गुरू मुंडेंच्या मार्गावर शिष्य खडसेंची राजकीय वाटचाल 

कैलास शिंदे
Tuesday, 7 January 2020

भाजपचे नेते एकनाथराव खडसे यांनी पक्ष सोडून जाण्याच्या निर्णय रद्द करीत, पक्षात पुन्हा सक्रिय होऊन त्यांनी काम सुरू केले आहे. पक्षाचे नेते (कै.) गोपीनाथ मुंडे यांनीही एकेकाळी असाच बंडाचा निर्णय घेतला होता. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडून होत असलेल्या अपमानामुळे मुंडे यांनीही 2008 मध्ये भाजप सोडण्याचा निर्णय घेतला होता.

जळगाव : भाजपचे नेते (कै.) गोपीनाथ मुंडे यांनी एकेकाळी भाजपवर नाराज होऊन पक्षबदलाचा निर्णय घेतला होता. मात्र, अचानक घूमजाव करीत ते पक्षातच राहिले. पक्षात पुन्हा आपले स्थान मजबूत केले, पुढे लोकसभेत निवडून आल्यावर पक्षाने त्यांना केंद्रात मंत्री केले होते. मुंडे हे खडसेंचे राजकीय गुरू आणि मार्गदर्शकही मानले जातात. खडसेंनीही आता त्याच मार्गाने जाणे निश्‍चित केले आहे. आपली बंडाची तलवार म्यान करीत पक्षात स्थान बळकट करण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. 
भाजपचे नेते एकनाथराव खडसे यांनी पक्ष सोडून जाण्याच्या निर्णय रद्द करीत, पक्षात पुन्हा सक्रिय होऊन त्यांनी काम सुरू केले आहे. पक्षाचे नेते (कै.) गोपीनाथ मुंडे यांनीही एकेकाळी असाच बंडाचा निर्णय घेतला होता. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडून होत असलेल्या अपमानामुळे मुंडे यांनीही 2008 मध्ये भाजप सोडण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी ते कॉंग्रेसमध्ये जाणार असेही सांगण्यात आले होते. विशेष त्यावेळी त्यांनी कॉंग्रेसच्या नेत्यांच्याही भेटी घेतल्या होत्या. त्यामुळे मुंडे पक्ष सोडणार हे निश्‍चित झाल्याचे सांगण्यात येत होते. मात्र, त्यांनी अचानक भूमिका बदलत पक्षात सक्रिय काम केले. त्यांनी पक्षात पुन्हा सक्रिय होण्याचा निर्णय का घेतला, हे मात्र गुलदस्त्यातच राहिले. पुढे मुंडे लोकसभेवर निवडून आले. केंद्रात भाजपची सत्ता येताच त्यांना केंद्रात मंत्रिपदही सन्मानाने देण्यात आले. 

हेपण पहा - खडसेंच्या नाराजीनाट्याचा "क्‍लायमॅक्‍स' कधी..

खडसेंची तीच वाटचाल 
भाजपचे नेते एकनाथराव खडसे हे मुंडे यांना गुरू मानतात, त्यांनीही अगदी आपल्या गुरूप्रमाणेच पक्षातील नेत्यांनी दिलेल्या अपमानास्पद वागणुकीविरूद्ध आवाज उठविला. गेल्या साडेतीन वर्षांपासून पक्षात होणाऱ्या अन्यायाविरुद्ध ते आवाज उठवीत आहेत. परंतु, त्यावेळी त्यांनी पक्ष बदलण्याची भाषा कधीच केली नव्हती. परंतु, विधानसभा निवडणुकीत पक्षाने त्यांना उमेदवारी नाकारल्यानंतर मात्र त्यांच्या पक्ष बदलाबाबतच्या चर्चा सुरू झाल्या. विधानसभा निकालानंतर तर त्यांनी मुंडे यांच्याच मतदार संघातील गोपीनाथ गडावर भाषण करताना आपला भरवसा ठेवू नका, आपण केव्हाही पक्ष सोडू शकतो, असे जाहीर केले होते. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते शरद पवार, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, तसेच कॉंग्रेसच्या नेत्यांचीही भेट घेतली होती. त्यामुळे ते पक्ष सोडणार हे निश्‍चित झाले होते. मात्र, नंतर त्यांनी अचानक पवित्रा बदलत पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षांची भेट घेतली आहे. पक्षात आपल्यावर अन्याय करणाऱ्यावर कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे आपण पक्ष सोडण्याचा प्रश्‍नच येत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. 

पक्षात झाले सक्रिय 
खडसे यांनी ज्यांच्यावर आरोप केले होते ते पक्षाचे नेते माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच माजी मंत्री गिरीश महाजन यांच्यासोबत "ब्रेकफास्ट' घेत चर्चाही केली. त्यानंतर पक्षात सक्रिय होत जिल्हा परिषद अध्यक्ष व सभापती निवडीच्या प्रकियेत उमेदवार ठरविण्यात सहभागही घेतला आहे. आपण पक्षात सक्रिय झाल्याचे त्यांनी पक्षनेतृत्वाला संकेतही दिले आहेत. मात्र, खडसे यांनी पक्षांतराबाबत अचानक घूमजाव का केले हे मात्र अद्यापही गुलदस्त्यात आहे. परंतु राजकीय गुरू (कै.) गोपीनाथ मुंडे यांच्या राजकीय मार्गानुसार खडसे यांनीही आपल्या पक्षातील बंडाची आग पक्षात राहूनच विझविली, असेही आता बोलले जात आहे. मात्र, आता खडसे यांना पक्ष सन्मानाने पद देणार काय? याकडेच आता सर्वांचे लक्ष असणार आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon khadse gopinath munde politics careear