वारे लोकसभेचे : जळगावसाठी शिवसेनेची जय्यत तयारी 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 25 ऑगस्ट 2018

जळगावः लोकसभा निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपल्या असताना राजकीय पक्षांमध्ये तयारीने वेग घेतला आहे. केंद्रात व राज्यात सत्ताधारी असलेल्या भारतीय जनता पक्षात 60 टक्के खासदारांना पुन्हा उमेदवारी देण्यात येणार आहे. त्यामुळे काही जण आपल्या मतदारसंघात कामासही लागले आहेत. जळगाव मतदारसंघात मात्र भाजपच्या उमेदवारीबाबत संभ्रम दिसून येत आहे. दुसरीकडे शिवसेनेतर्फे पाचोऱ्याचे माजी आमदार आर. ओ. पाटील यांनी प्रचाराचा धडाका सुरू केला आहे. कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडी होणार असली, तरी त्यांच्या उमेदवारीबाबत अद्याप कोणतेही नाव पुढे आलेले नाही. 

जळगावः लोकसभा निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपल्या असताना राजकीय पक्षांमध्ये तयारीने वेग घेतला आहे. केंद्रात व राज्यात सत्ताधारी असलेल्या भारतीय जनता पक्षात 60 टक्के खासदारांना पुन्हा उमेदवारी देण्यात येणार आहे. त्यामुळे काही जण आपल्या मतदारसंघात कामासही लागले आहेत. जळगाव मतदारसंघात मात्र भाजपच्या उमेदवारीबाबत संभ्रम दिसून येत आहे. दुसरीकडे शिवसेनेतर्फे पाचोऱ्याचे माजी आमदार आर. ओ. पाटील यांनी प्रचाराचा धडाका सुरू केला आहे. कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडी होणार असली, तरी त्यांच्या उमेदवारीबाबत अद्याप कोणतेही नाव पुढे आलेले नाही. 

जळगाव लोकसभा मतदारसंघात जळगाव, जळगाव ग्रामीण, चाळीसगाव, पाचोरा, अमळनेर, एरंडोल-पारोळा हे विधानसभा मतदारसंघ आहेत. सध्याची राजकीय परिस्थिती पाहता या लोकसभा मतदारसंघाची स्थिती संमिश्र आहे. भाजपचे दोन, राष्ट्रवादी कॉंग्रेसचा एक, शिवसेनेचे दोन आणि एक अपक्ष आमदार या मतदारसंघात आहेत. विशेष म्हणजे गेल्यावेळी भाजप-सेनेने युती करून लोकसभा लढविली होती. त्यात भाजपला यश मिळाले होते. परंतु, विधानसभा वेगळी लढविली होती. त्यात भाजप दोन आणि शिवसेनेने दोन जागा मिळवीत भाजपला समान टक्कर दिली. जिल्हा परिषद निवडणुकीतही भाजप-सेनेचा काडीमोड झाला. शिवसेनेला सत्तेपासून बाजूला ठेवत भाजपने कॉंग्रेसचे सहकार्य घेऊन सत्ता स्थापन केली होती. नुकत्याच झालेल्या जळगाव महापालिका निवडणुकीतही भाजप विरुद्ध सेना आमने- सामने लढले त्यात भाजपने सेनेचा धुव्वा उडवीत महापालिकेवर झेंडा फडकविला. त्यामुळे आजच्या परिस्थितीत भाजप आणि शिवसेना जिल्ह्यात एकमेकांचे कट्टर विरोधक आहेत. वरिष्ठ स्तरावरून युती झाली नाही, तर जिल्ह्यात शिवसेना विरुद्ध भाजप असा सामना लोकसभेत असणार आहे. 

भाजपचा घोळ 
महापालिका निवडणुकीतील यशामुळे जिल्ह्यात भाजपची ताकद आणखी वाढली आहे. मात्र, जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीबाबत प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. पक्षाचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांनीच आपल्या नावाची उमेदवारीसाठी घोषणा केल्याने प्रश्‍न निर्माण झाला आहे. पक्षातर्फे विद्यमान खासदार ए. टी. पाटील यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. त्यांना पुन्हा उमेदवारी मिळणार असल्याचे सांगण्यात येत आहे. खासदार पाटील यांची लोकसभेतील कामगिरी चांगली असल्याचे लोकसभेच्या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या अहवालावरून दिसून येत आहे. प्रश्‍न विचारणाऱ्या खासदारांचा अहवाल नुकताच प्रसिद्ध झाला आहे. त्यात ए. टी. पाटील यांची प्रगती 89 टक्के आहे. या शिवाय पाटील यांचा जिल्ह्यात विकासाची कामे केल्याचाही दावा आहे. त्यामुळे त्यांना उमेदवारी मिळण्याची शक्‍यता व्यक्त होत आहे. मात्र, दोन वेळा संधी देवूनही त्यांनी जिल्ह्यात फारशी कामे न केल्याच मतप्रवाह जनतेत आहे. शिवाय भाजपतही यावेळी उमेदवार बदलून देण्याबाबत चर्चा असल्याचे सांगण्यात येत आहे. यातच भाजपचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांनी या मतदारसंघावर दावा सांगितला आहे. मात्र, त्यांनाच असलेल्या अंतर्गत विरोधामुळे पक्ष त्यांना कितपत संधी देणार, याबाबत प्रश्‍नचिन्ह आहे. परिणामी उमेदवारीच्या प्रश्‍नाचे उत्तर अजून तरी भाजप नसल्याचे दिसते. 

कॉंग्रेस, राष्ट्रवादी अंधारातच 
कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस जिल्ह्यात अत्यंत कमकुवत झाला आहे. नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीत दोन्ही पक्षांनी आघाडी करूनही एकही जागा न मिळाल्यामुळे पदाधिकारी व कार्यकर्तेही विचारात आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसने ऍड. रवींद्र पाटील यांच्या खांद्यावर पुन्हा जिल्हाध्यपदाची धुरा सोपविली आहे. पक्षातील अंतर्गत वाद मिटविण्याचेच त्यांच्यापुढे मोठे आव्हान आहे. अशा स्थितीत लोकसभा मतदारसंघाचीही त्यांना तयारी करावी लागणार आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फेही उमेदवारीसाठी अद्याप कोणाचेही नाव दृष्टिक्षेपात नाही. हीच परिस्थिती कॉंग्रेसचीही आहे. त्यांच्यातर्फेही संभाव्य उमेदवाराचेही नाव घेतले जात नाही. त्यामुळे निवडणुकीबाबत सध्यातरी दोन्ही पक्ष अंधारात आहेत. 

युती झाल्यास जळगाव सेनेकडे? 
शिवसेना जळगाव लोकसभा मतदारसंघ स्वतंत्र लढविण्याच्या तयारीत आहे. पक्षातर्फे आर. ओ. पाटील यांना उमेदवारी देण्याचा निर्णय झालेला आहे. त्यामुळे त्यांनी प्रचारही सुरू केल्याचे सांगण्यात येत आहे. शिवसेना लोकसभा निवडणूक लढविण्याच्या जोमात असल्यामुळे भाजप-सेना युती झाली, तरी शिवसेना या मतदारसंघावर आपला हक्क दाखविण्याची शक्‍यता आहे. जिल्ह्यातील दोन मतदारसंघांपैकी जळगाव लोकसभा लढविण्याला शिवसेना प्राधान्य देण्याची शक्‍यता आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon loksabha sena bjp