esakal | लॉकडाऊन वाढवतोय डोळ्यांचा त्रास...मुलांमध्ये अधिक दुष्परिणाम 
sakal

बोलून बातमी शोधा

eye problem

खरेदीसाठी बाहेर पडतांना डोळ्यांच्या संरक्षणासाठी चांगल्या सनग्लासेसचा उपयोग करा. या गॉगलमुळे अल्ट्रा व्हायोलेट किरण डोळ्यांना इजा पोहजवू शकत नाही. तेव्हा लॉकडाऊनमुळे घरात असल्याने मोबाईल, कॉम्प्युटर, टीव्हीचा अतिवापर टाळा . 

- डॉ. धर्मेंद्र पाटील, नेत्ररोगतज्ञ, जळगाव 

लॉकडाऊन वाढवतोय डोळ्यांचा त्रास...मुलांमध्ये अधिक दुष्परिणाम 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

जळगाव ः कोरोनामुळे गेल्या महिनाभरापासून लॉकडाऊन असल्याने सारीच मंडळी घरातच अडकली आहे. तसेच या काळात जळगाव जिह्यातील तापमानाने चाळीशी पार केली असल्याने घरात देखील उष्णता जाणवत आहे. घरात बसून काय करायचे..हा विचार प्रत्येकाच्या मनात आहे. प्रामुख्या कोरोना संबंधीच्या बातम्यांची माहिती घेण्यासाठी टिव्ही आणि मोबाईल पाहिला जातोय. पण जास्त टिव्ही, मोबाईल पाहिल्यामुळे त्याचे दुष्परिणाम डोळ्यांवर होवू लागले आहेत. 
लॉकडाउनमुळे घरात बसून सुरुवातीला घरात कुटुंबासोबत बैठे खेळ खेळणारे देखील या खेळांचा कंटाळा आल्याने आणि कोरोना संबंधित बातम्या बघण्यासाठी किंवा मनोरंजन म्हणून टेलिव्हिजन, कॉम्प्युटर आणि मोबाईल या उपकरणांचा अतिवापर करीत असल्याचे निदर्शनास येत आहे. काही विद्यार्थ्यांच्या खाजगी शिकवणी ऑनलाइनपद्धतीने सुरू झाल्या आहेत; तसेच बहुतांश मिटिंग देखील वेगवेगळ्या अँपद्वारे सुरू आहेत. त्यामुळे मे हिटचा तडाखा सहन करण्यापूर्वीच एप्रिलएन्ड लाच डोळ्यांचा त्रास वाढल्याचे चित्र शहरात दिसत आहे. या पार्श्वभूमीवर वेळीच नेत्ररोगतज्ञांकडून उपचार करून घेण्यासह काही प्राथमिक उपाय करणे आवश्‍यक आहे असे नेत्ररोगतज्ञ डॉ. धर्मेंद्र पाटील यांनी सांगितले. 

खरेदीची वेळही दुपारची 
लॉकडाऊन चा हा काळ नेमका उन्हाळ्यात आल्याने कामासाठी बाहेर पडणाऱ्यांनी देखील काळजी घेणे गरजेचे आहे. बाजार, दूध आणि किराणा साहित्य खरेदीची वेळ सकाळी अकरा ते संध्याकाळी पाचपर्यंत आहे. नेमकं यावेळी उष्णतेचा कडाका जास्त असतो. या दरम्यान लोक खरेदीसाठी बाहेर पडतांना दिसत आहे. तसेच पोलीस या प्रखर उन्हाच्या तडाख्यात देखील आपली सेवा बजावतांना दिसत आहे. अशा सर्व व्यक्तींना डोळ्यांच्या तक्रारी सुरु झाल्या आहेत. याचे मुख्य कारण म्हणजे अतिनिल किरणांमुळे पारदर्शक पटलास व नेत्रपटलास इजा होते. पारदर्शक पटलास होणाऱ्या इजेस फोटोकेराटिटिस असे म्हणतात. 

काय जाणवतो त्रास 
डोळा दुखणे, डोळा लाल होणे, डोळ्यातुन पाणी येणे अशा समस्या जाणवतात. डोळ्यांना जंतूसंसर्ग होऊ नये; यासाठी नेत्रतज्ञांना दाखविणे गरजेचे असते. तसेच नेत्रपटलास युव्ही लाईटमुळे इजा झाल्यास नजर कमी होण्याचा धोका असतो, तसेच पापण्यांच्या त्वचेसही सनबर्न होऊ शकते, त्यासाठी लॉकडाऊनच्या काळात उगाच बाहेर पडणे टाळावे किंवा घराबाहेर पडतांना मास्क सोबत टोपी, रुमाल, स्कार्फ व सनग्लास वापरावा. लॉकडाऊनच्या काळात घरातील सर्वच सदस्यांचा टी.व्ही., कॉम्प्युटर, मोबाईलचा जास्त वापर होत आहे; तसेच हवेतील उष्मा वाढल्यामुळे डोळ्यांतील अश्रुंची लवकर वाफ होऊन डोळे कोरडे पडण्याची दाट शक्‍यता असल्याने, डोळे कोरडे पडल्यामुळे डोळ्यांची आग होणे, डोळ्यांना टोचणे, खाज येणे, पाणी येणे असा त्रास सुरु होतो, याला कॉम्प्युटर कव्हजन सिंड्रोम असे म्हणतात. अशा वेळी नेत्रतज्ञांचा वेळीच सल्ला घेणे गरजेचे असते. 

कॉम्प्युटरवर काम करणाऱ्यांनी अशी घ्या काळजी 

- नियम 20-20-20 ः दर वीस मिनिटांनी, 20 फुट कॉम्प्युटर स्क्रीनपासून दूर बघणे, 20 वेळा पापण्यांची उघडझाप करणे. 
- स्क्रीन डोळ्यांच्या उंचीच्या खाली 4 ते 5 इंच असावी. 
- कॉम्प्युटर स्क्रीनपासून डोळ्यांचे अंतर 22 ते 28 इंच ठेवावे. 
- सलग दोन तास कामानंतर मिनिटे डोळ्यांना विश्रांती दयावी. 
- रुममधील दिव्यांची व्यवस्था अशी असावी. 

loading image