खडसेंच्या नाराजीनाट्याचा "क्‍लायमॅक्‍स' कधी..? 

eknath khadse
eknath khadse

विधानसभा निवडणुकीनंतर कुठल्याही संविधानिक पदावर नसले तरी गेल्या दोन महिन्यांपासून जळगाव जिल्ह्यातील राजकारण एकनाथराव खडसेंभोवतीच फिरतेय.. गेल्या संपूर्ण आठवड्यात तर त्यांनी काही भूमिका मांडून अनेकदा प्रसारमाध्यमांना मोठे "खाद्य' दिले.. त्यांची पक्षावरील, विशेषत: राज्यातील नेतृत्वाबद्दलची नाराजी लपून राहिलेली नाही.. यावेळी मात्र ही नाराजी फडणवीस व गिरीश महाजनांची थेट नावे घेऊन व्यक्त झाली.. पण या तीव्र नाराजीनंतर अवघ्या 24 तासांत त्यांचे महाजनांशी मनोमीलन दिसले.. तर त्यापुढच्या 12 तासांत त्यांनी फडणवीसांसोबत एकत्र चहापान केले.. आठवडाभरातील या "अनप्रीडीक्‍टेबल' घटनाक्रमाने खडसेंच्या राजकीय भूमिकेबद्दलचा "सस्पेन्स' अधिकच वाढलांय.. आता या सस्पेन्सच्या "क्‍लायमॅक्‍स'ची प्रतीक्षा कधी संपते, ते पाहावे लागेल.. 

खरेतर आज एकनाथराव खडसे राज्याच्या कुठल्याही संविधानिक पदावर नाहीत. माजी मंत्री, पक्षाचे ज्येष्ठ व राज्यातील सर्वांत अनुभवी नेते म्हणून त्यांची ओळख मात्र कायम आहे. ती त्यांनी स्वकर्तृत्वातून निर्माण केली आहे. असले असले तरी, तीस वर्षांपासून विधिमंडळाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या खडसेंना त्यांच्या पक्षाचे सरकार असूनही सत्तेबाहेर राहावे लागले, आणि यावेळी तर थेट उमेदवारी नाकारण्यात आली.. त्यातून त्यांची उद्विग्नता व पक्षावरील नाराजी गेल्या साडेतीन वर्षांत वेळोवेळी आणि आता विधानसभा निवडणुकीत पक्षाचा "परफॉर्मन्स' समोर येऊन सत्ता गमावल्यानंतर अधिक तीव्रपणे व्यक्त झाली. 

ब्रेकफास्ट डिप्लोमसी'
खडसेंच्या नाराजीनाट्याने गेल्या आठवड्यात शिखर गाठले. त्यांनी याविषयी थेट माजी मुख्यमंत्री फडणवीस व गिरीश महाजनांचे नाव घेत नाराजी व्यक्त केली. या दोघा नेत्यांनी कोअर कमिटीत आपल्याबद्दल नाराजी व्यक्त केल्यानेच उमेदवारी कापण्यात आल्याचा त्यांचा दावा होता. त्यातून खडसे-फडणवीस- महाजनांमधील शीतवादाचा भडका आणखी उडेल, अशी शक्‍यता निर्माण झाली. मात्र, या शीतवादाचा भडका उडण्याआधीच हा वाद संपुष्टात आल्याचे "आभासी' चित्र समोर आले आहे. खडसेंच्या आरोपानंतर अवघ्या 24 तासांत खडसे- महाजनांचे पक्षाच्या बैठकीतील एकाच टेबलावरील खळखळून हसणारे चित्र समोर आले.. त्याच्या 12 तासांतच खडसे- फडणवीस व महाजन यांच्यातील "ब्रेकफास्ट डिप्लोमसी'ची दृष्ये राजकीय वर्तुळाने पाहिली.. 

भूमिकेचा "यू टर्न' घेतला का? 
या दोन्ही दृष्यांमधून अनेक प्रश्‍न व शक्‍यता निर्माण झाल्या आहेत. आणि त्या शक्‍यतांमधूनच अनेक राजकीय तर्कही लढविले जात आहेत. आठवडाभरापूर्वीच खडसेंच्या पक्षांतराची व त्यांना मंत्रिपद मिळण्याच्या चर्चेचे काय झाले? नव्या सरकारमध्ये "वजनदार' मंत्रिपदासह खडसेंच्या अन्य मागण्या पूर्ण करण्यास संबंधित पक्षांनी असमर्थता दर्शवली का? खडसेंनी पक्ष नेतृत्वाकडे ज्या तक्रारी केल्या त्यांची दखल घेत नेतृत्वाने खडसेंचे समाधान केले का? फडणवीस- महाजनांवरील आरोपानंतर खडसेंना नेतृत्वाचा काही "मेसेज' आला का? आणि त्यातून त्यांनी एकूणच त्यांच्या भूमिकेचा "यू टर्न' घेतला का? असे अनेक तर्क लढविले जात आहेत. खडसेंच्या भूमिकेचा हा सर्व "सस्पेन्स' कधी संपतो, याचे उत्तर काळाच्या उदरातच शोधावे लागणार आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com