गुंतवणूकदारांना नवीन "शेअर'मधून अधिक नफ्याची संधी 

सकाळ वृत्तसेवा
Monday, 16 March 2020

"शेअर'सह सोन्याचेही भाव कमी झाले, अशी वेळ प्रथमच आली आहे. "शेअर'मध्ये आता गुंतवणूक केल्यास दोन वर्षांत नक्कीच 30 ते 40 टक्के जादाचा परतावा गुंतवणूकदारांना मिळेल, अशी स्थिती "शेअर मार्केट'ची आहे. 

जळगाव : जागतिक मंदीचा "शेअर मार्केट'वर परिणाम झाला. आता त्यापाठोपाठ "कोरोना व्हायरस'चाही परिणाम झाल्याने "शेअर'चे भाव कमी झाले आहेत. सोन्याप्रमाणेच "शेअर'मध्ये गुंतवणुकीची संधी चालून आली आहे. जेव्हा सोन्याचे भाव वाढतात तेव्हा "शेअर'चे भाव कमी होतात. जेव्हा सोन्याचे भाव कमी होतात तेव्हा शेअरचे भाव वाढतात, अशी स्थिती असते. मात्र, यावेळी "शेअर'सह सोन्याचेही भाव कमी झाले, अशी वेळ प्रथमच आली आहे. "शेअर'मध्ये आता गुंतवणूक केल्यास दोन वर्षांत नक्कीच 30 ते 40 टक्के जादाचा परतावा गुंतवणूकदारांना मिळेल, अशी स्थिती "शेअर मार्केट'ची आहे. 
आतापर्यंत देशात विविध प्रकारचे "व्हायरस' आले त्यावेळी "शेअर'चे भाव कमी झाले. त्यामुळे अनेक गुंतवणूकदारांत भीतीचे वातावरण आहे. अनेकजण "शेअर' विकून मोकळे होतील किंवा ते विकतील. मात्र, जे संयम बाळगून "शेअर' विकणार नाहीत अथवा नवीन "शेअर' खरेदी करतील त्यांना भविष्यात चांगला परतावा मिळेल. यामुळे "शेअर'मध्ये गुंतवणुकीची चांगली संधी चालून आली आहे. 

"इकॉनॉमी' सुदृढ "शेअर'मध्ये 
संदीप बंब (शेअर गुंतवणूक सल्लागार) ः दोन वर्षांपासून भारतात मंदीची स्थिती आहे. असे असले तरी "शेअर मार्केट' टिकून आहे. "शेअर मार्केट'मध्ये "शेअर'चे भाव कमी होणे व सोन्याचे भाव कमी होणे एकाच वेळी या दोन्ही गोष्टी घडत नाही. दोन्हींचे भाव खाली येणे याचा अर्थ "इकॉनॉमी' सुदृढ आहे. "शेअर'चे भाव आता कमी झाल्याने आगामी दोन वर्षांत गुंतवणूकदारांना 30 ते 40 टक्के अधिकचा परतावा मिळू शकतो. डिफेन्स, फर्टिलायझर, ऑइल ऍण्ड गॅस या क्षेत्रातील "शेअर'मध्ये गुंतवणुकीची गुंतवणूकदारांना चांगली संधी आहे. 

"कोरोना'चा "शेअर'ला फायदाच! 
ज्ञानेश्‍वर बढे (संचालक, सद्‌गुरू इन्व्हेसमेंट, जळगाव) ः आतापर्यंत "शेअर मार्केट'वर "स्वाइन फ्लू'सह विविध प्रकारच्या आपत्तींचा प्रभाव पडला. तेव्हा "शेअर'चे भाव कमी झाले. मात्र, भाव कमी झाल्यानंतर ज्यांनी "शेअर' विकले त्यांना तोटा सहन करावा लागला, तर ज्यांनी "शेअर' विकत घेतले त्यांना फायदाच झाल्याचा इतिहास आहे. आता "कोरोना व्हायरस'मुळे शेअरचा भाव घसरला, हे जरी खरे असले, तरी "शेअर'मध्ये गुंतवणूक करण्याची मोठी संधी आहे. शासनाच्या महारत्न कंपनीचे "शेअर' आता जे खरेदी करतील त्यांना आगामी काळात "एफ.डी.' (ठेवी)पेक्षा अधिक परतावा मिळेल. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon Investors chance shear market invest