फागणे- तरसोदचे काम "मिशन मोड'वर; व्हॉटस्‌ऍप ग्रुपवर दैनंदिन काम होणार अपडेट

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 16 मार्च 2020

महामार्ग क्रमांक सहावरील फागणे- तरसोद या टप्प्यातील काम दोन वर्षांपासून थंड बस्त्यात आहे. दोन वर्षांत या चौपदरीकरणाच्या टप्प्यात केवळ सपाटीकरणाचे काम झाले असून, तेदेखील काही ठिकाणी अपूर्ण आहे. अवघे 20 टक्केही काम झालेले नसताना या महामार्गावर दररोज अपघातांची मालिका सुरू झाली आहे.

जळगाव : गेल्या आठवड्यात दोन-तीन दिवस रखडलेल्या फागणे- तरसोद टप्प्यातील चौपदरीकरणाची "सकाळ'ने चिरफाड केल्यानंतर खासदार उन्मेष पाटलांनी आज महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी, मक्तेदार कंपनीचे प्रतिनिधी, व्यवस्थापक यांची संयुक्त बैठक घेतली. हे काम "मिशन मोड'वर पूर्ण करण्याच्या सूचना देण्यासह दररोज होणाऱ्या कामाचे अपडेट्‌स व्हॉटस्‌ऍप ग्रुप स्थापन करून त्यावर द्यावेत, असेही निर्देश दिलेत. 

महामार्ग क्रमांक सहावरील फागणे- तरसोद या टप्प्यातील काम दोन वर्षांपासून थंड बस्त्यात आहे. दोन वर्षांत या चौपदरीकरणाच्या टप्प्यात केवळ सपाटीकरणाचे काम झाले असून, तेदेखील काही ठिकाणी अपूर्ण आहे. अवघे 20 टक्केही काम झालेले नसताना या महामार्गावर दररोज अपघातांची मालिका सुरू झाली आहे. यासंदर्भात "सकाळ'ने गेल्याच आठवड्यात तीन दिवस मालिका प्रसिद्ध करून त्यावर प्रकाशझोत टाकला होता. केंद्र सरकारचे प्रतिनिधी म्हणून खासदार उन्मेष पाटील यांनी जळगावात "न्हाई'च्या कार्यालयात ठाण मांडून बसावे, असेही "सकाळ'ने नमूद केले होते. 

मालिकेची घेतली दखल 
या वृत्तमालिकेची खासदारांनी दखल घेत आज फागणे- तरसोद व जळगाव शहरातील महामार्ग चौपदरीकरणाच्या कामाचा आढावा घेतला. दुपारी अजिंठा विश्रामगृहात आयोजित बैठकीस महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक सी.एम. सिन्हा, फागणे- तरसोद टप्प्यातील कामाचे मक्तेदार आग्रोह कन्स्ट्रक्‍शनचे प्रतिनिधी उपस्थित होते. 

नियमित कामाचा आढावा 
फागणे- तरसोद या 84 किलोमीटरच्या टप्प्यात आतापर्यंत किती काम झाले, सपाटीकरणासह मुरूम, खडीकरण, डांबरीकरण, तसेच कॉंक्रिटच्या कामाचा खासदारांनी आढावा घेतला. नदी, नाल्यांवरील पुलांसह मोऱ्यांचे काम अद्याप ठप्प आहे. रस्त्याचे काम सुरू असले तरी ते कासवगतीने होत असल्याने कधी पूर्ण होईल, याची विचारणा करत माहिती घेण्यात आली. 

दैनंदिन काम होणार अपडेट 
या कामाचा आढावा घेताना उन्मेष पाटलांनी "न्हाई'चे अधिकारी सिन्हा व मक्तेदाराच्या प्रतिनिधीची कानउघाडणी केली. कामाची गती वाढवा, त्यावरील मजूर संख्या व यंत्रणा वाढवून काम मुदतीत पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी केल्या. त्यासाठी व्हॉटस्‌ऍप ग्रुप निर्माण करून त्यावर रोजच्या कामाचे अपडेट द्यावे, त्यावर सिन्हा यांनी व्यक्तिश: लक्ष द्यावे, असेही खासदारांनी बजावले. 

गडकरींनाही भेटणार 
फागणे- तरसोद टप्प्यातील रखडलेल्या कामाबाबत "न्हाई'चे अधिकारी व मक्तेदारही उदासीन आहे. त्यामुळे यासह जळगाव शहरातील महामार्ग चौपदरीकरणाच्या कामातील त्रुटी दूर करण्यासाठी तसेच पाळधी- खोटेनगर व कालिंका माता चौक ते तरसोद फाट्यापर्यंतच्या टप्प्यात चौपदरीकरण कसे करता येईल, याबाबत नितीन गडकरींची भेट घेऊन त्यातून मार्ग काढू, तसेच पुढच्या शनिवारी या कामाचा आठवड्यातील आढावा घेऊ, असे उन्मेष पाटलांनी "सकाळ'शी बोलताना सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon highway fourway fagne tarsod MP unmesh patil working speed