esakal | बाप्पाच्या आगमनाची शहरात धुम
sakal

बोलून बातमी शोधा

live photo

बाप्पाच्या आगमनाची शहरात धुम

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

जळगाव : भक्ती, चैतन्य, उत्साह यांचा त्रिवेणी संगम असलेल्या लाडक्‍या गणरायाच्या उत्सवाला उद्यापासून (ता. 2) प्रारंभ होत आहे. त्याच्या स्वागतासाठी अवघी जळगावनगरी सज्ज झाली आहे. मांगल्याची शिदोरी घेऊन येणारा, वैभव अन दैदीप्याची प्रचिती देणाऱ्या उत्सवाची शहरात धुम आहे. सकाळपासूनच सर्वत्र गणरायाची मुर्ती घेवून जात बाप्पाचा जयघोष होत आहे. यामुळे सारे वातावरण मंगलमय आणि चैतन्यमय झाले आहे. 

सर्वांचे आराध्य दैवत व लाडक्‍या बाप्पाचे उद्या गणेश चतुर्थीला आगमन होत आहे. बाप्पाच्या स्वागतासाठी भक्तांची तयारी जोरात आहे. तर दुसरीकडे बाजारात सजावटीच्या वस्तू, पूजा साहित्य तसेच गणेश मूर्ती घेण्यासाठी पूर्वसंध्येला भाविकांनी गर्दी केली होती. शहरातील नेहरू चौक, सुभाष चौक, नवी पेठ, पोलनपेठ, रथचौक परिसरात मोठ्या श्री गणेश मंडळांचे भव्य आरास उभारण्याचे काम अजूनही सुरू आहे. आरास उभारण्यासाठीचा अखेरचा हात कारागिरांकडून फिरवला जात असून, गणरायाच्या आगमनाची व गणेशोत्सवाचे नियोजनातील काम पूर्ण करण्यासाठी मंडळातील कार्यकर्त्यांची धावपळ दिसत होती. 

मूर्ती घेऊन जाण्याची लगबग 
शहरात विविध ठिकाणी गणेशमूर्तीचे स्टॉल लागले आहेत. अजिंठा चौफुली, बहिणाबाई चौकातील रिंगरोड, जिल्हा परिषद रस्त्यावर गणेशमूर्ती विक्रीचे स्टॉल लागले आहेत. तसेच गणेश कॉलनी, गुजराल पेट्रोलपंप, कालिंकामाता चौक याठिकाणी बाप्पाच्या मूर्ती घेण्यासाठी भक्तांचा ओढा असून, त्या अनुषंगाने विविध रूपातील मूर्ती घेण्यासाठी नागरिक मूर्ती विक्रेत्यांकडे बुक करत आहेत. बहुतांश मंडळांच्या कार्यकर्त्यांची बुकिंग केलेल्या मूर्ती घेऊन जाण्यासाठी लगबग सुरू होती. 
 
देखाव्यांवर अखेरचा हात 
शहरातील प्रमुख मंडळांतर्फे उभारण्यात येत असलेल्या देखाव्यांचे काम पूर्णत्वास आले असून, देखाव्यांवर अखेरचा हात फिरवला जात आहे. बाप्पाची मूर्ती आणण्यासोबतच उभारण्यात आलेल्या मंडपाची सजावट व रोषणाईचे काम पूर्ण केले जात आहे. 

loading image
go to top