जी. एम. फाउंडेशनच्या माध्यमातून वैद्यकीय प्रयोगशाळा! 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 मे 2020

कोरोना' संशयित रुग्णाचे "स्वॅब' घेऊन ते पुण्याला पाठवून त्यांचे चोवीस तासांत अहवाल दिले. ही सुविधा अत्यंत माफक दरात असेल.

जळगाव  : भाजपचे नेते, माजी मंत्री तथा आमदार गिरीश महाजन हे जी. एम. फाउंडेशनच्या माध्यमातून राज्यभरात वैद्यकीय सेवा करीत आहेत. शहरात याच फाउंडेशनच्या माध्यमातून प्रयोगशाळाच उभारण्यात येत असून, तेथे "कोरोना'चीही तपासणी कमी दरात केली जाणार आहे. एक जूनपासून ही प्रयोगशाळा सुरू होणार आहे. 

माजी मंत्री गिरीश महाजन यांनी "कोरोना'च्या रुग्णांवर सरकारतर्फे व्यवस्थित उपचार केले जात नसल्याची, तसेच रुग्णाच्या तपासणीचा अहवालही लवकर दिला जात नसल्याची टीका केली. मात्र, ते केवळ टीका करून थांबले नाहीत, तर त्यांनी जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयास चार व्हेंटिलेटरही भेट दिले आहेत. शिवाय, आता ते जी. एम. फाउंडेशनच्या माध्यमातून शहरातील महापालिकेच्या नानीबाई रुग्णालयात प्रयोगशाळेची उभारणी करण्यात आली. जी. एम. फाउंडेशन व औरंगाबादच्या ओमसाई फाउंडेशनच्या माध्यमातून ही प्रयोगशाळा साकारण्यात आली. 

श्री. महाजन यांनी सांगितले, की या ठिकाणी "कोरोना' संशयित रुग्णाचे "स्वॅब' घेऊन ते पुण्याला पाठवून त्यांचे चोवीस तासांत अहवाल दिले. ही सुविधा अत्यंत माफक दरात असेल. याशिवाय, या ठिकाणी रक्त, लघवीसह इतर तपासणीही होईल. सिटी स्कॅन, इको टेस्टही करण्यात येईल. यासाठी खासगी प्रयोगशाळांपेक्षा कमी दर आकारण्यात येईल. आज या प्रयोगशाळेच्या कामाची त्यांनी पाहणी केली. एक जूनपासून ते कार्यान्वितही करण्यात येणार आहे. यावेळी आमदार सुरेश भोळे, महापौर भारती सोनवणे, नगरसेवक कैलास सोनवणे, स्थायी समितीच्या सभापती शुचिता हाडा आदी उपस्थित होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon G. M. Medical Lab through the Foundation!