सकाळ संवाद ः देश भाजपच्याच हाती सुरक्षित : खडसे

शिवाजी जाधव
रविवार, 21 एप्रिल 2019

कॉंग्रेसने देशात साठ वर्षे सत्ता उपभोगली. पण, देशातील पायाभूत सुविधांसह सर्वच प्रश्‍न कायम होते. ते प्रश्‍न मार्गी लावण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाच वर्षांतील कार्यकाळात चालना मिळाली. रस्ते, वीज, पाणी, तरुणांमधील कौशल्य विकास या कामांना गती आली आहे. शिवाय आंतरराष्ट्रीय पातळीवर मोदी यांच्या नेतृत्वामुळेच आज भारत कणखर देश म्हणून समोर आला आहे. चीन असो की पाकिस्तान हे नेहमी भारतासाठी डोकेदुखी ठरले होते. त्यांना वठणीवर आणून देशाच्या सीमा सुरक्षित करण्याचे काम आमच्या सरकारने केले आहे.

कॉंग्रेसने देशात साठ वर्षे सत्ता उपभोगली. पण, देशातील पायाभूत सुविधांसह सर्वच प्रश्‍न कायम होते. ते प्रश्‍न मार्गी लावण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाच वर्षांतील कार्यकाळात चालना मिळाली. रस्ते, वीज, पाणी, तरुणांमधील कौशल्य विकास या कामांना गती आली आहे. शिवाय आंतरराष्ट्रीय पातळीवर मोदी यांच्या नेतृत्वामुळेच आज भारत कणखर देश म्हणून समोर आला आहे. चीन असो की पाकिस्तान हे नेहमी भारतासाठी डोकेदुखी ठरले होते. त्यांना वठणीवर आणून देशाच्या सीमा सुरक्षित करण्याचे काम आमच्या सरकारने केले आहे. देश भाजपच्या हाती सुरक्षित राहील, याची भारतवासीयांना खात्री झाली आहे, असा दावा भाजपचे ज्येष्ठ नेते तथा माजी महसूलमंत्री आमदार एकनाथराव खडसे यांनी केला. 

प्रश्‍न ः आपल्या स्नुषा खासदार रक्षा खडसे यांच्या कामगिरीचे मूल्यमापन कसे कराल? 
आमदार खडसे ः खासदार रक्षा खडसे या माझ्या स्नुषा जरूर आहेत. पण, त्यांचे मूल्यमापन आपण खासदार म्हणूनच तटस्थपणे केले पाहिजे. खरं तर रक्षाताई यांची पहिलीच टर्म असतानादेखील त्यांनी मुरलेल्या, मुरब्बी आणि दूरदर्शी खासदाराप्रमाणे पाच वर्षे काम केले आहे. आपल्या भागातील रेल्वेचे प्रश्‍न असोत, ऑर्डनन्स फॅक्‍टरीतील ऍप्रेंटिसशीप करणाऱ्या उमेदवारांचा प्रश्‍न असो, "मेगा रिर्चाज' प्रकल्प असो, त्यांनी केंद्रात पाठपुरावा करून हे विषय मार्गी लावले आहे. लोकसभा मतदारसंघ हा तुलनेने मोठा असतो. त्यामुळे अनेक खासदारांचा मतदारांशी संपर्कही राहत नाही. पण, रक्षाताई याला अपवाद ठरल्या. त्यांनी मतदारसंघातील साडेचौदाशेवर गावांपैकी 97 टक्के गावांना भेटी दिल्या. आपल्या विकासनिधीतून अनेक गावांना त्यांनी सुविधा देण्याचा प्रयत्न केला, हे कोण विसरू शकेल. त्यामुळे त्या मतदारांचा विश्‍वास टिकवून आहेत, हे मतदानातूनही दिसणारच आहे. 

प्रश्‍न ः या निवडणुकीकडे आपण कसे पाहता? 
आमदार खडसे ः ही निवडणूक देशाचे भवितव्य ठरविणारी आहे. सन 1984 नंतर पहिल्यांदा बहुमतातील स्थिर सरकार भाजप व मित्रपक्षांनी 2014 मध्ये दिले. त्याची फलश्रुती जनतेने अनुभवली आहे. गेल्या साठ-पासस्ट वर्षांत जी दिशा देशाला मिळाली नाही, ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे. दुसरीकडे सत्तालोलुप विरोधकांनी मोदींविरोधात कोल्हेकुई उठविली आहे. पण, जनतेचा त्यांना प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे विस्तारणारा भाजप आणि विस्कळित दिशाहीन, भरकटलेले विरोधक या दोघांमध्ये हा सामना आहे. अर्थात जनता भाजपच्या हाती स्थिर आणि मजबूत सरकार पुन्हा देईल, असे चित्र आम्हाला दिसत आहे. 

