जळगावात हायप्रोफाइल कॉलनीत कुंटणखाना

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 22 एप्रिल 2020

एका अपार्टमेंटमध्ये सुरू असलेल्या हायप्रोफाइल कुंटणखान्यावर आज पोलिसांनी छापा टाकला. अवघ्या वीस दिवसांपूर्वीच फ्लॅट भाड्याने घेऊन कुंटणखाना चालवणाऱ्या मालकिणीसह दोन दलालांना पोलिसांनी रंगेहाथ अटक केली.

जळगाव : लॉकडाउन झुगारून शहरातील गंधर्व कॉलनीतील एका अपार्टमेंटमध्ये सुरू असलेल्या हायप्रोफाइल कुंटणखान्यावर आज पोलिसांनी छापा टाकला. अवघ्या वीस दिवसांपूर्वीच फ्लॅट भाड्याने घेऊन कुंटणखाना चालवणाऱ्या मालकिणीसह दोन दलालांना पोलिसांनी रंगेहाथ अटक केली. महिला-मुलींना आणण्यासाठी वापरात असलेली महागडी व्हर्ना कारही पोलिसांनी जप्त केली असून, जिल्हापेठ पोलिसांत या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. 

शहरातील गंधर्व कॉलनीत हायप्रोफाइल कुंटणखाना चालू असल्याची गुप्त माहिती सहाय्यक पोलिस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांना प्राप्त झाली होती. त्यानुसार गुन्हे शाखेचे निरीक्षक बापू रोहम यांच्यासह उपनिरीक्षक नीता कायटे, रवींद्र गिरासे, अशोक महाजन, दिनेश बडगुजर, रवींद्र घुगे, सुनील पाटील, वैशाली महाजन, मनीषा पाटील, पल्लवी मोरे, छाया मराठे, दर्शन ढाकणे यांच्या पथकाने दुपारी साडेचारच्या सुमारास गंधर्व कॉलनी भागात साध्या वेशात सापळा रचला. बनावट ग्राहक पाठविल्यावर "त्या' अपार्टमेंटमधील पहिल्या मजल्यावर (ब्लॉक नं. डी-3) मध्ये कुंटणखाना मालकीण पूजा आत्माराम जाधव (वय 25) हिच्यासह दलाल कमलेश केशरसिंग सिसोदिया (वय 20), प्रवीण सीताराम आहेर (वय 30) यांच्यासह वीस वर्षीय पीडित असे लोक आढळून आले. पोलिसांनी पाठवलेल्या बनावट ग्राहकाकडे दिलेल्या रकमेतील पैसे मालकिणीच्या ताब्यातून पोलिसांनी जप्त केले असून, उपनिरीक्षक नीता कायटे यांच्या तक्रारीवरून जिल्हापेठ पोलिसांत गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. 

दोन वर्षांपूर्वीही कारवाई 
कुंटणखाना मालकीण व तिच्या दोन दलालांवर दोन वर्षांपूर्वी कोल्हेनगरातील फ्लॅटवर छापा टाकून पोलिसांनी कारवाई केली होती. या गुन्ह्यातून जामीन झाल्यानंतर पुन्हा त्यांनी वेगवेगळ्या पत्त्यावर कुंटणखान्याचा व्यवसाय सुरू केला होता. पोलिसांनी घरमालकाला या प्रकरणी कळवले असून, त्याचाही जाबजबाब घेतला जाणार आहे. 

आलिशान कारचा वापर 
पोलिसांच्या पंटरचे बोलणे झाल्यावर त्याला होकार देताच, तो फ्लॅटमध्ये शिरला. त्याला बसायला सांगून काही वेळातच ह्युडांई व्हर्ना (एमएच 18डब्लू 222) या कारमधून एक तरुणी उतरून संशयित फ्लॅट मध्ये शिरली. पाळतीवर असलेल्या पोलिसांना सिग्नल मिळताच त्यांनी छापा टाकून आतील तरुणीसह कुंटणखाना मालकीण व दोन दलालांना ताब्यात घेतले. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon Kite room in a hyprofile colony