Video आयएमए'कडून उद्या "व्हाइट अलर्ट'; रात्री पेटविणार मेणबत्ती

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 21 एप्रिल 2020

कोरोना'च्या रुग्णांवर उपचार करणारे "आयएमए'चे सदस्य असलेल्या डॉ. लक्ष्मीनारायण रेड्डी या ऑर्थोपेडिक सर्जन असलेल्या तरुण डॉक्‍टरचा "कोरोना'ची लागण होऊन मृत्यू झाला. या डॉक्‍टरच्या अंत्यसंस्कारावेळी तेथील स्थानिक लोकांनी अडथळा निर्माण केला.

जळगाव : डॉक्‍टरांवर हल्ले होण्याचे प्रकार थांबलेले नाहीत. डॉक्‍टरांच्या सुरक्षिततेबाबत शासनाकडून कडक कायदा नसल्याने प्रकार सुरूच असतात. यामुळे डॉक्‍टरांच्या सुरक्षिततेसाठी हिंसाचारविरोधी केंद्रीय कायदा करण्याच्या मागणीसाठी "आयएमए'कडून उद्या (22 एप्रिल) "व्हाइट अलर्ट' पाळून पांढरा इशारा देण्यात येणार आहे. 

"कोरोना'च्या रुग्णांवर उपचार करणारे "आयएमए'चे सदस्य असलेल्या डॉ. लक्ष्मीनारायण रेड्डी या ऑर्थोपेडिक सर्जन असलेल्या तरुण डॉक्‍टरचा "कोरोना'ची लागण होऊन मृत्यू झाला. या डॉक्‍टरच्या अंत्यसंस्कारावेळी तेथील स्थानिक लोकांनी अडथळा निर्माण केला. शिवाय अंत्ययात्रेसाठी आलेल्या डॉक्‍टरांच्या परिवारावर अमानुष हल्ला केला. एवढेच नव्हे; तर डॉक्‍टरांच्या मृतदेहाबाबत अत्यंत अशोभनीय, अमानवी वर्तन केले. सरकारी यंत्रणा हे वर्तन रोखण्यात पूर्णपणे अपयशी ठरली. अशाच घटनांची पुनरावृत्ती डॉ. सायमन आणि डॉ. सिओलो यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या अंत्यसंस्काराबाबत झाली. एकीकडे "कोरोना वॉरियर' म्हणून उल्लेख करणाऱ्या सरकारला अशा प्रकारच्या घटना रोखण्याची इच्छाच नसल्यास आम्ही दाद कुणाकडे मागायची? हा प्रश्‍न "आयएमए'च्या सदस्यांसमोर आहे. याशिवाय डॉक्‍टरांवरील हल्ले सुरूच असतात. 
या साऱ्या घटनांचा निषेध म्हणून आणि डॉक्‍टरांच्या सुरक्षिततेसाठी हिंसाचारविरोधी केंद्रीय कायदा व्हावा, या मागणीसाठी उद्या (22 एप्रिल) राष्ट्राला पांढरा इशारा देण्यात येणार आहे. या दिवशी रात्री नऊला भारतातील "आयएमए'चे सर्व सदस्य डॉक्‍टर आणि रुग्णालय एक-एक मेणबत्ती पेटवून राष्ट्राला पांढरा इशारा देतील. 

...तर गुरुवारी काळी फीत लावून काम 
"व्हाइट अलर्ट'नंतरही डॉक्‍टर आणि रुग्णालयांवरील हिंसाचाराबाबत केंद्र सरकार कायदा करण्यात अपयशी ठरल्यास "आयएमए' गुरुवारी (23 एप्रिल) काळा दिवस म्हणून जाहीर करेल. या दिवशी सर्व डॉक्‍टर काळी फीत लावून काम करतील. काळ्या दिवसानंतरही शासनाने योग्य पावले उचलली नाहीत, तर त्यापुढील पावले उचलणारे निर्णय घेतले जातील. 

व्हाइट इशारा असा 
- आमचा पांढरा रंग लाल होऊ देऊ नका. 
- डॉक्‍टरांना सुरक्षित राहू द्या. 
- रुग्णालय सुरक्षित राहू द्या. 
- अध्यादेशाद्वारे केंद्रीय कायदा लागू करा. 
- आमची सुरक्षा हीच आमची मागणी. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon ima docter white alert