जोनपूरला निघाले रिक्षाने...पण रस्त्यातच तिने सोडले प्राण ! 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 15 मे 2020

मूळगावी जाण्यास परवानगी मिळाल्याने संतोष हा पत्नी सुधा हिच्यासह आपल्या कुटुंबाला घेऊन मूळगावी जाण्यासाठी निघाला. परंतु जळगाव शहरातील खेडी पेट्रोलपंपाजवळ संतोष याच्या पत्नीचा कावीळ या आजारामुळे अचानक मृत्यू झाल्याची घटना घडली.

जळगाव: "लॉकडाउन'मधून शिथिलता मिळाल्याने मोठ्या प्रमाणात परप्रांतीय आपल्या मूळ गावी जात आहे. मुंबई येथील रिक्षाचालक कुटुंबासह उत्तर प्रदेशातील जोनपूर येथे रिक्षाने आपल्या मूळगावी निघाला होता. घराकडे जाण्याची ओढ असतानाच या रिक्षाचालकाची पत्नी सुधा संतोष मिश्रा (वय 22) यांचा कावीज आजारामुळे मृत्यू झाला. ही घटना आज सकाळच्या सुमारास येथील खेडी पेट्रोलपंपाजवळ घडली. 

"लॉकडाउन'मध्ये शिथिलता मिळाल्याने मोठ्या प्रमाणात परप्रांतीय आपल्या मूळ गावी परतत आहेत. मूळचा उत्तर प्रदेशातील जोनपूर जिल्ह्यात वास्तव्यास असलेला संतोष मिश्रा हा मुंबईतील एरोली भागात रिक्षा चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होता. देशासह राज्यात "कोरोना'ग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने गेल्या दोन महिन्यांपासून सर्वांवर बेरोजगारीची कुऱ्हाड पडली असून, संपूर्ण व्यवसाय ठप्प पडले आहे. आपल्या मूळगावी जाण्यास परवानगी मिळाल्याने संतोष हा पत्नी सुधा हिच्यासह आपल्या कुटुंबाला घेऊन मूळगावी जाण्यासाठी निघाला. परंतु जळगाव शहरातील खेडी पेट्रोलपंपाजवळ संतोष याच्या पत्नीचा कावीळ या आजारामुळे अचानक मृत्यू झाल्याची घटना घडली. मृत विवाहिता हिला सहा महिन्यांची मुलगी असल्याने मिश्रा कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. 

पोलिसांची मदतीसाठी धाव 
परप्रांतीय महिलेचा अचानक मृत्यू झाल्याची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिस निरीक्षक विनायक लोकरे, पोलिस उपनिरीक्षक विशाल सोनवणे, सचिन मुंढे, किशोर बडगुजर आदींनी घटनास्थळी धाव घेत परप्रांतीय महिलेचा मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलविला. 

मृतदेह नेण्यासाठी पोलिसाची मदत 
"कावीळ' आजारामुळे मृत झालेल्या महिलेच्या मृतदेहाचे दुपारच्या सुमारास शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर मृतदेह मिश्रा कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आला. मृतदेह ताब्यात मिळाल्यानंतर एमआयडीसी पोलिसांच्या मदतीने मिश्रा कुटुंबीय हे मृतदेह घेऊन उत्तर प्रदेशमधील आपल्या मूळगावी जाण्यास निघाले. त्यामुळे पुन्हा एकदा खाकीतील माणुसकीचे दर्शन आज एमआयडीसी पोलिसांमध्ये दिसून आले. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon go to ato Extraterrestrial drivhar wife ded