पालकमंत्र्यांचा तरुणांना अजब सल्ला.. म्हणाले, परमिट रुम ...

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 13 फेब्रुवारी 2020

शुद्ध शाकाहारी हॉटेल भाड्याने घेतली, नंतर ती विकत घेतली. मात्र, ती चालेना. नंतर तिला मांसाहारी केली, मग थोडी चालू लागली. पण, मटण शिल्लक राहिलं की ते दुसऱ्या दिवशी ते खपेना. शेवटी तिला परमिट रुम केली. ज्या हॉटेलचा "गल्ला' मांसाहारी असताना 4 हजार होता, परमिट रुम केल्याबरोबर पहिल्याच दिवशी 20 हजार झाला.

जळगाव : विद्यार्थीदशेत काहीतरी अर्थार्जन म्हणून हॉटेल सुरु केली, पण चालायची नाही.. मग हॉटेलात मांसाहारी पदार्थ सुरु केले.. हॉटेल चालू लागली, पण अपेक्षित पैसा मिळत नव्हता. मग, सिंघल साहेब कलेक्‍टर असताना त्यांनी परवाना दिला, हॉटेलला परमिट रुम केली.. आणि एका दिवसाचा चार हजारांचा "गल्ला' थेट 20 हजारांवर पोचला.. म्हटलं, आपण नाही केली तर दुसरा कुणी करेल.. हे मी अनुभवातून सांगतोय.. असा अजब सल्ला पाणीपुरवठा तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आज तरुणांना दिला. 
प्रधानमंत्री मुद्रा योजनेंतर्गत विविध शासकीय योजनांच्या संदर्भात जिल्हास्तरीय मेळाव्यात ते बोलत होते. मेळाव्यास उपस्थित आमदार सुरेश ऊर्फ राजूमामा भोळे, जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे, महापौर भारती सोनवणे, जिल्हा परिषद अध्यक्षा रंजना पाटील, सीईओ डॉ. बी.एन. पाटील हे पालकमंत्र्यांच्या या वक्तव्याचे साक्षीदार ठरले. 
केसीई सोसायटीच्या प्रांगणात आज सकाळी हा मेळावा आयोजित करण्यात आला होता. मेळाव्याचे उद्‌घाटन गुलाबराव पाटलांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आले. त्यानंतर त्यांनी मेळाव्यास उपस्थित तरुणांना जोड धंदे करण्याबाबत मार्गदर्शन करताना गुलाबराव पाटील म्हणाले, आधी शुद्ध शाकाहारी हॉटेल भाड्याने घेतली, नंतर ती विकत घेतली. मात्र, ती चालेना. नंतर तिला मांसाहारी केली, मग थोडी चालू लागली. पण, मटण शिल्लक राहिलं की ते दुसऱ्या दिवशी ते खपेना. शेवटी तिला परमिट रुम केली. ज्या हॉटेलचा "गल्ला' मांसाहारी असताना 4 हजार होता, परमिट रुम केल्याबरोबर पहिल्याच दिवशी 20 हजार झाला. मध्यंतरी तो धंदा चालत नव्हता, तेव्हा वाटलं आपण फसलोय.. पण एकाने सांगितलं, हे कर.. ते कर. आपण राजकारणात आहे, कसं काय करायचा हा धंदा. पण, आपण नाही केला तर दुसरा तो धंदा करेल.. हे सांगताना पालकमंत्र्यांनी आमदार राजूमामांचाही उल्लेख केला. एकदा असाही विचार केला की, आपलं हॉटेल रोडवर आहे, हायवेला आहे.. आपण करुन तर बघूया.. तेव्हा सिंघल साहेब कलेक्‍टर असताना परमिट घेतले आणि धंदा सुरु केला आणि तो चांगलाच चालू लागला.. त्यामुळे तरुणांनी जोडधंदे केले पाहिजे. असा धक्कादायक सल्ला त्यांनी यावेळी दिला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon gulabrao patil youth open parmite room