तृतीयपंथीयाचा "तो' खोटा शाप मध्यरात्री महिलांना घेऊन गेला स्मशानभूमीत! 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 मार्च 2020

एकीकडे कोरोनाची लागण होऊ नये याकरीता सारे प्रयत्नशिल असून दुसरीकडे दिवे लावले नाही तर मुले मरतील या अफवेने त्यांचा जीव वाचविण्यासाठी रात्री बाराच्या सुमारास गावातील महिलांनी एकत्रित येऊन दिवे लावले. 

शहापूर (ता.जामनेर) : मध्यरात्रीची वेळ... अख्खे गाव झोपलेले...अशात फोनची रिंग वाजते अन्‌ उठा झोपू नका तुमच्या मुलाला वाचवायचे असेल तर निंबाच्या झाडाखाली दिवे लावा. मग हा संदेश एका घरापासून दुसऱ्या घरापर्यंत पोहचते आणि संपुर्ण गाव उठते आणि महिला दिवे घेवून निंबाच्या झाडाखाली दिवे लावण्यासाठी येतात. हे सारे घडले केवळ एका अफवेमुळे. 

हेपण पहा -आईला बोलला अपशब्द; बापाने मुलालाच जीवे मारले

कोरोना व्हायरसने संपुर्ण जग बेधरले असताना शहापूर (ता. जामनेर) गावात एका अफवेने साऱ्यांची झोप उडविली. सोमवारी दुपारपासून अमावस्या लागणार होती. त्यापूर्वी गावात मध्यरात्रीच्या वेळी कडूलिंबाच्या झाडाखाली दिवे लावण्यासाठी सांगितले जाते. एकीकडे कोरोनाची लागण होऊ नये याकरीता सारे प्रयत्नशिल असून दुसरीकडे दिवे लावले नाही तर मुले मरतील या अफवेने त्यांचा जीव वाचविण्यासाठी रात्री बाराच्या सुमारास गावातील महिलांनी एकत्रित येऊन दिवे लावले. 

तृतीयपंथीयाचा हाच तो शाप 
तृतीयपंथींची हत्या झाल्याने या तृतीयपंथीने मृत्यूसमयी शाप दिला की, तुम्ही मला वाचवू शकणार नाही तर तुमचीही मुले मरणार. तेव्हा जखमी अवस्थेत असलेल्या तृतीयपंथीयाने तुम्ही माझी हत्त्या केल्याने तुमच्या मुलालाही मृत्यू येईल असा शाप दिला. पण मरण्यापूर्वी त्याने सांगितले की शापातून मुक्‍त व्हायचे असेल तर एक मुलगा असलेल्या आईने स्मशानात किंवा निंबाच्या झाडाखाली दिवा लावण्याचे सांगितल्याची चर्चा होती. या अफवेने रात्री अकरा वाजेपासून मध्यरात्री बारा वाजेपर्यंत दत्तनगर, पुरा परिसर व गावातील महिलांनी स्मशानभूमीत, तर काही ठिकाणी महिलांनी घरासमोर अंगणात तर काहींनी भीतीपोटी लिंबाच्या झाडाखाली दिवे लावले. 

..अन्‌ म्हणे हत्या नाशिक, बऱ्हाणपूरला 
मध्यरात्री कोणी स्मशाणात तर कोणी लिंबाच्या झाडाखाली जाऊन दिवे लावून घरी झोपले. पण सकाळी उठून याबाबत माहिती घेतली असता त्या शाप देणाऱ्याचा खून बऱ्हाणपूर येथे तर काहींनी नाशिक येथे झाल्याचे सांगण्यात येत होते. यामुळेच नाशिक व बऱ्हाणपूर येथून फोन आल्याचे सांगण्यात आले. 

सकाळी रंगली चर्चा 
दिवस उजाडताच ग्रामस्थांना स्मशानभूमी व लिंबाच्या झाडाखाली दिवे दिसल्याने चर्चेला अधिकच ऊत आला होता. तर काहींनी आज सोमवती आमावस्या असल्याने पूजल्याची चर्चाही गावभर होती. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव असताना अशा अंधश्रद्धेमुळे अफवा पसरल्याने अधिकच गोंधळ उडाला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jamner shahapur Third party gender shap and midnight Cemetery