विरोधी पक्षनेता म्हणून फडणवीसांचे काम चांगले : खडसे 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 7 मार्च 2020

देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेता म्हणून चांगल्या पद्धतीने जबाबदारी सांभाळत असल्याचे सांगत खडसेंनी फडणवीसांच्या कामाचे कौतूक केले.

मुक्‍ताईनगर ः राज्याच्या दोन्ही सभागृहात विरोधीपक्ष म्हणून काम करण्याची जबाबदारी भाजपवर यापूर्वीही आली आहे. खालच्या सभागृहात 5 वर्षे भाजपकडून मी देखील राज्याचा विरोधीपक्ष नेता म्हणून काम केले आहे. त्यावेळी चुकीच्या निर्णयांवर सरकारला धारेवर धरणे. सरकारवर अंकुश ठेवण्याचा प्रयत्न केला. त्याप्रमाणे देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेता म्हणून चांगल्या पद्धतीने जबाबदारी सांभाळत असल्याचे सांगत खडसेंनी फडणवीसांच्या कामाचे कौतूक केले. 

क्‍लिक करा - आईच्या रक्तासाठी मुलाची धावपळ... अन्‌ कर्मचारी अडले कागदपत्रांसाठी

माजी मंत्री एकनाथ खडसे हे शनिवारी मुक्ताईनगरात त्यांच्या निवासस्थानी पत्रकारांशी बोलत होते. राज्य सरकारकडून सादर झालेल्या अर्थसंकल्पावर प्रतिक्रीया देताना खडसे म्हणाले, की राज्य सरकारने सादर केलेला अर्थसंकल्प हा साडेनऊ हजार कोटी रुपये तुटीचा आहे. ही तूट कशी भरून निघेल, याचा कोठेही उल्लेख करण्यात आलेला नाही. पुढे जाऊन ही तूट वाढत जाणारी आहे. कोणत्याही प्रकारचा तुटीचा अर्थसंकल्प राज्याच्या दृष्टीने हिताचा नसतो. 

उत्तर महाराष्ट्रासाठी निराशाजनक अर्थसंकल्प 
अर्थसंकल्पात उत्तर महाराष्ट्राच्या विकासासाठी काहीतरी ठोस पॅकेज जाहीर होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, कोणतेही पॅकेज सरकारने दिले नाही. त्यामुळे हा अर्थसंकल्प उत्तर महाराष्ट्रासाठी निराशाजनक ठरला आहे. उत्तर महाराष्ट्रात आज अनेक रस्त्यांची कामे, सिंचन प्रकल्प, पाणीपुरवठा योजनांची कामे रखडली आहेत. तीर्थक्षेत्र विकासाच्या बाजूने देखील घोषणा नाही. अर्थसंकल्पात त्यासाठी उपाययोजना होण्याची गरज होती. पण सरकारकडून निराशा झाली, असे खडसेंनी यावेळी सांगितले. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon mahavikas aaghadi budget khadse fadnvis