जळगाव बाजार समिती 31 मार्चपर्यंत बंद !

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 27 मार्च 2020

जिल्ह्यासह राज्यभरातून कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजीपाला विक्रीसाठी येत असतो. परंतु खासगी वाहने बंद असल्याने भाजीपाल्याची आवक अत्यंत मंदावली आहे.

जळगाव  : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्रासह राज्य शासनाने संचारबंदी लागू केली आहे. मात्र अत्यावश्‍यक सेवा वगळता इतर सर्व व्यापार बंद ठेवण्यात आले आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीतर्फे भाजीपाला मार्केट देखील 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्यात आले आहे. मात्र शेतकरी थेट माल विक्रेत्यांना विक्री करीत असल्याने शेतकऱ्यांना ऐरवीपेक्षा नफा अधिक मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान आहे. 

शहरात तीन दिवसांपासून संचारबंदी लागू आहे. या संचारबंदीच्या काळात किराणा दुकान, भाजीपाला, औषध विक्रेते, वैद्यकीय सेवा वगळण्यात आल्या आहे. तसेच खासगी वाहतूक सेवा देखील बंद ठेवण्याचे आदेश शासनाकडून काढण्यात आले आहे. जिल्ह्यासह राज्यभरातून कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजीपाला विक्रीसाठी येत असतो. परंतु खासगी वाहने बंद असल्याने भाजीपाल्याची आवक अत्यंत मंदावली आहे. तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीने देखील 31मार्चपर्यंत बंद ठेवण्याच्या सूचना दिल्या असल्याने शेतकरी थेट विक्रेत्यांनाच भाजीपाला विक्री करीत आहे. तसेच भाजीपाल्याची आवक घटल्याने भाजीपाल्याच्या किमतीमध्ये देखील वाढ झाली आहे. 

शेतकरी दररोज आपला शेतमाल कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विक्रीसाठी घेऊन येत असतो. परंतु बाजार समिती बंद असल्याने शेतकरी माल थेट विक्रेत्यांना विक्री करीत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आडत्यांपेक्षा दोन पैसे शेतकऱ्यांना अधिक मिळत असल्याने त्यांच्याकडून समाधान व्यक्त केले जात आहे. 

आवक घटल्याने भाजीपाला महागला 
संपूर्ण जिल्ह्यातून जळगावात भाजीपाल्याची आवक मोठ्या प्रमाणात होत असते. परंतु संचारबंदी लागू झाल्यापासून भाजीपाल्याची आवक मोठ्या प्रमाणात घटली आहे. त्याचा परिणाम भावावर झाला असून भाजीपाल्याच्या किंमती दुपटीपेक्षा अधिक वाढल्या असून गृहिणींचे बजेट कोलमडले आहे. 

आडत असोसिएशनतर्फे बंद 
कृषी उत्पन्न बाजार समिती, फळ व भाजीपाला समितीतर्फे 31 मार्चपर्यंत सर्व व्यवहार ठप्प ठेवण्यात आले आहे. याबाबत त्यांनी परिपत्रक देखील काढले आहे. तसेच आडत असोसिएशनतर्फे देखील सर्व व्यवहार ठप्प ठेवण्यात आला आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon Jalgaon Market Committee closed till March 31