प्रश्‍न ः आपल्या सरकारवर जनता समाधानी आहे, असे तुम्हाला का वाटते? 
आमदार खडसे ः का वाटू नये? पाच वर्षांतील सरकारची कामे, पायाभूत सुविधांचा विकास, तरुणांमधील कौशल्यविकास, धोरणे, पारदर्शकता, आंतरराष्ट्रीय प्रतिमा या गोष्टी तुम्ही तरी माध्यम म्हणून नाकारू शकता काय? मग जनता कशी नाकारेल? एवढ्या विशालकाय देशात सर्वदूर रस्त्यांच्या रुंदीकरणाची कामे सुरू आहेत. सिंचनासाठी केंद्राने पुढाकार घेऊन शेतकऱ्यांना समृद्ध करण्याच्या दृष्टीने पाऊल उचलत अब्जावधी रुपयांना निधी दिला आहे. तरुणांनी उद्योग सुरू करावेत, म्हणून मुद्रा योजनेचे काम, योजनांचा लाभार्थ्यांना थेट खात्यात लाभ, गरिबांसाठी उज्ज्वला योजना, सर्वसामान्यांच्या आरोग्यासाठीची आयुष्यमान योजना, विजेसाठी सौभाग्य योजना या आधीच्या कोणत्या सरकारने हे आणले होते का? मोजता येणार नाहीत, एवढ्या लाभाच्या योजना मोदी सरकारने दिल्या. म्हणून तर जनता सरकारवर समाधानी आहे. 

प्रश्‍न ः शेतकऱ्यांसाठी केंद्राचा दृष्टिकोन संकुचित असल्याचा आरोप विरोधक करतात, त्याबाबत काय सांगाल? 
आमदार खडसे ः शेतकऱ्यांसाठी सर्वांत महत्त्वाचा आणि जीवनमरणाचा प्रश्‍न होता, शेतमालाला भावाचा. आमच्या सरकारने शेतमालाला दीडपट हमीभाव दिला. फळबाग योजनेला चालना दिली. विमा योजनांचे निकष सुटसुटीत केले. शेतापर्यंत पाणी पोचावे म्हणून निर्माणाधीन सिंचन प्रकल्प मार्गी लावण्यावर भर दिला. मग हे सरकार शेतकऱ्यांबाबत संकुचित कसे म्हणता येईल. उलट यापूर्वीच्या सरकारांचे पाप म्हणून सिंचनाचा प्रश्‍न न सुटल्याने शेतकरी आत्महत्या झाल्या. आता आम्ही सिंचनाला प्राधान्य दिले आहे. मग, हे सरकार शेतकऱ्यांबाबत संकुचित कसे म्हणता येईल. 

प्रश्‍न ः सर्जिकल स्ट्राईकवरूनही विरोधकांकडून टीका होतेय, त्याचे काय? 
आमदार खडसे ः मोदी सरकारने पाकच्या नापाक कारवायांना चोख उत्तर दिले, हे तमाम भारतवासीयांनी पाहिले अन्‌ मोदींच्या भूमिकेचे कौतुकही केले. हे विरोधकांना दिसले नाही काय? किंबहुना मोदींची मजबूत आणि कणखर सरकार देणारा नेता म्हणून प्रतिमा जनतेत निर्माण झाल्याचा पोटशूळ त्यांना उठला आहे. मोदींमुळे पाक आणि चीन दोन्ही देश वरमले आहेत. दहशतवादी तळ आम्ही उद्‌ध्वस्त केल्याने पाक सरकार चळाचळा कापू लागले आहे. त्याचा देशवासीयांनाही सार्थ अभिमान आहे. पाच वर्षे देश मोदींच्या हातीच सुरक्षित होता आणि यापुढेही देश मोदींच्या हातीच सुरक्षित राहील, अशी जनतेची भावना आहे. आता जनताच कॉंग्रेस आणि त्यांच्या अभद्र आघाडीवर मतदानातून सर्जिकल स्ट्राईक करेल, हे वेगळे सांगण्याची गरजच नाही. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon khadse sakal sanwad