Video लिखाणासह जुनी गाणी गात फेसबुकला व्हीडीओ! 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 3 मे 2020

धरणगाव येथील मुख्याध्यापक तथा साहित्यिक बी. एन. चौधरी लेखन करत आहेत. शिवाय इतर वेळा इच्छा असतानाही गाणे गाता येत नसल्याने घरात राहून जुनी हिंदी चित्रपटगीते गाऊन त्याचा व्हीडीओ फेसबुकवर अपलोड करण्याचे काम करत आहेत.

जळगाव : "कोरोना'मुळे करण्यात आलेले "लॉकडाउन' म्हणजे मोकळा वेळ आणि घरात बसून राहिल्याशिवाय पर्याय नाही. यामुळे घरात नुसते बसून काय करायचे, हा विचार असतो. पण साहित्यिकांसाठी लिखाणासाठीची एक संधी आहे. या संधीतून धरणगाव येथील मुख्याध्यापक तथा साहित्यिक बी. एन. चौधरी लेखन करत आहेत. शिवाय इतर वेळा इच्छा असतानाही गाणे गाता येत नसल्याने घरात राहून जुनी हिंदी चित्रपटगीते गाऊन त्याचा व्हीडीओ फेसबुकवर अपलोड करण्याचे काम करत आहेत. 

"कोरोना'चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गेल्या चाळीस दिवसांपासून देशात "लॉकडाउन' सुरू आहे. "लॉकडाउन'मुळे कुठे बाहेर जाता येणे शक्‍य नाही. तर साहित्यिकांच्या होणाऱ्या कार्यक्रमांनाही ब्रेक लागल्याने कोणत्याही कार्यक्रमाला जाता येत नाही. यामुळे घरात बसूनच लिखाण करण्यासोबत आपला छंद जोपासण्याचे काम साहित्यिक करत आहेत. परंतु साहित्यिक लिखाण करण्यात अधिक वेळ घालवला जात आहे. फावल्या वेळेत मनात असलली आवड आणि छंद जोपासत आहेत. 

कथांचे पुनर्लेखन 
प्रा. बी. एन. चौधरी हे धरणगाव येथील पी. आर. हायस्कूलमध्ये मुख्याध्यापकपदी कार्यरत आहेत. शिवाय, साहित्य क्षेत्रात लेखनही करतात. सध्या "लॉकडाउन'मध्ये यापूर्वी लेखन केलेल्या आणि दिवाळी अंकांतून प्रकाशित झालेल्या कथांचे पुनर्लेखन करून 35 कथांचे लेखन आतापर्यंत पूर्ण केले आहे. चपराक प्रकाशन, पुणे यांच्याकडून प्रकाशित कथासंग्रहही तयार केला. यासोबतच अक्षर सुधारण्यासाठी अक्षरलेखनाचे ऑनलाइन ट्रेनिंगही त्यांनी या काळात घेतले. पंढरपूर येथील बोरकडे यांच्याकडून हे ऑनलाइन ट्रेनिंग ते घेत आहेत. 

दहा गाण्यांचा व्हीडीओ 
चौधरी यांना लिखाणासह गाणी गाण्याचीही आवड आहे. ही आवड "लॉकडाउन'च्या काळात पूर्ण करण्यात काही वेळ घालवत आहे. जुन्या काळातील हिंदी चित्रपटातील आवडते गाणे रोज साधारण दीड ते दोन तास गात आहेत. यातील चांगल्या गाण्याचा व्हीडीओ तयार करून तो फेसबुकवर अपलोड करत आहेत. आतापर्यंत दहा गाण्यांचे व्हीडीओ तयार करून फेसबुकवर अपलोड केले आहेत. यात कोरोना व्हायरसवरील दीपक भानुशाली यांचे "पीएम मोदीजी का सबसे कहना है...' हे गीत मुली वर्षा व उत्कर्षा यांना सोबत घेऊन गायिले आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon lockdown sahityik choudhary song upload facebook