाळा सील करताना वाद झाला. 

अचानक व्यापारी घुसले दुकानात 
नाथाणी यांचा गाळा सील करत असताना उपायुक्त व अतिक्रमण कर्मचाऱ्यांचे पथक दुकानात असताना अचानक सुमारे तीस व्यापारी दुकानात घुसून त्यांनी उपायुक्‍तांना घेराव घातला. दुकानातील लाइट बंद करून घेतले. यावेळी उपायुक्तांसह कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान ओळखत दुकानातून काढता घेत थेट शहर पोलिस ठाणे गाठले. 

पोलिस ठाण्यात गर्दी 
शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यासाठी महापालिकेचे उपायुक्तसह कर्मचारी गेले असताना तेथे गाळेधारकांनी देखील गर्दी केली. अधिकाऱ्यांनी दमदाटी व शिवीगाळ केल्याच्या आरोप त्यांनी केला आहे. दरम्यान दुपारी व्यापारी संकुल असोसिएशनचे कोअर कमिटीचे अध्यक्ष डॉ. शांताराम सोनवणे यांनी पोलिस ठाण्यात येऊन गाळेधारकांशी व पोलिस अधिकाऱ्यांशी चर्चा केली. गाळेधारकांना शांततेचे आवाहन केले. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार अभिषेक पाटील यांनी देखील पोलिस ठाण्यात येऊन चर्चा केली. 

व्यापाऱ्यांनी केले मार्केट बंद 
महापालिकेच्या पथकाने गाळे सील करण्याची कारवाई सुरू केल्याने फुले व सेंट्रल फुले मार्केटमध्ये दुपारी एकच गोंधळ उडाला. ऐन दिवाळी सणात कारवाई होत असल्याने संतप्त गाळेधारकांनी एकत्र येऊन दुकाने बंद करून महापालिका प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी केली. 

दुकानात भावासंह ग्राहक असताना उपायुक्तांसह, मनपाचे कर्मचारी दुकानात घुसले. ग्राहकांना बाहेर काढले. तसेच आम्हाला अर्वाच्य भाषा वापरली. आम्हाला चाळीसपट नुकसान भरपाईची नोटीस दिली आहे. याबाबत न्यायालयात हे प्रकरण प्रलंबित असताना ही कारवाई करणे चुकीचे आहे. 
- महेंद्र नाथाणी (गाळेधारक) 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com