कलेक्‍टर, अपर एस.पी. उतरले नदीत...वाळू माफियांना हिसका 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 13 जानेवारी 2020

वाळू माफीया दररोज गिरणा नदीत उतरून वाळूची चोरी करीत असल्याचे वृत्त "सकाळ'ने दिले होते. त्याची दखल घेत ही कारवाई केली आहे. जिल्हाधिकारी डॉ.ढाकणे, अप्पर पोलिस अधीक्षक नवटके यांनी आज सकाळी गिरणा नदीपात्रातील वाळू चोरी करणाऱ्या माफियांना रंगेहाथ पकडण्याची कारवाई करण्याची मोहीम आखली.

जळगाव : जिल्ह्यात वाळू ठेके बंद असताना येथील गिरणा नदीपात्रातून वाळूचा सर्रास उपसा करणाऱ्या वाळू माफीयांवर आज दुपारी चक्क जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे, अप्पर पोलिस अधीक्षक भाग्यश्री नवटके यांनी बांभोरी येथील नदीपात्रात उतरून कारवाई केली. यामुळे वाळू माफीयांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. 
वाळू माफीया दररोज गिरणा नदीत उतरून वाळूची चोरी करीत असल्याचे वृत्त "सकाळ'ने दिले होते. त्याची दखल घेत ही कारवाई केली आहे. जिल्हाधिकारी डॉ.ढाकणे, अप्पर पोलिस अधीक्षक नवटके यांनी आज सकाळी गिरणा नदीपात्रातील वाळू चोरी करणाऱ्या माफियांना रंगेहाथ पकडण्याची कारवाई करण्याची मोहीम आखली. सोबतीला तहसील कार्यालयातील काही कर्मचारी ज्यात तलाठी मंडळाधिकाऱ्यांचा समावेश होता. 

हेही पहा - मराठी चित्रसृष्टीतील हिरकणी ठरली नवापूरची कल्याणी

मोबाईल घेतले काढून 
तहसील कर्मचाऱ्यांना बोलावून त्यांच्याकडील मोबाईल काढून घेण्यात आले. नंतर लागलीच गिरणा नदीपात्रात जाऊन वाळू उपसा करणाऱ्यांना पकडण्याची मोहीम सांगण्यात आली. मोबाईल काढून घेतल्याने मोहिमेची माहिती लिक होण्याचा प्रश्‍नच नव्हता. जिल्हाधिकारी, अप्पर पोलिस अधीक्षकांसह महसूल पथकाने वाळू उपसणाऱ्यांना पकडून तब्बल पंधरा ट्रॅक्‍टर जप्त करण्यात आले. अचानक झालेल्या या कारवाईने वाळू माफीयांमध्ये घबराट पसरली आहे. 
वाळू उपशाचा पंचनामा करण्यासाठी तहसीलदार वैशाली हिंगे व पथक बांभोरी येथे रवाना झाले आहे. 

जिल्ह्यात सर्व कारवाई होणार 
नदीपात्रातून जर वाळूची चोरी होत असेल तर तो गुन्हा आहे. वाळू चोरणाऱ्यांवर अचानक छापे टाकून अशाच प्रकारची कारवाई पूर्ण जिल्ह्यात करण्यात येईल. वाळूची चोरी पूर्णतः रोखण्यात येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांनी "सकाळ' ला दिली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon girna river collector valu mafiya