"घरकुल'चा तपास : नितीन नेहूल यांची आठवण चटका लावून गेली..! 

"घरकुल'चा तपास : नितीन नेहूल यांची आठवण चटका लावून गेली..! 

जळगाव : घरकुल घोटाळा प्रकरणाचा आज धुळे जिल्हा न्यायालयात निकाल लागून संशयितांना सक्तमजुरीची शिक्षा ठोठावण्यात आली. कागदोपत्री तपास असलेल्या या गुन्ह्यात तक्रारदार आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, तपासाधिकारी इशू सिंधू यांची महत्त्वपूर्ण भूमिका राहिली. खटल्याचा निकाल होऊन शिक्षा झाली मात्र गुन्ह्याच्या तपासात आणि संशयितांच्या अटकेत सिंहाचा वाटा असलेले तत्कालीन सहाय्यक पोलिस निरीक्षक नितीन नेहूल यांची आठवण मित्रांच्या डोळ्यांचे काठ ओलावून गेली. 
पोलिस दलात अधिकारी म्हणून पहिली पायरी उपनिरीक्षक पदाची आहे. अहमदनगर जिल्ह्यातील सामान्य शेतकरी कुटुंबातील तरुण नितीन विश्‍वासराव नेहूल उपनिरीक्षक झाल्यावर जळगावात रुजू झाले. तालुक्‍यात, शहर पोलिस ठाण्यात उपनिरीक्षक म्हणून काम करताना तत्कालीन अप्पर पोलिस अधीक्षक इशू सिंधू यांच्याकडे घरकुल घोटाळा प्रकरणाचा तपास आला. सिंधूंना आपली टीम निवडण्याचा अधिकार होता. क्राइम रायटर, टायपिस्ट असे पोलिस कर्मचारी निवडल्यानंतर उपनिरीक्षक नितीन नेहूल यांना सहकारी म्हणून सिंधूंनी निवडले. सहसा आयपीएस दर्जाचा अधिकारी कुठल्याही प्रोबेशनरी डीवायएसपी, वरिष्ठ पोलिस निरीक्षकाला आपल्या टीममध्ये घेतो. मात्र सिंधूंनी नेहूल यांच्यावर विश्‍वास टाकला. नेहूल यांनीही तो सार्थ ठरवला. सावलीप्रमाणे सिंधूंसोबत राहून गुन्ह्यातील प्रत्येक कागद सांभाळण्यासह संशयितांच्या अटकेबाबत माहिती काढण्यापासून तर अटकसत्राची रणनीती ठरविण्यापर्यंतच्या प्रक्रियेत नेहूल सक्रिय सहभागी होते. 
एरव्ही पोलिस खात्यात वरिष्ठ अधिकाऱ्यासोबत कुठल्याही मोहिमेवर काम करणाऱ्या कर्मचारी अधिकाऱ्यांना बक्षीस पोस्टिंगची अपेक्षा असते. मात्र, नेहूल याला अपवाद होते. दीड वर्ष "घरकुल'चा तपास पूर्ण झाल्यावरही त्यांनी कुठलीही पोस्टिंगची लालसा दाखविली नाही. पुणे येथे बदलून गेल्यावरही त्यांच्या नशिबात "घरकुल' तपासाप्रसंगी पोलिस अधीक्षक असलेले प्रकाश मुत्याळ पुणे पोलिस आयुक्त म्हणून लाभले. त्यांच्यासोबत वाचक म्हणून काम करताना 31 मार्च 2016 ला नगर-पुणे महामार्गावर तीसगावजवळ अपघातात निधन झाले. आज घरकुल घोटाळा प्रकरणाचा निकाल लागल्यानंतर तपासाधिकारी सिंधू, सरकारी वकील ऍड. प्रवीण चव्हाण यांनी निकालाबाबत समाधान व्यक्त करतानाच याप्रसंगी नेहूल असायला हवे होते, अशी भावनाही व्यक्त केली. 

घरकुल घोटाळा प्रकरणातील तपासाची संपूर्ण कागदपत्रे सांभाळणे, त्याच्यातील आवश्‍यक बाबी लक्षात ठेवणे याची चपखल जबाबदारी नितीन नेहूल यांनी पार पाडली. निकालाच्या दिवशी नेहूल असायला हवे होते. 
- इशू सिंधू पोलिस अधीक्षक, अहमदनगर 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com