बहिणाबाई अध्ययन, संशोधन केंद्रास मान्यता 

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 29 August 2019

जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात कवयित्री बहिणाबाई अध्ययन व संशोधन केंद्र सुरू करण्यास आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. गेल्यावर्षी विद्यापीठाच्या नामविस्तार सोहळ्यानिमित्त उपस्थित मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या वचनांपैकी एकाची यानिमित्ताने पूर्ती झाल्याचे मानले जात आहे. 

जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात कवयित्री बहिणाबाई अध्ययन व संशोधन केंद्र सुरू करण्यास आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. गेल्यावर्षी विद्यापीठाच्या नामविस्तार सोहळ्यानिमित्त उपस्थित मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या वचनांपैकी एकाची यानिमित्ताने पूर्ती झाल्याचे मानले जात आहे. 

गेल्यावर्षी 11 ऑगस्टला विद्यापीठाचा "कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ' असा नामविस्तार झाला. त्यानंतर 11 ऑक्‍टोबरला नामविस्तार सोहळ्यात मुख्यमंत्र्यांनी याबाबत प्रस्ताव पाठविण्याची सूचना केली होती. डिसेंबरमध्ये कुलगुरू प्रा. पी.पी. पाटील यांनी मुख्यमंत्र्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन चर्चा केली होती. 
गेल्या मार्च महिन्यात कवयित्री बहिणाबाई चौधरी अध्ययन व संशोधन केंद्र स्थापन करण्यास उच्च व तंत्र शिक्षण विभाग, महाराष्ट्र शासन तत्त्वतः मंजुरी दिली होती. त्यानुसार आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हे केंद्र स्थापन करण्यास मंजुरी देण्यात आली. 

असे असेल केंद्र 
अध्ययन व संशोधन केंद्राच्या मंजुरीसोबत त्यासाठी दोन प्राध्यापक व प्राध्यापकेतर अशी सहा पदेही मंजूर करण्यात आली आहेत. बहिणाबाईंच्या जीवनाविषयी व त्यांच्या कवितांविषयी माहिती देणारे केंद्र म्हणून कार्य करणे, बहिणाबाईंची माहिती देणारे दृकश्राव्य दालन उभारणे, कवितांवरील लेखांचे संकलन करणे, लेवाबोली- समाज संस्कृती यांच्या अभ्यासास प्रोत्साहन देणे, आदी उद्दिष्ट्ये विद्यापीठाने निर्धारित केली आहेत. केंद्राच्या इमारतीचे बांधकाम, फर्निचर व साहित्य खरेदी याचीही मागणी केलेली असून, या प्रस्तावाला राज्य शासनाने मान्यता दिलेली आहे. 

गेल्यावर्षी मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्‍वासनांपैकी एक आश्‍वासन त्यांनी पूर्ण केले आहे. खानदेशातील बोलीभाषेतील साहित्याचा अभ्यास, त्यावरील संशोधनासाठी हे केंद्र निश्‍चित उपयुक्त ठरेल. 
- दिलीप रामू पाटील (सदस्य, व्यवस्थापन परिषद, कवयित्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठ) 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon kbcnmu resurch center