
रावेर, यावल या दोन तालुक्यांचे विभागीय कार्यालय सावदा येथे आहे. या दोन्ही तालुक्यांतील २१० गावांना वीजपुरवठ्याचे नियोजन केले जाते. लॉकडाउन काळातही २४ तास वीजपुरवठ्यासाठी आम्ही नियोजन केले आहे. शेतकऱ्यांनाही शेतीसाठी ट्रान्स्फॉर्मर उपलब्ध करून दिले जात आहेत.
- गोरक्षनाथ सपकाळे, कार्यकारी अभियंता
सावदा : राज्यात लॉकडाउनमुळे सर्व आस्थापने बंद ठेवण्यात आली आहेत. मात्र, या काळात वीज वितरण कंपनीकडून ग्राहकांची काळजी घेतली जात आहे. लॉकडाउन काळातही रावेर, यावल या तालुक्यांतील गावांमध्ये, घराघरांत व शेतशिवारात वीजपुरवठा अखंडपणे सुरू आहे. याचे श्रेय ‘महावितरण’चे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या अचूक नियोजनाला जाते.
लॉकडाउन असल्याने वीजग्राहकांची तक्रार दूरध्वनीवरून जरी आली, तरी तिची दखल घेऊन दुरुस्तीचे काम ‘महावितरण’तर्फे तातडीने केले जात आहेत. सकाळपासून रात्री उशिरापर्यंत कर्मचारी हे आपले कर्तव्य बजावत आहेत. शासनाने दिलेल्या आदेशाचे कर्मचारी तंतोतंत पालन करीत आहेत. वीजपुरवठा खंडित होणार नाही यासाठी शहर व ग्रामीण भागावर ‘महावितरण’ची सर्व टीम बारकाईने लक्ष ठेवत आहे. लॉकडाउन काळात लोक घरातच बसून आहेत. त्यामुळे त्यांना कंटाळा येऊ नये म्हणून ते मनोरंजनासाठी ‘टीव्ही‘समोर बसून असतात. यासाठी वीजपुरवठा महत्त्वाचा आहे.
सावदा उपविभागीय कार्यालयांतर्गत तालुक्यातील एकूण ४३ गावे आहेत. एकूण १२ कक्ष कार्यालये, ६ उपकेंद्रातून वीजपुरवठा होतो. दूरध्वनीवरून प्राप्त तक्रारीनुसार अखंडित वीजपुरवठा करण्याचे काम सुरू आहे. ग्राहकांनी आपले वीजबिल ऑनलाइन पद्धतीने भरणा करावे.
- सुहास चौधरी, उपविभागीय अभियंता