
जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष- उपाध्यक्ष निवडीप्रसंगी भाजपने सत्ता कायम राखत महाविकास आघाडी पॅटर्नच्या मनसुब्यांवर पाणी फिरवले. ही दोन्ही पदे जिल्ह्याचा भौगोलिक विचार करता रावेर लोकसभा मतदारसंघाकडे गेली. त्यामुळे सभापती निवडीत जळगाव लोकसभेला झुकते माप मिळेल, अशी अपेक्षा असताना तीदेखील फोल ठरली.
जळगाव : जिल्हा परिषदेत भाजपने सत्ता राखण्यात सहज यश मिळवले असले तरी अध्यक्ष, उपाध्यक्षपदाच्या निवडीपेक्षाही आज झालेल्या सभापती निवडीच्या प्रक्रियेत भाजपनेत्यांचा चांगलाच कस लागला. अखेरीस नेत्यांनी ठरविलेल्या उमेदवारांना माघार घ्यावी लागली आणि सभापती निवडीस निवडणुकीच्या माध्यमातून पूर्णविराम मिळाला. आजच्या या निवड प्रक्रियेत नावे निश्चितीपासून निवड घोषित होईपर्यंत भाजपतील गटबाजीसह सावळा गोंधळही लपून राहिला नाही.
नक्की पहा गुरू मुंडेंच्या मार्गावर शिष्य खडसेंची राजकीय वाटचाल
नेत्यांनंतर सदस्यांमध्ये खलबते
जि. प. अध्यक्ष व उपाध्यक्षपदी भाजपचे उमेदवार विजयी झाल्याने सभापतिपद निवड सहज होईल याची खात्री होती. मात्र, आज भाजपच्या सदस्यांमध्ये सभापतिपदासाठी रस्सीखेच दिसून आली. अर्थात सभापती पदासाठी बारा वाजेपर्यंत भाजपचे नेते माजी मंत्री एकनाथराव खडसे, गिरीश महाजन यांनी सकाळी विश्रामगृहात बैठक घेऊन चार समितीच्या सभापतींची नावे निश्चित केली. यात मधू काटे, जयपाल बोदडे, अमित देशमुख, ज्योती पाटील यांची नावे निश्चित झाली होती, त्यासाठी खडसेंनी आपली बाजू ताणून धरली होती. यामुळे पक्षाच्या कोअर कमिटीतील अन्य पदाधिकाऱ्यांना माघार घेत खडसेंनी सुचविलेल्या नावावर शिक्कामोर्तब करावा लागला. नेत्यांची खलबते संपल्यानंतर सदस्यांमध्ये पदासाठी खलबते सुरू झाली होती.
हेपण पहा - सेल्फीसाठी रेल्वेवर चढला; खिशातून मोबाईल काढताच होत्याचे नव्हते झाले...
अर्ज भरण्यातही भाजपचा गोंधळ
उमेदवारी अर्ज भरतानाच गोंधळ सुरू झाला. विषय समिती एकच्या सभापतिपदासाठी मधू काटे तर विषय समिती दोनच्या समिती सभापतिपदासाठी अमित देशमुख यांचे नाव निश्चित करण्यात आले होते. दोघांचेही अर्ज विषय समिती एकमध्येच दाखल झाले. शिवाय बंडखोरी करत रवींद्र पाटील यांनी भरलेला अर्ज देखील विषय समिती एकमध्ये भरला गेला. अर्थात रवींद्र पाटील यांच्यासाठी मधू काटे यांनी सुरवातीलाच माघार घेतली. मात्र अमित देशमुख आणि रवींद्र पाटील हे दोन्हीजण एकाच कॅटेगिरीत असल्याने एकाला माघार घेणे भाग होते. सभागृहात बराच वेळ गोंधळ झाल्यानंतर माजी मंत्री गिरीश महाजन यांचा फोन आल्यानंतर देशमुख यांनी माघार घेतली.
बंडखोरी ठरली फायद्याची
सभापती पदासाठी नाव निश्चित झाल्यानंतर पक्षाचे नाराज रवींद्र सूर्यभान पाटील यांनी बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केला. मधू काटे यांना माघार घेण्यास सांगण्यात आले. तर अमित देशमुख यांना देखील नाइलाजाने अर्ज माघारी घ्यावा लागला. त्यामुळे भाजपचे बंडखोर रवींद्र सूर्यभान पाटील विजयी झाले. तर विषय समिती दोनच्या सभापतिपदासाठी पक्षाने दिलेल्या अधिकृत उमेदवाराने अर्ज दाखल न करता बंडखोर गजेंद्र सोनवणे व उज्वला माळके यांनी अर्ज दाखल केला. तर महाविकास आघाडीतर्फे निलम पाटील उमेदवार होत्या. गजेंद्र सोनवणे यांनी माघार घेतली. भाजपचे बंडखोर उज्वला माळके यांनाच मतदान केले व त्या विजयी झाल्या त्यामुळे भाजप शान राहिली. अर्थात विषय समिती दोनमध्ये बंडखोरी करत दोघांनी दाखल केलेले अर्ज भाजपसाठी फायद्याच्या ठरल्या. त्यांचे अर्ज समिती दोनमध्ये नसते तर राष्ट्रवादीच्या निलम पाटील या बिनविरोध निवडून आल्या असत्या.
"मविआ' पराभवानंतरही आनंदी
सभापती पदासाठी भाजपचा विजय निश्चित होता. यामध्ये विजयासाठी झगडावे लागले. यात महाविकास आघाडीचा पराभव झाला असला तरी तो भाजपच्या विजयापेक्षा आनंदाचा होता. कारण, भाजपचे निवडून आलेले सर्वच पदाधिकारी अनुभवी नसलेले आणि सभागृहात बोलू शकतील असे नाही. यात विरोधकांचा सभागृहातील आवाज निश्चितच भाजपला दाबणारा असेल.