सिलिंडरचे दर 695 रुपयांवर! 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 8 डिसेंबर 2019

सिलिंडरच्या दरवाढीमुळे आंदोलने झाल्याने केंद्र सरकारने सहा ते सात वर्षांपासून गॅस सिलिंडरवर सबसिडी (अनुदान) देण्याची घोषणा केली. सबसिडीची रक्कम थेट ग्राहकाच्या बॅंकेतील खात्यात काही दिवसांनी जमा होते. मात्र, असे असले तरी घरी सिलिंडर आले, की लागलीच सातशे रुपये द्यावेच लागतात.

जळगाव : इंटरनेट, मोबाईलच्या युगात स्वयंपाकासाठी गॅस सिलिंडरचाच मोठ्या प्रमाणावर सर्वत्र वापर होतो. एकेकाळी सर्वसामान्यांच्या आवाक्‍यात असलेले सिलिंडरचे दर या महिन्यात तब्बल 695 रुपयांवर पोहोचले आहेत. त्यामुळे गृहिणींचे बजेट कोलमडले आहे. नोव्हेंबरमध्ये सिलिंडरचे दर 77 रुपयांनी वाढले. त्यानंतर आता पुन्हा या महिन्यात 14 रुपयांनी दर वाढले आहेत. एकीकडे कांद्याचे दर प्रतिकिलो 80 ते 100 रुपयापर्यंत वाढले असताना दुसरीकडे सिलिंडर 700 रुपयांपर्यंत पोहोचल्याने सर्वसामान्यांना जिणे कठीण बनले आहे. 
काही वर्षांपूर्वी रॉकेल स्वस्त धान्य दुकानातून वितरीत होत असल्याने ठराविक नागरिकांकडेच स्वयंपाकाचे गॅस सिलिंडर असायचे. गॅस सिलिंडर ही प्रतिष्ठेची वस्तू मानली जायचे. मध्यंतरी सर्वांना गॅस योजनेंतर्गत स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरचे दर सर्वसामान्यांना परवडतील, असे ठेवले गेले. त्यामुळे सर्वसामान्य कुटुंबासह गरिबांकडेही गॅस सिलिंडर दिसू लागले. एकीकडे गॅस सिलिंडरची मागणी वाढल्याने केंद्र सरकारने सिलिंडरचे दरही वाढविले. सिलिंडरच्या दरवाढीमुळे आंदोलने झाल्याने केंद्र सरकारने सहा ते सात वर्षांपासून गॅस सिलिंडरवर सबसिडी (अनुदान) देण्याची घोषणा केली. सबसिडीची रक्कम थेट ग्राहकाच्या बॅंकेतील खात्यात काही दिवसांनी जमा होते. मात्र, असे असले तरी घरी सिलिंडर आले, की लागलीच सातशे रुपये द्यावेच लागतात. एकाच वेळी सातशे रुपये गरीब कुटुंब कोठून आणणार? असा प्रश्‍न आहे. व्यावसायिक सिलिंडरच्या दरातही 214 रुपयांची वाढ झाली असून, ते आता 1227 रुपयांना मिळत आहे. 

अवश्‍य वाचा > "मी पुन्हा येईन' पेरू विकायला

गेल्या काही महिन्यांतील सिलिंडर दरवाढीची स्थिती 
ऑगस्ट--577 रुपये 
सप्टेंबर --592.50-15 
ऑक्‍टोबर-605--15.50 
नोव्हेंबर--682.50--77.50 
डिसेंबर--695.50--13 वाढ 

गृहिणी काय म्हणतात? 

महागाईला आळा घालावा 
स्वाती कुलकर्णी (अध्यक्षा, सुरभी महिला मंडळ) ः स्वयंपाकाचे गॅस सिलिंडर जीवनावश्‍यक गोष्ट बनली आहे. आता गरीब, मध्यमवर्गीय सर्वांकडेच गॅस सिलिंडर आवश्‍यक गोष्ट झाली आहे. सर्व महिन्याचे बजेट करताना दर महिन्याला एकेक आवश्‍यक वस्तूचे भाव वाढत आहे. त्यात आणखी भर पडली ती गॅस सिलिंडर दरवाढीची. सर्वसामान्यांनी काय करावे? सरकारने या गोष्टीकडे लक्ष देऊन सिलिंडरचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्‍यातील ठेवून महागाईला आळा घालावा. 

दर कमी करावेत 
मंजूषा राव (सचिव, सुरभी महिला मंडळ) ः गॅस सिलिंडरची दरवाढ सर्वांनाच झळ पोहोचणारी गोष्ट आहे. दरवाढ थांबली पाहिजे. सरकारने काही ठोस उपाययोजना कराव्यात. दर कमीत कमी कसे राहतील याचा पाठपुरावा करावा. 

महिन्याचे बजेट कोलमडले 
वर्षा जोशी (गृहिणी) ः सध्या दोन-तीन महिन्यांपासून सलग घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. रोजच्या वापरामध्ये गॅस सिलिंडर अतिशय महत्त्वाचे आहे. गॅस सिलिंडरचे दर वाढले तर सगळ्यावरच त्याचा मोठा परिणाम होतो. गृहिणींचे महिन्याचे बजेट कोलमडते, याकडे शासनाने लक्ष द्यावे. 

दर सर्वसामान्यांना परवडणारे ठेवा 
सुरेखा वाणी (गृहिणी) ः घरगुती गॅस सिलिंडरचे दर हे मध्यमवर्गीय लोकांना परवडणारे नाही. यासाठी लवकरात लवकर विविध योजनांच्या माध्यमातून सिलिंडरचे दर कमी करण्यात यावेत. सामान्य व्यक्तीस परवडतील असेच दर असावेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon gas cylinder rate high