... हे तर चंद्रकांतदादांचे अज्ञानच 

शिवाजी जाधव
गुरुवार, 14 मे 2020

सत्तेतून बाहेर करणारा भाजप जोपर्यंत सत्तेत होता, तोपर्यंत त्यांचे नेते खडसेंच्या वक्तव्यावर साधी प्रतिक्रियाही देत नव्हते. याचे कारण खडसे यांची लोकप्रियता आणि त्यांनी खाल्लेल्या खस्ता हेच होते.

जळगाव : विधानसभेनंतर विधानपरिषदेचीही उमेदवारी नाकारली गेल्यानंतर भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे हे प्रचंड संतप्त झाले आणि ते साहजिकच होते. पण, त्यांचे अजून खच्चीकरण करण्यासाठी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी जी मुक्ताफळे दूरचित्रवाणी वाहिन्यांवर उधळली, त्यातून त्यांचे राजकीय अज्ञानच समोर आले, हे त्यांनी स्वतःच सिद्ध करून दाखविले आहे. 

श्री. खडसे हे मंत्रिपदावरून पायउतार झाल्यानंतर पक्षाबद्दल खेद आणि संताप व्यक्त करतात, तो त्यांच्या योगदानाच्या आधारेच. त्यांना सत्तेतून बाहेर करणारा भाजप जोपर्यंत सत्तेत होता, तोपर्यंत त्यांचे नेते खडसेंच्या वक्तव्यावर साधी प्रतिक्रियाही देत नव्हते. याचे कारण खडसे यांची लोकप्रियता आणि त्यांनी खाल्लेल्या खस्ता हेच होते. पण, आता सत्तेबाहेर असल्याने या नेत्यांना खडसेंचे वक्तव्य हे शल्य वाटू लागले आहे. म्हणून पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांना पुढे करून खडसेंना राजकीय स्पर्धक मानणारे त्यांचे पठ्ठे असलेले नेतेच त्यांच्या संपूर्ण खच्चीकरणाची संधी साधत आहेत, हेच खरे आहे. 

सन 2014 च्या निवडणुकीपर्यंत महाराष्ट्राला नावही माहीत नसलेले आताचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी खडसेंच्या संतापावर अज्ञानी आणि खेदजनक वक्तव्ये केली आहेत. काय तर म्हणे खडसेंना पक्षाने काय नाही दिले? पत्नीला महानंदचे अध्यक्षपद, कन्या रोहिणी यांना जिल्हा बॅंकेचे चेअरमनपद दिले. हे चंद्रकांत पाटलांच्या कोणत्या राजकीय अभ्यासात बसते, हेच समजणे अवघड आहे. कारण, या दोन्ही संस्था सहकारी आणि पक्षविरहित संस्था आहेत. या दोन्ही संस्थांमध्ये विविध पक्षांचे लोक संचालक पदावर आहेत. त्यांनी एकमताने मंदाताई खडसे आणि कन्या रोहिणी यांच्या नेतृत्वाला संमती दिली. त्यात भाजपचा काय वाटा आहे? की या दोन्ही संस्था भाजपच्या पक्षीय मालमत्ता आहेत, की पक्षीय पातळीवर लढल्या गेलेल्या निवडणुकांतून त्यांना ही पदे मिळाली आहे? तरीही पक्षाने ही पदे खडसेंच्या घरात दिली, असे म्हणणे हे त्यांचे अज्ञान नाही, तर दुसरे काय आहे? 

सुनेला खासदारकी 
श्री. खडसे यांच्या स्नुषा रक्षा खडसे यांना 2014च्या निवडणुकीत हरिभाऊ जावळे यांना वगळून तिकीट दिले, हे खरेच आहे. पण, हरिभाऊंचे नावही खडसे यांनीच जाहीर केले होते, पक्षाने नव्हे. कारण ते पक्ष विजयासाठी खडसेंकडेच मोठ्या आशेने पाहत होता. म्हणूनच स्वजिल्ह्यात पक्षाचा पराभव होऊ नये, याचा अंदाज आल्यानंतर आणि राष्ट्रवादीचे ईश्‍वरलाल जैन यांनी आव्हान दिल्यानंतर त्यांनी स्वतःच्या स्नुषेला तिकीट दिले होते. त्यांना निवडूनही आणले. मग, त्यावेळी एकाच घरात खासदार आणि आमदार नको, अशी भूमिका घेत आता नेते बनलेल्यांनी 2014 च्या विधानसभा निवडणुकीत का घेतली नाही? चार महिन्यांनी झालेल्या विधानसभा निवडणुकीत खडसे हेच राज्याचे नेते होते आणि त्यांनी घेतलेल्या निर्णयांमुळे भाजपला राज्याच्या इतिहासात पहिल्यांदा मुख्यमंत्रिपद मिळाले, हे आता दिल्लीश्‍वरांच्या वरदहस्तामुळे डोके वर काढणारे नेते सोईस्कररीत्या चक्क विसरले. ही त्यांची पक्षनिष्ठा म्हणायची काय? 

शरपंजरी पडलेले भीष्माचार्य 
महाभारतात अजेय असलेले गंगापुत्र भीष्म यांनी राजसिंहासन रक्षणाची प्रतिज्ञा केली होती. पण, अखेर त्यामुळेच त्यांना आपलाच कुरूवंशीय अर्जुनाच्या बाणांनी रणभूमीत शरपंजरी पडावे लागले होते. त्यानंतरही त्यांनी सिंहासन रक्षणाची कास सोडली नव्हती. तशीच गत आज एकनाथराव खडसे यांची झाली आहे. कोणताही शत्रू त्यांना हरवू शकत नसताना त्यांच्याच पक्षातील लोकांच्या चहाळी आणि विद्वेषी राजकारणाच्या बाणांनी त्यांना शरपंजरी टाकले, हेच त्यांचे दुर्दैव आहे. पण, असे बाण मारून अवहेलना करणारे खडसेंपेक्षा पक्षालाच खच्ची करायला निघाले आहेत, याचे भान त्यांना आगामी काळात तरी येईल का, हाच खरा प्रश्‍न आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon khadse statement mahananda sanstha chandrakant patil