कोरोनामुळे हुकले गुढीपाडव्याचे मुहूर्त 

यश पाटील
मंगळवार, 24 मार्च 2020

पाडव्याच्या मुहूर्तावर नवीन गाडी घेण्याकडे कल असतो. दरवर्षी या मुहूर्तावर जळगाव जिल्ह्यातून साधारण अडीच हजारपर्यंत नवीन गाड्या शोरूममधून निघत असतात. यंदा मात्र कोरोना व्हायरसमुळे ऑटो सेक्‍टरच नाही तर सर्वच मार्केट बंद पडले आहे. ऑटो सेक्‍टरला मोठा फटका असून पाडव्याच्या मुहूर्तावर निघणाऱ्या नवीन अडीच ते तीन हजार गाड्यांची विक्री थांबेल. 
- योगेश चौधरी, संचालक, पंकज टीव्हीएस. 

कहाटूळ ः कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाने कलम 144 लागू केला आहे. सर्वदूर संचारबंदी लागू झाल्याने सगळेच खरेदी- विक्रीचे व्यवहार ठप्प झाले आहेत. मुख्यत्वे हिंदू धर्मातील साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त म्हणजे गुढीपाडवा! गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर साधली जाणारी सारीच कामे आता पुढे ढकलली गेली आहेत. 

हेपण वाचा -तृतीयपंथीयाचा "तो' खोटा शाप मध्यरात्री महिलांना घेऊन गेला स्मशानभूमीत...

कोरोना व्हायरसमुळे जगात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. भारतात देखील कोरोना व्हायरसला येऊन काही दिवस लोटले असतील; पण या वायरसमुळे सर्वत्र एक भिती निर्माण झाली आहे. ती आता ग्रामीण भागापर्यंत पसरली आहे. जनता कर्फ्यू सर्वसामान्य भारतीयांनी सहभाग नोंदवून सरकारच्या आदेशाला सहकार्य केले. परंतु दुसऱ्याच दिवशी अनेक नागरीक बाहेर पडून किराणा, भाजीपाला खरेदी करताना पाहण्यास मिळाले. 

पाडव्याचा मुहूर्त टळला 
राज्य सरकारने सध्याची परिस्थिती पाहता 31 मार्चपर्यंत संचारबंदी जाहीर केली आहे. यामुळे बाजारातील सगळे छोटे- मोठे व्यवहार ठप्प झाले आहेत. त्यामुळे गुढीपाडव्याच्या निमित्ताने खरेदीचा मुहूर्त देखील हुकले आहे. उद्या (ता.25) गुढीपाडवा असून तो घरातच साजरा होईल. या मुहूर्तावर काही खरेदी करण्यासाठी कोणालाही बाहेर पडता येणार नाही. ग्रामीण भागासह शहरी भागातले व्यवसायदेखील बंद आहे. पाडव्या ने हिंदू धर्मियांच्या नववर्षाची सुरुवात होते "चैत्राची पालवी फुटली की परिसर देखी खुलतो" असे पूर्वजांचे मत आहे. 

वाहन खरेदी, गृहप्रवेशचे मुहूर्तही टळणार 
साडेतीन मुहूर्ता पैकी एक असलेल्या मुहूर्तावर अनेकजण नवीन वाहन खरेदी करतात किंवा घेतलेल्या नव्या घरात गृहप्रवेश करत असतात. परंतु नागरीकांच्या या आनंदावर कोरोना व्हायरसने विरजन फिरविले आहे. प्रामुख्याने नव्याने घर बांधल्यानंतर त्यात गृहप्रवेशाच्या मुहूर्त गुढीपाडव्याच्या दिवशी निश्‍चित केला होता, परंतु साथरोगाच्या दहशतीमुळे आता गृहप्रवेशाच्या मुहूर्त देखील पुढे धकलावा लागला आहे. 

सोन्या-चांदीची विक्री मंदावली 
गेल्या काही महिन्यांपासून सोन्या- चांदीच्या दरात चढउतार पाहण्यास मिळत होते. 43 हजार रूपयांवर पोहचलेले सोन्याचे दर 40 हजारावर आले होते. यामुळे सोने खरेदीला काहीशी सुरवात झाली होती. यात कोरोना व्हायरस पसरल्याने सारेच मार्केट ठप्प झाले आहेत. शिवाय गुढीपाडव्याच्या मुहूर्ताव्र दरवर्षी अनेकजण सोने- चांदी खरेदी करतात; यंदा मात्र ही संधी हुकणार असल्याचे दिसून आले. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon gudhi padwa Auspicious beginning corona virus effect auto secter