मॅरेथॉनमध्ये महिलांचा वाढता सहभाग( गतवर्षीच्या तुलनेत 415 महिला अधिक

मॅरेथॉनमध्ये महिलांचा वाढता सहभाग( गतवर्षीच्या तुलनेत 415 महिला अधिक

जळगाव ः धावण्याची गती अन्‌ वेळ सांभाळत मॅरेथॉनमध्ये अनेकजण धावतात. मुंबई- पुण्यासारख्या मोठ्या शहरांमध्ये फूल मॅरेथॉनमध्ये पुरुषांच्या बरोबरीने महिलाही धावतात. पण जळगावसाठी मॅरेथॉनचे कल्चर जरा नवीन आहे. मात्र, याची हळूहळू सवय लागली आणि जळगावकर धावू लागले आहेत. मुख्य म्हणजे यात महिला देखील मागे राहिलेल्या नाही. गेल्या वर्षी झालेल्या पहिल्या खानदेश रनच्या तुलनेत यंदा 415 महिला अधिक असल्याचे नोंदणीतून स्पष्ट होत आहे. 
पहाटे उठून मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या महिलांची संख्या बऱ्यापैकी पाहावयास मिळते. परंतु टी- शर्ट व पॅंट घालून धावणाऱ्या महिला नजरेस येत नव्हत्या. ज्या युवती धावायच्या त्या देखील क्रीडा क्षेत्रातीलच. परंतु, जळगाव रनर ग्रुपने जळगावमध्ये खानदेश रनच्या माध्यमातून मॅरेथॉनची संकल्पना आणली आणि एकप्रकारे जळगावकरांना धावण्याची सवयच लावली आहे. यामुळे आता केवळ पुरुषच नाही, तर महिलाही जळगावच्या बाहेर जाऊन मुंबई, लोणावळा, औरंगाबाद, जालना यासारख्या ठिकाणी होणाऱ्या मॅरेथॉन स्पर्धांमध्ये धावू लागल्या आहेत. 
 
रनमध्ये धावणार हजारांवर महिला 
स्पर्धेसाठी यंदा तीन हजार 908 स्पर्धकांची नोंदणी झाली आहे. यापैकी 1 हजार 90 स्पर्धक या महिला आहेत. गेल्या वर्षी झालेल्या खानदेश रनमध्ये 675 महिलांनी सहभाग नोंदविला होता. ही संख्या यंदा 415 ने वाढून 1 हजार 90 वर पोहचली आहे. 


महिलांमध्ये वाढतेय जागृकता 
डॉ. सीमा पाटील (स्त्रीरोग तज्ज्ञ) ः जळगाव रनर ग्रुप जेव्हापासून तयार झाला तेव्हापासून ग्रुपशी जुळले आहे. यातून धावण्याचा सराव सुरू आहे. गेल्या वर्षी झालेल्या खानदेश रनमध्ये दहा किलोमीटर धावले. त्यानंतर मुंबई येथे झालेल्या पिंकेथॉन मॅरेथॉन स्पर्धेतही दहा किलोमीटर धावले होते. या दोन्ही मॅरेथॉनमध्ये दहा किलोमीटर अंतर साधारण 72 मिनिटांत पूर्ण केले. खानदेश रनमध्ये 80 मिनिटांच्या ग्रुपमध्ये पेसर्सची भूमिका बजाविणार आहे. एकूणच महिलांच्या बाबतीत रनिंग किंवा मॅरेथॉनमध्ये धावण्याचे प्रमाण वाढले आहे. आरोग्याच्या दृष्टीने विचार होतोय, याचेच हे द्योतक आहे. 

"रनर ग्रुप'कडून मिळाली प्रेरणा 
विद्या बेंडाळे (कार्यालयीन अधीक्षक, बेंडाळे महिला महाविद्यालय) ः रनर ग्रुपच्या सदस्यांनी ठिकठिकाणी जाऊन पूर्ण केलेल्या मॅरेथॉनबद्दल वर्तमानपत्रात वाचले होते. यातून धावण्याची प्रेरणा मिळाली. यानंतर लागलीच डिसेंबरमध्ये खानदेश रन असल्याची माहिती झाल्यावर लगेच नोंदणी केली आणि दहा किलोमीटर अंतर धावले. यातून धावण्याची आवड निर्माण झाली. यानंतर परभणी, ठाणे, सोलापूर, भुसावळ रन, वणी, लोणावळा मॅरेथॉन धावले. आता औरंगाबाद मॅरेथॉनला जायचे आहे. यात सगळ्यात वेगळा अनुभव देणारी लोणावळा येथील वर्षा मॅरेथॉन होती. कारण, भर पावसात या स्पर्धेत धावायचे असते. अशात दहा किलोमीटर धावून यात प्रथम क्रमांक मिळविला होता. रनर ग्रुपमुळे हे शक्‍य होत आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com