esakal | घटक नसलो तरी माझ्या सरकारचा अभिमानच! : खडसे 
sakal

बोलून बातमी शोधा

घटक नसलो तरी माझ्या सरकारचा अभिमानच! : खडसे 

घटक नसलो तरी माझ्या सरकारचा अभिमानच! : खडसे 

sakal_logo
By
सचिन जोशी

जळगाव : गेल्या चाळीस वर्षांपासून पक्षाचा कार्यकर्ता म्हणून प्रामाणिकपणे काम केले. कोणत्याही पदाची अपेक्षा नव्हती, पण.. पक्ष सत्तेत यावा हे त्यावेळचे स्वप्न होते, ते साकार झाले याचे समाधान आहे. केंद्रात व राज्य सरकारमध्ये मी मंत्री म्हणून घटक नसलो तरी माझ्या पक्षाचे सरकार असल्याचा मला अभिमानच आहे. राज्यात येणारे सरकारही भाजपचेच असेल, असा विश्‍वास व्यक्त करत यावेळीही पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारू, अशी भूमिका ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी व्यक्त केली. 
सोमवारी (ता.2) खडसेंचा वाढदिवस, त्यानिमित्त "सकाळ'ने त्यांच्याशी बातचीत केली असता नेहमीप्रमाणे त्यांनी मनमोकळेपणाने व रोखठोकपणे आपले विचार मांडले. प्रदेश भाजपतील सर्वांत ज्येष्ठ, पहिल्या फळीतील नेते म्हणून खडसेंचा लौकिक आहे. मात्र, सद्य:स्थितीत ते काहीसे बाजूला पडल्याचे चित्र दिसते. गेल्या निवडणुकीतील त्यांचे नेतृत्व, मंत्रिपदाचा अल्प प्रवास, पक्षातून डावलल्याची भावना, येणाऱ्या विधानसभा निवडणुकीनंतरची स्थिती या विषयांबाबत त्यांची भूमिका, त्यांच्याच शब्दांत... 

प्रश्‍न : राज्यात सरकार असूनही आपण त्यातले घटक नाही, काय वाटते? 
खडसे : चाळीस वर्षांपासून पक्षाची सेवा करतोय. कुठल्या पदाची अपेक्षा केली नाही. प्रतिकूल स्थितीत संघर्ष करून लोकं जोडली, पक्ष तळागाळापर्यंत पोचविण्यासाठी तत्कालीन नेत्यांच्या बरोबरीने प्रयत्न केले. केंद्रात व राज्य सरकारमधील घटक नसलो तरी माझ्या पक्षाचे सरकार आहे, याचा अभिमानच आहे. 

प्रश्‍न : मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर पक्षात आपल्याला डावलले जातेय का? 
खडसे : काहींनी षडयंत्र रचून खोटे आरोप केले, त्यावेळी मीच स्वत: मंत्रिपद सोडले. नंतर पुन्हा मंत्रिमंडळात समावेश होऊ शकला नसला तरी पक्षाच्या कोअर कमिटीत मी आहे, राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्यही आहे. महत्त्वाच्या निर्णय प्रक्रियेत मी असतो, मुख्यमंत्री माझा शब्द टाळत नाही. त्यामुळे पक्षात डावलले जातेय, असे नाही. 

प्रश्‍न : पण मंत्रिपदाचा फरक पडतोच ना? 
खडसे : होय, नक्कीच. आज मुख्यमंत्र्यांकडेही मी कुठल्या कामाची विनंती केली तर ते ती मान्य करतातच. मात्र, मंत्री असतो तर या जिल्ह्यात, खानदेशातील विकासात अधिक योगदान देऊ शकलो असतो. सरकारच्या या टर्ममध्ये पहिल्या दीड वर्षातच खानदेशात अनेक प्रकल्प आणण्याचे नियोजन केले होते. मंत्री असतो तर त्या प्रकल्पांचे काम सुरू झाले असते, काही तर पूर्णत्वासही नेले असते. ते दुर्दैवाने होऊ शकले नाही, याची खंत आहेच. 

प्रश्‍न : आगामी विधानसभा निवडणुकीत आपली काय भूमिका असेल? 
खडसे : पक्षाचे काम करणार. पक्ष देईल, ती जबाबदारी आपण स्वीकारू. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जनतेचा विश्‍वास आहे, त्यामुळे राज्यात पुन्हा भाजपचे सरकार येईल, असा विश्‍वास वाटतो. 

प्रश्‍न : मुक्ताईनगरातून रोहिणीताई इच्छुक उमेदवार आहेत? 
खडसे : रोहिणीताईच्या उमेदवारीचा कोणताही विषय नाही. आपणच या मतदारसंघातून पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे, ती मला मिळेल, असा विश्‍वास आहे. 
 
पक्षाने सांगितले तर केंद्रातही जाणार! 
राज्यातच राहणार की केंद्रात जाणार? या प्रश्‍नावर बोलताना खडसे म्हणाले, राज्यात पुढील सरकारही भाजपचेच असेल. मात्र, मघाशी म्हटल्याप्रमाणे आपण कुठल्याही पदासाठी पक्षाचे काम करीत नाही. मंत्रिपद माझ्यासाठी आता गौण आहे. पक्षाने राज्यात जबाबदारी दिली तर ती स्वीकारू. पक्षश्रेष्ठींना मला केंद्रात न्यावेसे वाटले तर तो आदेशही आपण नम्रपणे स्वीकारू. मात्र, गेल्या तीस वर्षांपासून विधिमंडळाचा सदस्य असल्याने, राज्याचा सखोल अभ्यास झालांय.. त्याआधारे राज्यात आपण अधिक चांगले काम करू शकतो, असेही ते म्हणाले. 
 

loading image
go to top