लाचखोरीचे बदलले स्वरूप, महसूल दोन कदम आगे...पहा कसे

रईस शेख
गुरुवार, 16 जानेवारी 2020

जळगाव : लाचखोरीत पोलिस आणि महसूल खात्यात जणू स्पर्धाच सुरू असते. गेल्यावर्षी जिल्ह्यातील लाचखोरींच्या प्रकरणांमध्ये महसूल व पोलिस विभाग 5-5 ने बरोबरीला होते. मागील वर्षाचे रेकॉर्ड मोडीत काढून यंदा महसूल विभागाने "दो कदम आगे' आहे. वीज मंडळ आपल्या त्याच पायरीवर कायम असून, लाचखोरांना कुठलाही फरक मात्र पडलेला नाही. नेहमीच "चिरीमिरी' मागणारेच छोटे मासे गोत्यात येतात. मात्र, मोठे "मासे' कारवाईपासून अलिप्तच राहतात, असे चित्र दिसते. अलीकडे तर लाचखोरीचे स्वरूपही बदलले असून, रोकडऐवजी चीजवस्तू मागितल्या जात असल्याचेही प्रकार पुढे आले आहेत. 

हेही पहा - ऊस कापताना अचानक ते समोर आले अन्‌ मजुर घामाघुम

शासकीय कामे करताना लोकसेवकांकडून जनसामान्यांची अडवणूक करून लाचेची मागणी करण्यात येते. सर्वच शासकीय कार्यालयांत लाच दिल्याशिवाय कामे होत नाही. त्यात महसूल विभाग आघाडीवर असून, पोलिस दल त्यांच्या पाठोपाठ "कदमताल' करताना आढळून येतो. महसूल, शिक्षण, जिल्हापरिषद आणि नगरपालिका कार्यालयांची अवस्थाही वेगळी नसून लाच दिल्याशिवाय कुठलीच कामे होत नसल्याचा जनसामान्यांचा अनुभव आहे. सरकारी नोकरांना कामासाठी लाच देण्यात गैर नसून ही परंपराच आहे, अशी विचित्र धारणा जनसामान्यांची झाली असल्याने लाचखोरांचे बऱ्यापैकी फावते. साध्या-साध्या कामांसाठी जनसामान्यांची पिळवणूक करण्यात येते. 

लाचेचे स्वरूप बदलले 
लाचखोरीत आता कमालीचा बदल झालेला आहे, पाच-पन्नास रुपयांची खुशाली घेणारा सरकारी नोकर आता जनसामान्यांची अडवणूक करू लागला आहे. कधी हातोहात काम करून देण्यासाठी, कधी चुकीचे व न होणारे काम करून आणण्यासाठी लाच दिली जाते. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईचा धाक असल्याने सहसा रोकड न स्वीकारता चीजवस्तू मागून घेणारे अधिकारीही कमी नाहीत. अगदी हातातील सोन्याची अंगठी, चेन, मोबाईलपासून ते टीव्ही, लॅपटॉप आणि बेडरुमला एसी बसवून घेण्यापर्यंतच्या लाचेचे स्वरूप बदलले आहे. महसूल विभागात तर वाळूमाफियांकडून चारचाकी कार, फॉरेन टूर करून घेणारेही अधिकारी कर्मचारी आहेत. 

हप्तेखोरी वाढली! 
लाचलुचपत विभाग सक्रिय असल्याची जाणीव वेळोवेळी करवून देत असल्याने पोलिस, महसूल खात्यात हप्तेखोरीचे प्रमाण वाढले आहे. वाळू, अवैध गौण- खनिजांचे उत्खनन, खडी मशिन, वीटभट्ट्या, रेशन दुकानदार आदींचे ठरलेले हप्ते आहेत. पोलिस खात्यात अवैध धंद्यांसाठी महिन्याच्या ठराविक तारखेला वाळू, अवैध प्रवासी वाहतूक, गुटखा, हातभट्टीची दारू, विदेशी दारुची तस्करी, सट्टा-जुगाराचे अड्डे आदी पारंपरिक ठिकाणांवर महिन्याचे हप्ते बांधलेले आहेत. तारीख आली की घरपोच हप्ता पोस्त केला जातो. 

नेहमीच "द्वारपाल' दोषी 
लाचखोरीच्या या मायाजाळात नेहमीच किरकोळ वसुलीवाला अडकतो. पोलिस खात्यात महिन्याला रग्गड हप्तेवसुली करणारा कधीच लाचलुचपतच्या हाती लागत नाही. लाचखोरांच्या लंकेचा द्वारपालाच्या हातात नेहमीच बेड्या पडतात. मोठे राक्षस मात्र, सुखरूप राहतात. महसूल खात्यातही तसेच असले तरी महसूल खात्यात पिढीजात पैसे घेण्याची प्रथा असल्याने डोळ्यादेखत गैरप्रकार घडत असल्याने वरिष्ठांचाही नाइलाज होतो. 

लाचखोरीची 2018 ची स्थिती 
यशस्वी सापळे : 30 
पोलिस खाते : 5 
महसूल खाते : 5 
महावितरण : 3 

लाचखोरीची 2019 ची स्थिती 
यशस्वी सापळे : 31 
पोलिस खाते : 5 
महसूल विभाग : 7 
महावितरण : 3 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon lcb corruption dimand no cash