महामार्ग चौपदरीकरणाच्या कामांना तीन ठिकाणी ब्रेक 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 1 मार्च 2020

मार्चअखेरपर्यंत काम पूर्ण होईल असे "न्हाई'च्या अधिकाऱ्यांनी सांगितले होते. असेच धीम्यागतीने काम सुरू राहिल्यास जून जुलै उजाडला तरीही काम पूर्ण होणार नाही. कंत्राटदाराला रात्रंदिवस काम करण्यास सांगून त्याची अंमलबजावणी करायला लावणे हाच यावरील पर्याय आहे.

जळगाव : "मार्चअखेर शहरातील महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम पूर्ण होईल', "तरसोद फागणे महामार्गाच्या चौपदरीकरणाचेही काम लवकरच वेग घेणार', अशी माहिती राष्ट्रीय प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी जिल्हा नियोजन समितीच्या सभेत सादर केली होती. आज मात्र शहरातील महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामांची स्थिती पाहता तब्बल तीन ठिकाणी बंद पडले आहे. अनेक नाल्यावर पूल बांधणे बाकी असताना मार्च अखेरपर्यंत काम पूर्ण होणे शक्‍य नाही.यामुळे "न्हाई'च्या अधिकाऱ्यांनी सभेत दिलेली माहिती दिशाभूल करणारी असल्याचे जाणवत आहे. 

नक्‍की पहा - शंभर खाटांचे नवे महिला, बाल रुग्णालय राहणार उभे !

एप्रिल 2019 मध्ये कालिकामाता मंदिर ते खोटेनगरापर्यंत शहरातील महामार्ग क्रमांक सहाचे चौपदरीकरणाचे कामाला मंजुरी मिळाली. हैदराबाद येथील झांडू कंन्स्ट्रकशनने हे काम दिवाळीनंतर सुरू केले. काही महिने वेगात काम सुरू होते. मात्र सध्या प्रभात कॉलनी, गुजराल पेट्रोलपंप, दादावाडी समोरील बोगदा उभारणीचे काम बंद पडले आहे. केवळ बोगद्याचा पाया बांधून दोन- तीन फूट काम केले. नंतर ते काम बंदच पडले आहे. गुजराल पेट्रोलपंपाजवळ विद्युत तारांची अडचण होती. वीज कंपनीने त्या ताराही काढल्या. आता तरी बोगदाचे काम वेगात सुरू होण्याची गरज होती. मात्र तसे झालेले नाही. यामुळे नागरिकांना कच्च्या रस्त्यावरून जाताना धूळ, वाहतुकीची कोंडी, अपघातांना सामोरे जावे लागत आहे. 

धुळीचा अनेकांना श्‍वसनाचे आजार 
शहरातून जाणारा महामार्गावरून दररोज हजारो लहान मोठी वाहनांची वर्दळ असते. महामार्गाचे चौपदरीकरण करताना कंत्राटदाराने पर्याय म्हणून कच्चा रस्ता तयार केला. त्यावर प्रचंड धूळ चोवीस तास उडते. यामुळे वाहनधारक धुळीने माखून जातात. सोबत महामार्गाच्या बाजूला राहणाऱ्या घरांवरही धुळीचे थर साचले आहेत. धुळीमुळे अनेकांना श्‍वसनाचे विकार जडले आहेत. यामुळे चौपदरीकरणाचे काम रात्रंदिवस पूर्ण करून नागरिकांना अपघातापासून, धुळीच्या त्रासापासून वाचवावे अशी मागणी होत आहे. 

इच्छादेवीजवळ अर्धेकाम पूर्ण 
महामार्गाच्या चौपदरीकरणाचे आकाशवाणी चौकाकडून इच्छादेवीकडे जाणाऱ्या महामार्गाचे एकीकडेच अर्धेकाम झाले आहे. गुजराल पेट्रोल पंप ते मानराज पार्कपर्यंतच्या एका भागातील काम होऊन तो मार्ग वाहतुकीस सुरू झाला. मात्र जुना महामार्गाचा रस्ता नवीन कामासाठी उखडून ठेवला आहे. यामुळे वाहतुकीची कोंडी कायम आहे. 

 

संथकामामुळे अपघात वाढले 
योगेश गालफडे
ः शहरातील महामार्गाचे काम संथ गतीने सुरू आहे. सर्वच ठिकाणी रस्त्यांच्या दुतर्फा खोदून ठेवल्याने महामार्ग रुंद झाला आहे. कंत्राटदाराने अगोदर एकाकडील पूर्ण बाजूने काम करावे, नंतर दुसऱ्याबाजूने केले तरच वाहतुकीची कोंडी टाळता येईल. 
 
सायंकाळी वाढते वर्दळ 
नरेंद्र सोनवणे
ः राष्ट्रीय महामार्ग सहा नेहमी वर्दळीचा असतो. सायंकाळी सहा ते नऊ दरम्यान महामार्गावर मरणाची गर्दी असते. महामार्गावरील गर्दी, वाहतुकीची कोंडी भयावह आहे. महामार्गाने जाणारे जीवमुठीत धरून जातात, अनेकांचे अपघात होतात. मात्र अधिकाऱ्यांना त्याचे काही सोयरसुतक नाही, हीच खंत आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon highway four way work three spot stop work