मुंबई-ठाणे सोडले तर शिवसेनेकडे कुठे काय ? : मंत्री गिरीश महाजन

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 12 नोव्हेंबर 2018

जामनेर : राज्यात ग्रामपंचायतीपासून ते पंधरा महापालिका, बारा जिल्हा परिषदेची सत्ता भाजपच्या ताब्यात आहे, असे सांगून शिवसेनेकडे मुंबई-ठाणे परिसर सोडला तर कुठे काय आहे? असा सवाल करीत जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी जोरदार टीका केली.शिवसेनेसोबत युती संदर्भात त्यांनी सोबत आल्यास त्यांना घेऊन नाहीतर त्यांच्याशिवाय आगामी निवडणुकीत उतरण्याची भाजपची तयारी असल्याचे येथील कार्यक्रमात सांगितले. 

पळासखेडा जवळील इंग्लीश मीडियम स्कूलच्या पंडित दिनदयाल उपाध्याय सभागृहात आयोजीत कार्यकर्ता प्राशिक्षण वर्गात प्रमुख मार्गदर्शक म्हणुन ते बोलत होते. व्यासपीठावर खासदार रक्षा खडसे, नगराध्यक्षा साधना महाजन, भाजपचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ, ज्येष्ठनेते ऍड. शिवाजी सोनार, अनीस शेख,विद्या खोडपे, प्रा.सुनील नेवे, चंद्रकांत बावीस्कर, युवाध्यक्ष अमर पाटील, हर्षल पाटील, दिलीप खोडपे, गोवींद अग्रवाल, जितु पाटील, गोपाळ नाईक, प्रा. शरद पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. 

राज्यात पुणे,पिंपरी चिंचवड बालेकिल्ला असणाऱ्या राष्ट्रवादीकडे आज तेही राहीले नाही. सांगलीतही भाजपने विजय मिळविला, नांदेड सोडले तर कॉंग्रेसकडेही बोटावर मोजण्याइतपत संस्था आहेत. दुसरीकडे मुंबई मनपात सेनेची परीस्थिती कशी आहे, आज जर दोन-चार नगरसेवक इकडे-तिकडे झाले तर मुंबई सुद्धा त्यांच्या हातात राहाणार नाही असा गर्भित इशाराही महाजन यांनी दिला.आगामी निवडणुका एक युध्द समजुन जिंकण्याचे आवाहन त्यांनी केले. जामनेर पॅटर्नची चर्चा सर्वदूर होत असल्यामुळे धुळे महापालिका आणि शेंदुर्णी नगरपंचायतीमधेही आपल्याला मोठा विजय मिळवायचाच आहे. त्यासाठीही सज्ज राहाण्याच्या सूचना यावेळी त्यांनी दिल्या. 

संघाचे जिल्हा कार्यवाह केदार ओक आदींनी दिवसभराच्या सत्रांमधे विविध विषयांवर उपस्थितांना संबोधित केले. चंद्रकांत बावीस्कर यांनी प्रास्ताविक केले तर रवींद्र झाल्टे यांनी सूत्रसंचालन व युवाध्यक्ष अमर पाटील यांनी आभार मानले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon girish mahajan jamner melava