आमदार निधी खर्चाबाबत उदासीनताच! 

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 19 March 2020

जिल्ह्यात मार्चअखेरीस निधीचे प्रस्ताव मागविण्यात आले. त्यात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह एका आमदारांनी प्रस्तावच दिलेले नाहीत. इतर आमदारांनी प्रस्ताव दिले आहेत; तेही अत्यंत कमी रकमेचे. एकमेव मुक्ताईनगरचे अपक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांचे सर्वांत जास्त रकमेचे प्रस्ताव आहेत. 

जळगाव : मतदारसंघातील विकासासाठी आमदार निधीत वाढ करावी, अशी मागणी आमदारांची असते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आमदारांना विकासासाठी निधीत वाढ करून तो नुकताच दोन कोटींचा केला आहे. मात्र, निधी खर्चाबाबतच आमदारांची उदासीनता असल्याचे दिसून येत आहे.

पालकमंत्र्यांचाही निधी पडून 
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी 17 कामे सुचविली. त्यासाठी मात्र एकाही कामाचे इस्टिमेट तयार करून पाठविले नाही. यामुळे त्यांच्या कामांना प्रशासकीय मान्यता मिळालेली नाही. चोपडा येथील आमदार लता सोनवणे यांना सहा कामे मंजूर केली. मात्र, एकाचेही इस्टिमेट पाठविले नाही. यामुळे जळगाव ग्रामीण व चोपडा येथील आमदारांनी विकास खर्च करण्याचे खातेही उघडले नाही. नवीन आमदारांमध्ये मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी आठ कामांसाठी 75 लाख 35 हजारांचे इस्टिमेट पाठविले. त्याला प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे. यामुळे ते निधी खर्च करण्यात अव्वल आहेत. मतदारसंघात कामांसाठी आमदार निधी दोन कोटींचा मिळतो. नव्याने निवडून आलेल्या आमदारांना 50 लाखांचा निधी मिळाला. मार्चअखेर असल्याने तो निधी खर्च होणे अपेक्षित आहे. मात्र, अनेकांनी तो खर्च केला नसल्याचे चित्र आहे. 

दोन कोटीचीच सूचविले कामे
जिल्ह्यात नवीन आमदारांना प्रत्येक 50 लाख मार्चअखेरपर्यंत काम करण्यास शासनाने आदेश दिले आहेत. तसे एकूण पाच कोटी 50 लाखांचा निधी विकासकामांना मिळाला आहे. मात्र, अद्याप दोन कोटी 38 लाखांचीच कामे आमदारांनी सुचवून त्यांना प्रशासकीय मान्यता मिळवून घेतली आहे. उर्वरित पाच कोटी 50 लाखांच्या कामांना प्रशासकीय मान्यता येणे बाकी आहे. खुद्द पालकमंत्र्यांनी 17 कामे सुचविली. मात्र, त्या कामाचे इस्टिमेट न आल्याने त्यांच्या एकाही कामास प्रशासकीय मान्यता मिळालेली नाही. तीच स्थिती चोपडा येथील आमदार लता सोनवणे यांनीही एकाही कामाचे इस्टिमेट पाठविलेले नाही.

जुन्या आमदारांकडे अडीच कोटी 
राज्यात महाविकास आघाडीचे शासन येण्यापूर्वी जे आमदार होते, त्यांना दोन कोटींचा निधी मंजूर होता. तो त्यांनी त्यांच्या कालावधीत खर्च केला. जे आमदार नवीन निवडून आले, त्यांना 50 लाखांचा निधी मतदारसंघात कामे करण्यास शासनाने आदेश दिला. जे गत पंचवार्षिकला होते, तेच पुन्हा निवडून आल्याने त्यांच्याकडे एकूण अडीच कोटींचा निधी विकासकामांसाठी आला. 

मतदारसंघनिहाय आमदारांनी सुचविलेली कामे व प्रशासकीय मान्यता 

मतदारसंघ--कामांची किंमत--प्र. मा.. किंमत (रुपये लाखांत) 

चोपडा-आमदार लता सोनवणे--55----0.00 
जामनेर-आमदार गिरीश महाजन--73------16.04 
जळगाव शहर-आमदार सुरेश भोळे--105.30------22.55 
जळगाव ग्रामीण-पालकमंत्री गुलाबराव पाटील--75.99-----0.00 
एरंडोल-पारोळा--आमदार चिमणराव पाटील--97.50------23.27 
अमळनेर--आमदार अनिल पाटील--75.00------29.74 
पाचोरा-भडगाव--आमदार किशोर पाटील--75.00-----2.98 
चाळीसगाव--आमदार मंगेश चव्हाण--73.36------26.77 
भुसावळ-आमदार संजय सावकारे---76.20------1.20 
मुक्ताईनगर- आमदार चंद्रकांत पाटील--81.00------75.35 
रावेर- आमदार शिरीष चौधरी--81.00------40.48 
एकूण-- 8 कोटी 73 लाख------ 2 कोटी 38 लाख 38 हजार 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon MLA fund pending no work process