esakal | शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सहा अभ्यासक्रमास अडीचशे प्रवेश 
sakal

बोलून बातमी शोधा

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सहा अभ्यासक्रमास अडीचशे प्रवेश 

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सहा अभ्यासक्रमास अडीचशे प्रवेश 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

जळगाव ः जिल्ह्यात गेल्या वर्षापासून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू झाले आहे. एमबीबीएसची पहिली बॅच घेऊन सुरू झालेल्या महाविद्यालयात दुसऱ्या वर्षी नवीन पाच अभ्यासक्रमांना सुरवात झाली. महाविद्यालयात सध्या सुरू असलेल्या सहा अभ्यासक्रमांमधून 270 प्रवेश आहेत. यामुळे महाविद्यालयातील अभ्यासक्रमाचा विस्तार वाढत असून, स्वतःच्या इमारतीचा अद्याप पाया खोदण्याचा मुहूर्त लागलेला नाही. 

जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या इमारतीत "एमबीबीएस'च्या शंभर प्रवेशाच्या जागा असलेले शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला सुरवात करण्यात आली. पहिल्याच वर्षी महाविद्यालयातील प्रवेश फुल्ल झाले होते. पहिल्या बॅचमधील शंभर विद्यार्थी पासआऊट होऊन द्वितीय वर्षात प्रवेशीत आहेत. तर यंदाच्या प्रथम वर्षासाठी नवीन शंभर जागांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. "एमबीबीएस' महाविद्यालयात दीडशे जागांवर प्रवेश निश्‍चित आहे. यासोबतच नव्या अभ्यासक्रमांची सुरवात झाल्याने प्रवेशाच्या जागा देखील वाढल्या आहेत. 

आयुर्वेदसह पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू 
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे यंदा दुसरे वर्ष आहे. वैद्यकीय महाविद्यालयाच्या माध्यमातून जळगावात राज्यातील पहिले "मेडिकल हब' उभारण्यात येत आहे. या अंतर्गत पाच महाविद्यालय असतील. त्यात शासकीय दंत महाविद्यालय, शासकीय आयुर्वेद महाविद्यालय, भौतिकोपचार महाविद्यालय, शासकीय समचिकीत्सा (होमिओपॅथी) महाविद्यालय सुरू होणार आहे. यामधील एक भाग म्हणून यंदापासून पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे चार नवीन कोर्स सुरू करण्यात आले आहे. यामध्ये मेडिसीन, सर्जरी, स्त्रीरोग तज्ज्ञ आणि नेत्र चिकित्सा याकरिता प्रवेश देण्यात आले आहेत. या चार अभ्यासक्रमाचे मिळून 50 प्रवेश झाले आहेत. शिवाय, पदव्युत्तरचे आणखी नवे अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी प्रस्ताव देण्यात आले आहेत. यासोबतच बीएएमएस आयुर्वेद अभ्यासक्रम देखील सुरू झाला असून, याकरिता शंभर प्रवेश झाले आहेत. 

इमारतीसाठी शासनाकडे प्रस्ताव 
जळगावात उभारण्यात येत असलेल्या "मेडिकल हब'साठी चिंचोली (ता. जळगाव) शिवारात 136 हेक्‍टर जागा असून, इमारत बांधकामासाठी 1 हजार 750 कोटी रुपयांचा निधी देखील मंजूर आहे. या प्रोजेक्‍टमध्ये शासकीय महाविद्यालयाची इमारत, रुग्णालय इमारत, मुलां-मुलीचे वसतिगृहासह अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थाने बांधण्यात येणार आहे. या इमारत बांधकामाला प्रशासकीय मान्यता मिळाली असून, बांधकामाला अद्याप सुरवात नाही. शिवाय, एमबीबीएसच्या द्वितीय वर्षासाठी स्वतंत्र विभाग, लॅबोरेटरी बांधण्यासाठी राज्य शासनाकडे तीन प्रस्ताव देण्यात आले आहेत. तर डीपीडीसीकडे परीक्षा हॉल, लॅब आणि ग्रंथालय उभारणीसाठीचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. 

"वैद्यकीय महाविद्यालयात यावर्षापासून आयुर्वेद आणि सीबीएस पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे चार कोर्स सुरू झाले असून, महाविद्यालयाचा विस्तार वाढत असल्याने हॉल, लॅब उभारणीसाठी शासनाकडे प्रस्ताव दिले आहेत.' 
- डॉ. भास्कर खैरे, अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जळगाव. 
 

loading image
go to top