coronavirus : आर्मी' म्हणून डॉक्‍टर लढणार; तुम्हीही साथ द्या! 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 18 मार्च 2020

कोरोना व्हायरसचा होत असलेला फैलाव जळगावमध्येही काहीअंशी होऊ लागला आहे. जळगावात पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले नसले तरी नागरिकांमध्ये एक भीती आहे. परंतु नागरिकांमध्ये आजही याबाबत काळजी घेण्याबाबत दुर्लक्ष केले जाते.

जळगाव : कोरोना व्हायरस संसर्गात भारत दुसऱ्या स्टेजमध्ये असून, "कोरोना'ने घाबरून जाण्याचे कारण नाही. या आजारामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण कमी आहे. देशात कोरोना व्हायरसच्या बाधित रुग्णांचे प्रमाण तसे कमी आहे. तरी देखील व्हायरसचा फैलाव कधी वाढेल, सांगणे कठीण आहे. याचा फैलाव होण्यास सुरवात झाली तर तो आटोक्‍यात येणे कठीण होईल. यामुळे एक डॉक्‍टर म्हणून आम्ही "आर्मी'प्रमाणे लढण्यास सज्ज आहोत; परंतु नागरिकांनीही स्वतःची काळजी स्वतः घेतली तर कोरोनाला सहजपणे दूर ठेवू शकतो. यासाठी शासनाने ठरवून दिलेल्या नियमांचे पालन प्रत्येकाने कठोरपणे करणे गरजेचे असल्याचा सूर "सकाळ संवाद'मध्ये आलेल्या डॉक्‍टरांच्या बोलण्यातून उमटला. 

कोरोना व्हायरसचा होत असलेला फैलाव जळगावमध्येही काहीअंशी होऊ लागला आहे. जळगावात पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले नसले तरी नागरिकांमध्ये एक भीती आहे. परंतु नागरिकांमध्ये आजही याबाबत काळजी घेण्याबाबत दुर्लक्ष केले जाते. शिवाय, आजारासंदर्भात जिल्हा आरोग्य प्रशासनाच्या तयारी संदर्भात "सकाळ' कार्यालयात "डॉक्‍टरांशी संवाद' आयोजित करण्यात आला होता. 

आरोग्य यंत्रणा पूर्णपणे सज्ज 
डॉ. नागोराव चव्हाण (जिल्हा शल्यचिकित्सक) ः जिल्ह्यात आतापर्यंत बारा संशयित म्हणून आढळले असून, त्यापैकी 10 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. यामुळे जिल्ह्यात तरी घाबरण्यासारखी परिस्थिती सध्यातरी निर्माण झालेली नाही. तरी देखील काळजी म्हणून प्रशासनाची यंत्रणा पूर्णपणे सज्ज झालेली आहे. जिल्हा रूग्णालयांतर्गत 25 बेडचा स्वतंत्र कक्ष करण्यात आला आहे. मुळात ज्यांची प्रतिकारशक्‍ती कमी आहे, त्यांना लवकर लागण होण्याची शक्‍यता अधिक आहे. यामुळे घाबरून जाण्याची गरज नाही. 

प्रतिकारशक्‍तीत हवी वाढ 
वैद्य जयंत जहागीरदार ः आयुर्वेदामध्ये व्हायरस ही संकल्पना नाही. तरी देखील साधारण पाच हजार वर्षांपूर्वी "जनपोद्‌धवस' असे आयुर्वेदात म्हटलेले आहे. अर्थात जमीन, हवा, पाणी आणि अन्न यामध्ये दूषितीकरण वाढले किंवा प्रतिकारशक्‍ती कमी झाली की व्हायरस पसरतो. यामुळे आपल्या प्रतिकारशक्‍तीत वाढ करायला हवी. ती वैयक्‍तिक आणि सामाजिकदृष्ट्या वाढवायला हवी. असे केल्यास निश्‍चितच व्हायरस वाढण्यास आळा बसेल. कोणतीही साथ, संसर्ग आला तेव्हाच अशी काळजी घेतली पाहिजे, असे नाही तर ही दीर्घकाळाची प्रक्रिया आहे. 

