लॉकडाउनमध्ये डाळ उद्योगाच्या चाकांना हवी गती

dal
dal

जळगाव : डाळ निर्यातीत जिल्हा कधीकाळी अव्वल क्रमांकावर होता. काही वर्षांपूर्वी या जळगाव जिल्ह्यात हा उद्योग समृद्ध होता. जवळपास दोनशे प्रक्रिया उद्योग होते, ते औद्योगिक पिछेहाटीमुळे 80 ते 90 वर आले. मात्र, आता, गेल्या तीन आठवड्यांपासून सुरू असलेल्या लॉकडाउनमुळे डाळ उद्योगाची चाके थांबली. परिणामी निर्यातही थांबली. जवळपास चार आठवडे निर्यात बंद असल्याने 20 कोटींचा फटका या उद्योगांना बसला आहे. डाळींचा जीवनावश्‍यक वस्तूंमध्ये समावेश होत असला, तरी वाहतूक व्यवस्था व कामगार उपलब्ध नसल्याने हा उद्योग ठप्प होता. आता काहीअंशी निर्यात सुरू झाली असली, तरी वाहतुकीची व मजुरांची अडचण कायम आहे. शिवाय, कच्च्या मालाची उपलब्धताही नाही. कारण, वाहतूकच बंद असल्याने कच्चा माल नाही, त्यामुळे प्रक्रिया कशी करणार? या अडचणी दूर केल्यास डाळ उद्योगाची थांबलेली चाके पूर्ण क्षमतेने सुरू होऊ शकतील. 

कच्चा माल येण्याची सोय व्हावी 
प्रेम कोगटा (अध्यक्ष, जळगाव जिल्हा दाल मिल ओनर्स असोसिएशन) ः डाळ उद्योगांसाठी लागणारा कच्चा माल जहाजाद्वारे मुंबईहून येतो. पण, मालवाहतूक पूर्णपणे सुरू न झाल्याने कच्च्या मालाची अडचण आहे. निर्यात मागील चार आठवडे बंद होती. जवळपास वीस कोटींच्या डाळींची निर्यात आपण करू शकलो नाही. आता काही प्रमाणात निर्यात सुरू झाली आहे. कुरिअर सेवा, जहाजाद्वारे निर्यात काही अंशी सुरू झाली. आगामी काळात ती वाढविली जावी. दाल उद्योगात काम करणारे अनेक कामगार होळीच्या सणाला आपापल्या गावी निघून जातात. नंतर परत येऊन ते काम करतात. मात्र, होळीनंतर लॉकडाउन झाल्याने कामगार परत आले नाही. आहे त्या कामगारांमध्ये काम करून घ्यावे लागते. सकाळी उशिरा सुरू करून सायंकाळी लवकर काम संपवावे लागते. कामगारांची अडचण, माल वाहतुकीत अडचण, कच्च्या मालाची अडचणी या मोठ्या समस्या या उद्योगासमोर आहे. 

मालवाहतुकीचीच अडचण 
गोविंद मणियार (सदस्य, जळगाव जिल्हा दाल मिल ओनर्स असोसिएशन) ः डाळ उद्योगात कामगार, मजुरांची कमतरता आहे. जीवनावश्‍यक वस्तूंमध्ये डाळींचा समावेश होत असला तरी मालवाहतूक नाही, मजूर नाही, कामगार नाही आणि कच्चा मालही नाही. मग अशा स्थितीत कुठल्या मालावर प्रक्रिया करणार, कुणाकडून करणार? जळगावकडून माल मुंबईला पाठविला, तर तिकडून मालवाहतूक गाड्यांना परतीची ट्रीप मिळत नाही. यामुळे त्यांना येथूनच जादा भाडे द्यावे लागते. माल चढविण्यास, उतरविण्यास मजुरांची कमतरता भासते आहे. आपल्याकडे मध्य प्रदेशातील मजूर अधिक असतात. मात्र, लॉकडाउन जाहीर होताच ते त्यांच्या गावी गेले, ते परतू शकलेले नाहीत. ही मालवाहतूक पूर्ववत सुरू झाली, तर डाळ मिल पूर्ण क्षमतेने उत्पादन सुरू करू शकतील. 

पूरक उद्योगांना सूट द्यावी 
दिनेश राठी (सदस्य, जळगाव जिल्हा दाल मिल ओनर्स असोसिएशन) ः शासनाने लॉकडाउन केले असले, तरी डाळ उद्योगांना पूरक असे उद्योग टप्प्याटप्प्याने सुरू करायला हवेत. डाळींची निर्यात बंद आहे. सर्वांत मोठा फटका आम्हाला मालवाहतुकीचा आहे. ट्रान्स्पोर्टचालकांना लॉकडाउनमुळे जेवणाची सोय होत नाही. परतीसाठी सामान नसल्याने इकडून जातानाच भाडे दुप्पट द्यावे लागते. कच्च्या मालाचा पुरवठा पुरेसा होत नाही. माल ट्रकमध्ये चढविणे, उतरविण्यास मजूर लवकर मिळत नाही. एकमेकांवर आधारित उद्योगांना काही अंशी सूट दिल्यास डाळ उद्योगांच्या अडचणी दूर होत होतील. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com