आपत्कालीन स्थितीसाठी आठ हजार बेड : गुलाबराव पाटील

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 28 एप्रिल 2020

आपत्कालीन स्थिती उद्‌भवल्यास जिल्ह्यात आठ हजार बेडची व्यवस्था करण्यात आली असून, "कोरोना'च्या प्रतिकारासाठी जिल्हा प्रशासन सज्ज असल्याची माहिती पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली.

जळगाव : जिल्ह्यात "कोरोना'बाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढ असल्याने आपत्कालीन स्थिती उद्‌भवल्यास जिल्ह्यात आठ हजार बेडची व्यवस्था करण्यात आली असून, "कोरोना'च्या प्रतिकारासाठी जिल्हा प्रशासन सज्ज असल्याची माहिती पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली. तसेच कापूस लागवडीबाबत कृषी मंत्री दादा भुसे यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे चर्चा केली असून, एक मेस जिल्ह्याचा खरीप आढावा घेण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. 
अलीकडच्या काही दिवसांमध्ये जिल्ह्यातील "कोरोना'बाधितांची संख्या वाढत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर आणि कापूस लागवडीसंदर्भात आज पालकमंत्री पाटील यांनी आढावा बैठक घेतली. यावेळी जिल्हा रुग्णालयाचे शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण, जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. बी. एस. खैरे, जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. पाटोदे कृषी विभागाचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर, कृषी उपसंचालक अनिल भोकरे, जिल्हा परिषदेचे जिल्हा कृषी अधिकारी वैभव शिंदे उपस्थित होते. 
अमळनेर, भुसावळ, चाळीसगाव तालुक्‍यालाही कोरोनाचा संसर्गाचा धोका संभवतो. यामुळे या तीनही तालुक्‍यांच्या सीमा अत्यावश्‍यक सेवा वगळून इतरांसाठी बंद झाल्या पाहिजे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. "कोरोना'ग्रस्तांसाठी जिल्ह्यात आठ हजार बेडची व्यवस्था जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आली आहे. तालुक्‍यातील प्रत्येक ग्रामीण रुग्णालयात आयसोलेशन वार्डची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. तसेच पीपीई किट जास्तीत जास्त उपलब्ध व्हावे, यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे मंत्री पाटील यांनी यावेळी सांगितले. 

कापूस बियाण्यांबाबत चर्चा 
राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे यांच्याशी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी कापूस बियाणे उपलब्धतेविषयी व लागवडीबाबत दूरध्वनीवर चर्चा केली. मेच्या पहिल्या आठवड्यादरम्यान जिल्ह्यातील मान्यताप्राप्त कृषी केंद्रांवर शेतकऱ्यांसाठी कापूस बियाणे उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती कृषीमंत्री भुसे यांनी दिली. 

"व्हेंटिलेटर'साठी मदतीचे आवाहन 
याप्रसंगी मंत्री पाटील म्हणाले, की संशयितांचे अहवाल लवकरात लवकर उपलब्ध व्हावे, यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. "कोरोना' तपासणी केंद्राचे काम 80 टक्के पूर्ण झाले असून, त्या संबंधित मशिनरी येताच संशयित कोरोनाग्रस्तांचे स्वॅब तपासणीची प्रयोगशाळा कार्यान्वित होईल. जिल्ह्यात संशयित "कोरोना'च्या रुग्णांसाठी व्हेंटिलेटरची आवश्‍यकता असल्याने जिल्ह्यातील दानशूर व्यक्तींनी पुढे येऊन रुग्णांसाठी व्हेंटिलेटरची व्यवस्था करण्यास मदत करावी, असे आवाहन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon gulabrao patil corona fight 8 thousand adisinal bed