राखेचा वापर अन्‌ तोही महामार्ग कामासाठी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 6 डिसेंबर 2019

महामार्गाच्या भरावासाठी उन्हाळ्यात मातीचा वापर केला जात होता. यंदा मात्र अतिपाऊस झाल्याने परिसरातील नदी व नाले अजूनही वाहत आहेत. यामुळे वाळू व माती मिळत नसल्याने महामार्ग प्राधिकरणाने वेल्हाळे (ता. भुसावळ) येथील दीपनगर औष्णिक विद्युत केंद्रातील राखेचा वापर सुरू केला जात आहे

वरणगाव : महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी माती व रेती उपलब्ध होत नसल्याने सर्रासपणे येथील दीपनगर औष्णिक विद्युत केंद्रातील राखेचा वापर केला जात आहे. शहरातून राखेची वाहतूक होत असल्याने राख उडून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याबाबत मुख्याधिकाऱ्यांकडे तक्रार करून कार्यवाही होत नसल्याने शहरवासीय संताप व्यक्त करीत आहेत. 

महामार्गाच्या भरावासाठी उन्हाळ्यात मातीचा वापर केला जात होता. यंदा मात्र अतिपाऊस झाल्याने परिसरातील नदी व नाले अजूनही वाहत आहेत. यामुळे वाळू व माती मिळत नसल्याने महामार्ग प्राधिकरणाने वेल्हाळे (ता. भुसावळ) येथील दीपनगर औष्णिक विद्युत केंद्रातील राखेचा वापर सुरू केला जात आहे. ही वाहतूक नागेश्वर महादेव मंदिर वरणगाव व महामार्गावरून नेली जात असल्याने प्रचंड प्रमाणात राख उडते. याबाबत नागरिकांनी विरोध केला. वरणगाव पोलिस व नगराध्यक्ष सुनील काळे यांनी ही वाहतूक रोखली. काही वाहनांवर दंडात्मक कार्यवाही करण्यात आली. मात्र यानंतर पुन्हा जैसे थे स्थिती निर्माण झाली आहे. 

राजकीय पदाधिकाऱ्याचे डंपर 
राखेचा वाहतुकीसाठी वापरण्यात येणारे डंपर एका राजकीय व्यक्तींचे आहे. यामुळे अधिकारी ठोस कारवाई करीत नसल्याचा आरोप शहरवासीयांकडून केला जात आहे. खड्ड्यांमध्ये अथवा स्पीड ब्रेकर वरून गाडी चालताना गाडीतील राख मोठ्या प्रमाणावर पडते. याचा त्रास विश्रामगृह ते बसस्थानकापर्यंत व्यावसायिकांसह नागरिकांना सहन करावा लागत आहे. रस्त्यावरती राख पडू नये या दृष्टिकोनातून उपाययोजना होणे आवश्यक आहे 

श्वसनाचा व डोळ्यांचा त्रास 
दीपनगर औष्णिक विद्युत केंद्रातून बाहेर पडणारी राख ही टोकदार असल्याने श्वसन मार्गातून फुफ्फुससा पर्यंत व डोळ्यात जाऊन गेल्याने विविध आजारांना होऊ शकतात. ही राख धोकादायक आहे. ही वाहतूक बंद करण्यात यावी अशी संताप व्यक्त होत आहे. 

मुख्याधिकाऱ्यांचा हलगर्जीपणा 
शहरातून वाहतूक होणाऱ्या राख वाहतुकीबाबत मुख्याधिकारी श्याम गोसावी यांच्याकडे तक्रारी केल्या आहेत. मात्र अद्याप कोणत्याही प्रकारची कार्यवाही करण्यात आलेली नाही. शहरातील नागरिकांची समस्या सोडविण्याकडे ते दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. याबाबत वरिष्ठ पातळीवरून दखल घेण्यात यावी अशी मागणी होत आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon highway work rakh use varangaon