Women's Day : राजकीय अनुभवाच्या जोरावर भारतीताई महापौर !

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 8 मार्च 2020

दोन महिन्यापूर्वी महापौरपदाची धुरा त्यांनी सांभाळली असून जळगावकरांना रस्ते, स्वच्छता, मूलभूत सुविधा देण्यावर त्यांचा भर आहे. 

जळगावः घरात एकत्र कुटुंब पद्धतीची परंपरा. त्या सर्वांत मोठ्या असल्याने सगळ्यांना समजून घेणे, सांभाळणे. घराच्या किचनपासून कुटुंबाचे यशस्वी मॅनेजमेंट करण्यासोबतच 20 वर्षाचा राजकीय अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. योग अभ्यासक ते योग शिक्षक या सर्वांशी खेळीमेळीने राहणाऱ्या भारती सोनवणे यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. दोन महिन्यापूर्वी महापौरपदाची धुरा त्यांनी सांभाळली असून जळगावकरांना रस्ते, स्वच्छता, मूलभूत सुविधा देण्यावर त्यांचा भर आहे. 

पुरवेल (ता. चोपडा) येथे भारती सोनवणे यांचे बालपण तसेच प्राथमिक शिक्षण झाले. लहानपणापासून एकत्र 
कुटुंबात राहत असल्याने प्रत्येकाला सांभाळून घेण्याचे संस्कार मिळाले. लग्नानंतर देखील एकत्र कुटुंब त्यात सर्वांत मोठी असल्याने सगळ्यांना सांभाळून घेण्याची जबाबदारी होती. ती आज देखील त्या यशस्वीपणे पार 
पाडत आहे. पती कैलास सोनवणे यांचे सामाजिक तसेच राजकीय कार्य बघता बघता राजकारणाची ओढ निर्माण झाली. प्रभागातील विविध समस्या समजून घेणे आणि त्या त्वरित सोडविणे हे सूत्र अंगीकारत त्यांनी 20 वर्षात मिळालेले नगरसेवक, स्थायी समिती सभापती, उपमहापौर, महापौरपद सांभाळत आपले कर्तृत्व त्यांनी सिद्ध केले आहे. 

चांगले रस्ते देण्याचा मानस 
जळगाव शहरातील रस्ते अमृत योजनेच्या कामामुळे, पावसामुळे खड्डेमय झाले आहे. त्यामुळे संपूर्ण जळगावकर त्रस्त आहेत. परंतु महापौरपदाची त्यांनी धुरा सांभाळताच रस्त्यांच्या डागडूजीला प्राधान्य दिले. महापालिकेच्या मालकीच्या मुदत संपलेल्या गाळ्याची वसुली करून पन्नास कोटीतून शहरातील रस्त्यांची कामे करण्याचे नियोजन करून महापालिकेच्या चालूच्या अंदाजपत्रकात रस्ते दुरुस्तीसाठी तरतूद करण्याचे काम केले आहे. 

स्वच्छतेसाठी मास्टर प्लॅन 
जळगाव शहरातील स्वच्छतेचा प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून आता काम सुरू केले जाणार आहे. स्वच्छतेचे काम नियोजबध्द करण्याचा मास्टर प्लॅन त्यांनी तयार केला आहे. आरोग्य विभागाकडे स्वच्छतेसाठी आवश्‍यक मनुष्यबळ उपलब्ध झाल्यावर नियोजनानुसार काम केले जाणार आहे. शहराचे पाच भाग तयार करून दररोज नियमित स्वच्छता झाल्यानंतर दुपारनंतर महापालिकेच्या आरोग्य, बांधकाम विभागाच्या सर्व यंत्रणेद्वारे त्या एका भागाची स्वच्छता व अन्य कामे केले जाणार आहे. तसेच प्रत्येक प्रभागात 2 कोटीचे रस्ते दुरुस्ती करण्याचे कामे देखील प्रस्तावित केले आहे. 

सलग सहा वेळा निवडणुकीत विजय 
नगरपालिका तसेच महापालिकेच्या निवडणुकीत भारती सोनवणे सलग सहा वेळा निवडून आल्या आहेत. सलग 20 वर्ष त्या महापालिकेच्या राजकारणात पती कैलास सोनवणेच्या खांद्याला खांदा लावून सेवाकार्य करत आहेत. तसेच त्या उपमहापौरपद, स्थायी समिती सभापती, पती कैलास सोनवणेंकडे सभापती, आरोग्य, पाणीपुरवठा आदी विविध पदांचे कार्य त्यांनी जवळून पाहिले आहे. 

रस्ते अतिक्रमण मुक्त करणार 
शहरात खराब रस्ते सोबत अतिक्रमण झालेल्या रस्त्यांची देखील मोठी समस्या आहे. याबाबत महापालिका 
प्रशासनाला महापौरांनी स्पष्ट सूचना देत शहरातील सर्व रस्ते अतिक्रमण मुक्त करण्याचे काम हाती घेतले आहे. 

सेवाभावी संस्था, आमदार- खासदार निधीतून विकासाचे नियोजन 
शहरात विविध विकास कामे करण्यासाठी सेवाभावी संस्थांना सोबत घेऊन उद्याने, रस्ते सुशोभीकरण, चौक सुशोभीकरणाचे कामे करणार आहेत. तसेच शहरातील स्वातंत्र्य चौकात "बेटी बचाओ, बेटी पढाओ'चे स्मारक करण्याचे नियोजन केले आहे. तर आमदार, खासदारांना मिळणाऱ्या निधीसाठी विनंती करून विविध कामे केले जाणार असल्या महापौर भारती सोनवणे यांनी सांगितले. 

 
महिलांनी घ्यावा पुढाकार 
समस्या सुटत नसल्याची तक्रार केली जाते, तेव्हा आपण आपल्या प्रभागातील कोणतीही समस्या असो यासाठी महिलांनी पुढाकार घेण्याची गरज आहे. महिलांनी आपला परिसरात स्वच्छ ठेवणे, जनजागृती करणे यात अग्रेसर राहावे, तसेच महापालिकेकडे रीतसर तक्रार केल्यावर महापालिका प्रशासन त्वरित तक्रार सोडविण्यास बांधील राहील असेही महापौर भारती सोनवणे यांनी सांगितले
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon jmc mayar bharthi sonwane Interview