esakal | भाजपमध्ये येणाऱ्यांना मुख्यमंत्री वॉशिंग पावडरने स्वच्छ करतात : एकनाथराव खडसे
sakal

बोलून बातमी शोधा

भाजपमध्ये येणाऱ्यांना मुख्यमंत्री वॉशिंग पावडरने स्वच्छ करतात : एकनाथराव खडसे

भाजपमध्ये येणाऱ्यांना मुख्यमंत्री वॉशिंग पावडरने स्वच्छ करतात : एकनाथराव खडसे

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

जळगाव : भाजपमध्ये येणारे नेते साधुसंत नाहीत, पक्षाची ध्येयधोरणे मान्य असल्यामुळेच ते येत आहेत. भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या नेत्यांसाठी आमच्या मुख्यमंत्र्यांकडे वॉशिंग पावडर आहे, आम्ही त्यांना स्वच्छ करून घेतो, आलेल्यांना "क्‍लिनचीट' दिली जाते आणि ते आपल्या कामाला लागतात, असे मत राज्याचे माजी मंत्री व भाजप नेते एकनाथराव खडसे यांनी जळगाव येथे एका वृत्तवाहिनीशी बोलताना व्यक्त केले. 
जळगाव येथील एमआयडीसी भागात बालाणी रिसॉर्ट येथे आज भारतीय जनता पक्षाच्या कोअर कमिटीची बैठक घेण्यात आली, तसेच जिल्ह्यातील अकरा मतदारसंघांतील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीही सुरू आहेत. माजी मंत्री खडसे या ठिकाणी उपस्थित होते. एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना ते म्हणाले, की भारतीय जनता पक्षात येणारे कुणीही साधू-संत नाहीत, सत्तेसाठी ते भाजपत येत आहेत. आमच्या मुख्यमंत्र्यांकडे वॉशिंग पावडर आहे. भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या नेत्यांना ते धुवून घेत आहेत. पक्ष वाढविण्यासाठी चांगल्या लोकांना पक्षात घ्यावेच लागते. मात्र, चांगल्याची व्याख्या ठरवताना दुमत होऊ शकते. 
 
राणेंच्या प्रवेशासाठी सेनेला का विचारावे? 
नारायण राणे यांच्या भाजप प्रवेशाबाबत ते म्हणाले, कोणाला कोणत्या पक्षात घ्यायचे हा त्या-त्या पक्षाचा अधिकार आहे. त्यामुळे नारायण राणे यांना भाजपत घ्यायचे असेल तर शिवसेनेला विचारण्याची गरज काय? नारायण राणे भाजपत प्रवेश करणार आहेत की नाही, याची मला माहिती नाही. परंतु, बऱ्याच दिवसांपासून ते प्रवेश करणार असल्याचे मी ऐकतो आहे. त्यांना पक्षात घेण्यासाठी शिवसेनेचा दबाव घेण्याची भाजपने गरज नाही. भाजपत त्यांना घ्यायचे का नाही? हे शिवसेनेला विचारण्याची काहीच गरज नाही. त्यांना घेण्याबाबतचा संपूर्ण अधिकार भाजपचा आहे. ज्या-त्या पक्षाचा तो अधिकार आहे. छगन भुजबळ यांना शिवसेनेत घेण्यात येत असेल त्यांनीही भाजपला विचारण्याची काहीही गरज नाही, तो त्यांचा अधिकार आहे. शेवटी मित्रपक्ष असले तरी काही निर्णय घेण्याचे अधिकार दोघांना स्वतंत्र आहेत आणि ते घेऊ शकतात.

loading image
go to top