esakal | विद्युत यंत्रणेच्या विस्तारीकरणासाठी शंभर कोटींची कामे 
sakal

बोलून बातमी शोधा

विद्युत यंत्रणेच्या विस्तारीकरणासाठी शंभर कोटींची कामे 

विद्युत यंत्रणेच्या विस्तारीकरणासाठी शंभर कोटींची कामे 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

जळगाव ः "महावितरण'कडून होणाऱ्या वीजपुरवठ्याची यंत्रणा सक्षम आणि विस्तार करण्याच्या दृष्टीने केंद्र शासनामार्फत शहरी भागात एकात्मिक ऊर्जा विकास योजना राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत जळगाव मंडळात 100 कोटी 67 लक्ष निधी मंजूर आहे. या योजनेतून सात नवीन उपकेंद्रांसह रोहित्र क्षमतावृद्धी करण्यासह विविध कामे केली जाणार आहेत. 

"महावितरण'ने ग्रामीण भागात वीज यंत्रणा सक्षम करण्याच्या दृष्टीने पावले उचलली आहेत. शिवाय, आदिवासी भागातील प्रत्येक घरात प्रकाश देण्यासाठी अक्षय ऊर्जा राबविण्यात आली. वीज यंत्रणेचा विस्तार आणि अधिक बळकटीसाठी एकात्मिक ऊर्जा विकास योजना राबविण्यात येत आहे. या योजनेतंर्गत जिल्ह्याकरिता 100 कोटी 67 लक्ष निधी मंजूर आहे. या निधीतून जळगाव जिल्ह्यातील अमळनेर, भडगाव, भुसावळ, चोपडा, चाळीसगाव, धरणगाव, एरंडोल, फैजपूर, जामनेर, जळगाव, पाचोरा, पारोळा, रावेर, सावदा, यावल या शहरात विद्युत यंत्रणेच्या विस्तारीकरण व बळकटीकरणाची कामे सध्या सुरू आहेत. यामध्ये नवीन उपकेंद्रे, उपकेंद्र, रोहित्र क्षमतावृध्दी, उपकेंद्रात अतिरिक्त रोहित्र, वितरण रोहित्र क्षमतावृध्दी, नवीन वितरण रोहित्र उभारणी, उच्च दाब व लघु दाब विद्युत वाहिनी, वीजचोरी व अपघात रोखण्यासाठी एरियल बंच केबल यासारखी कामे हाती घेतली आहेत. 

सावदा, यावलला उपकेंद्र उभारणी 
एकात्मिक ऊर्जा विकास योजनेतंर्गत प्रामुख्याने पाच एमव्हीए क्षमतेचे 7 नवीन उपकेंद्र उभारण्यात येणार आहेत. यापैकी सावदा व यावल ही दोन उपकेंद्रे पूर्ण झाली असून, अमळनेर, भुसावळ, भडगाव, जामनेर, फैजपूर या पाच उपकेंद्र उभारणीचे काम प्रगतिपथावर आहे. याशिवाय सहा उपकेंद्र रोहित्राची क्षमतावृध्दी, 2 उपकेंद्रात अतिरिक्त रोहित्र उभारणी, 245 वितरण रोहित्र क्षमतावृध्दी, 402 नवीन वितरण रोहित्रे उभारणी आणि नवीन 269 कि.मी. उच्चदाब व 198 कि.मी. लघुदाब वाहिनी टाकण्यात येत आहे. त्यापैकी दोन नवीन उपकेंद्रे, सहा उपकेंद्र रोहित्र क्षमतावृध्दी, दोन उपकेंद्रात अतिरिक्त रोहित्र उभारणी, 194 वितरण रोहित्र क्षमतावृध्दी, 257 नवीन वितरण रोहित्र उभारणी, नवीन 88 कि.मी. उच्चदाब व 29 कि.मी. लघुदाब वाहिनी टाकण्याचे काम पूर्ण झाले आहे. तर जळगाव शहरातील मेहरूण, हुडको व व्ही. झोन एमआयडीसी याठिकाणी 33/11 केव्ही उपकेंद्रातील रोहित्रांची क्षमतावृध्दी 5 ते 10 एमव्हीए करण्यात आली आहे. 

वीजचोरी रोखण्यासाठी एरियल बंच केबल 
विद्युत वाहिन्यांवर आकडे टाकून वीज चोरी करण्याचे प्रमाण वाढलेले आहे. ग्रामीण भागासह शहरी भागात देखील वीज चोरी सुरू आहे. हे प्रमाण रोखण्यासाठी "महावितरण'कडून एरियल बंच केबल टाकण्याचे काम करण्यात येत आहे. याकरिता 227 कि.मी. एरियल बंच केबल टाकण्याचे काम मंजूर आहे. यामध्ये आतापर्यंत 115 किमी एरियल बंच केबल टाकण्याचे काम पूर्ण झाले आहेत. उर्वरित कामे प्रगतिपथावर असून लवकरच पूर्ण करण्यात येणार असल्याचे "महावितरण'कडून सांगण्यात आले. 

loading image
go to top