दिनचर्या- ऋतूचर्येस महत्त्व 
वैद्य सुभाष वडोदकर ः आयुर्वेदाचे बेसिक म्हणजे आरोग्यसंपन्न, आरोग्य टिकवावे आणि जे आजारी आहेत, त्यांना बाहेर काढणे आहे. संस्कृतीच्या दृष्टीने भारत एक आयकॉन देश ओळखला जातो. परंतु आजच्या स्थितीला दिनचर्या व ऋतूचर्या बदलली आहे. आपली दिनचर्या - ऋतूचर्या यांना महत्त्व द्यायला हवे. यामुळे शरीराला कोणत्याही प्रकारचा व्हायरस लागू शकत नाही. आयुर्वेदातील अनेक वनस्पती आहेत ज्या रोजच्या खाण्यातील पदार्थांमध्ये येतात. ज्यामुळे आजार, व्हायरस दूर राहतील. असे नाही केले तर आज कोरोना आला उद्या आणखी कोणता व्हायरस येईल. यामुळे प्रतिकारशक्‍ती वाढवायला हवी. 

प्रशासनाला माहिती द्या 
डॉ. धर्मेंद्र पाटील (सचिव, आयएमए, जळगाव) ः कोरोना व्हायरस हा परदेशातून आलेला आजार आहे. यामुळे सध्या स्थितीला भारत हा दुसऱ्या स्टेजमध्ये आहे. कोरोना व्हायरसच्या दृष्टीने प्रशासनाने उपाययोजना केल्या, त्या योग्य आहेत. पण रूग्णासोबत जे नातेवाईक येतात, त्यांनी येण्याचे टाळायला हवे. बाहेर परदेशातून कोणी आला असेल, त्याची माहिती प्रशासनाला हवी. कुटुंबात देखील हे पाळले जायला हवे. म्हणून कोरोना लवकर आटोक्‍यात येऊ शकेल. खबरदारी आवश्‍यक असून, डॉक्‍टर देखील एक आर्मी म्हणून आता उभी राहून कोरोनाशी लढणार आहे. 

गर्दीत जाणे टाळावे 
डॉ. रितेश पाटील (होमिओपॅथी तज्ज्ञ) ः कोरोना संसर्गाच्या बाबतीत सध्या भारत दुसऱ्या टप्प्यात आहे. संसर्ग तिसऱ्या टप्प्यात गेल्यास अडचणी वाढतील, त्यामुळे कोरोनाला तिसऱ्या टप्प्यात जाण्यापासून रोखण्याचे आव्हान आहे. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपली दिनचर्या योग्य पद्धतीने ठेवणे गरजेचे आहे. हातांची स्वच्छता, तोंडा-नाकावर रुमाल बांधणे आवश्‍यक असून शक्‍यतो गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळलेच पाहिजे. ही सर्व काळजी घेताना प्रत्येकाने स्वत:पासून, स्वत:च्या कुटुंबापासून सुरवात करावी. 

सावधानता बाळगणेच महत्त्वाचे 
डॉ. रवींद्र पाटील (अत्यवस्थ रुग्णसेवा तज्ज्ञ) ः कोरोना व्हायरस हा डिसेंबर अखेरपर्यंत चीनमध्ये आला होता. त्यानंतर आता भारतात दुसऱ्या स्टेजमध्ये असून, याबाबत खबरदारी घेणे आवश्‍यक आहे. कोरोनाला दूर करण्यासाठी प्रशासन काम करत असून, त्यांना सहकार्य करायला हवे. आपल्याकडे याचा फैलाव अधिक होणार यासाठी सावध राहायला हवे. स्वतः काळजी घ्यावी; तसेच एकमेकांशी भेटण्यापेक्षा फोनवरूनच संपर्क करणे उचित ठरेल. प्रत्येक सर्दी- खोकला कोरोना असेल असे नाही; पण काळजी घेणे आवश्‍यक आहे. 

गरोदर महिलांनी काळजी घ्यावी 
डॉ. जयंती चौधरी (स्त्रीरोग तज्ज्ञ) ः महिलांच्या दृष्टीने सांगायचे झाल्यास महिलांनी स्वतःची आणि मुलांची काळजी घेणे गरजेचे आहे. मुलांना घरातच ठेवून त्यांचे मनोरंजन कसे करता येईल? याकडे लक्ष द्यावे. मुख्य म्हणजे गरोदर महिलांची प्रतिकारशक्‍ती कमी असल्याने त्यांना कोणताही आजार लवकर होण्याची दाट शक्‍यता असते. याकरिता गरोदर महिलांनी सकस आहार घ्यायला हवा. सुका मेवा, फळ खाल्ल्यास यातून सकस आहार मिळेल. शिवाय प्रत्येक व्यक्‍तीने बाहेरून आल्यानंतर गरम पाण्याने अंघोळ करायला हवी. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon Medical experts on Corona's background sakal Dialog