esakal | न्यायाचा दिवस... पण, ना उत्साह ना जल्लोष..! 
sakal

बोलून बातमी शोधा

न्यायाचा दिवस... पण, ना उत्साह ना जल्लोष..! 

न्यायाचा दिवस... पण, ना उत्साह ना जल्लोष..! 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

जळगाव : तत्कालीन नगरपालिकेत विरोधात असताना भाजपने सुरेशदादा जैन यांच्या गटाचा याच प्रकरणावरून तीव्र विरोध केला. भाजप नेते-आमदार एकनाथराव खडसेंनी केलेल्या संघर्षामुळे ते जैनांचे प्रतिस्पर्धी बनले, पण भाजपच्या वाढीत या संघर्षाचा अनुकूल परिणाम झाला. आज मात्र या खटल्यात सध्याच्या महापालिकेतील विरोधकांच्या नेतृत्वाला शिक्षा झाली असली, तरी शिक्षेत भाजपची मंडळीही असल्याने सत्ताधाऱ्यांच्या गोटात शांतता आहे. 
जळगावात भाजपच्या राजकारणाची तलवार नेहमीच सुरेशदादा जैनांविरोधात तळपत राहिली. तत्कालीन नगरपालिका असताना त्यातील कथित गैरव्यवहारांची प्रकरणे खडसेंनी विधिमंडळासह जनतेच्या व्यासपीठावरही लावून धरली. जैनांविरोधात कमालीचा संघर्ष उभा केला. जळगावमधील स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी खडसेंना त्या-त्या वेळी योग्य साथही दिली. परिणामी, ज्या जळगावात भाजपचे अस्तित्व नव्हते ते या संघर्षातून निर्माण झाले. 

जैनविरोधी राजकारणातून सत्तेत 
भाजपच्या जैनविरोधी राजकारणातून प्रथमत: 2001 मध्ये थेट नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपचा उमेदवार (डॉ. के. डी. पाटील) निवडून आला. नंतर 2003 मध्ये महापालिका झाल्यानंतरच्या पहिल्याच निवडणुकीतही पालिकेत भाजपचे तुल्यबळ सदस्य निवडून आले. नंतरच्या टप्प्यात जैन गटाने पुन्हा पालिकेवर वर्चस्व निर्माण केले असले, तरी 2012 मध्ये घरकुल घोटाळा प्रकरणातील अटकसत्राने जैन गटाला मोठा धक्का बसला. जैनविरोधी वातावरणाने 2014 मध्ये जळगावातून भाजपचा आमदारही (सुरेश भोळे) दिला. आणि गेल्या वर्षी पालिकेवर दोन तृतीयांश सदस्यांचे बहुमत मिळवत भाजपने कब्जा केला. 

..तरीही भाजपमध्ये उत्साह नाही 
भाजपच्या राजकारणाचा जळगाव शहरातील हा यशाचा आलेख उंचावण्याचे कारण अर्थातच भ्रष्टाचारविरोधी व जैनविरोधी राजकारण ठरले. आज घरकुल घोटाळा प्रकरणातील सूत्रधार म्हणून सुरेशदादा जैन, प्रदीप रायसोनी, राजा मयूर, मेजर नाना वाणींसह तत्कालीन नगराध्यक्ष, नगरसेवकांना मोठ्या दंडासह शिक्षा झाल्यावर शहरात विशेषत: भाजपच्या गोटात जल्लोष होणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात या शिक्षेत तेव्हा जैनांसोबत व आता सत्ताधारी भाजपमध्ये "इनकमिंग' केलेले सदस्यही असल्याने हतबल भाजपला या निकालाचा आनंदही व्यक्त करता येत नाही, अशी स्थिती दिसून आली. 

loading image
go to top