मोदींच्या "टीम'मध्ये खानदेशच्या मंत्रिपदाची परंपरा खंडित 

कैलास शिंदे
शनिवार, 1 जून 2019

जळगाव: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात यावेळी खानदेशातील धुळ्याचे खासदार माजी संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांची पुन्हा वर्णी लागेल, अशी शक्‍यता होती. मात्र त्यांना डावलण्यात आले आहे. भाजपला चारही खासदार देणाऱ्या खानदेशला यावेळी मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलेले नाही. केंद्रीय मंत्रिमंडळात खानदेशला मंत्रिपद देण्याची परंपरा खंडित झाली असून, आता भविष्यातील मंत्रिमंडळाच्या विस्तारात संधी मिळण्याची प्रतीक्षा आहे. 

केंद्रीय मंत्रिमंडळात खानदेशातील खासदारास संधी मिळतेच, अशी परंपरा आहे. कॉंग्रेसच्या मंत्रिमंडळात खानदेशातील तत्कालीन एरंडोल मतदार संघातील खासदार विजय नवल पाटील यांना 1980 मध्ये पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या मंत्रिमंडळात दूरसंचार विभागाचे मंत्रिपद मिळाले होते. आणीबाणीनंतर देशभरात झालेल्या निवडणुकीत कॉंग्रेसचा पराभव झाला आणि जनता पार्टीचे सरकार स्थापन झाले होते. त्यावेळी याच लोकसभेच्या एरंडोल मतदारसंघातून जनता पक्षातर्फे सोनूसिंग धनसिंग पाटील विजयी झाले होते. त्यावेळी पंतप्रधान मोरारजी देसाई यांच्या मंत्रिमंडळात त्यांना गृहराज्यमंत्रिपद दिले होते. सन 1986 मध्ये कॉंग्रेस सरकारच्या काळात प्रतिभाताई पाटील राज्यसभेच्या उपसभापती होत्या. त्यानंतर सन 1999 मध्ये भाजपचे सरकार सत्तेत आल्यावर अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान झाले. त्यावेळी एरंडोल मतदारसंघातीलच एम. के. पाटील यांना ग्रामीण विकास राज्यमंत्री मंत्रिपद देण्यात आले होते. त्यानंतर 2009 मध्ये पुन्हा कॉंग्रेसचे सरकार आल्यानंतर पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळात नंदुरबार येथील ज्येष्ठ खासदार माणिकराव गावित यांना गृहराज्यमंत्रिपद देण्यात आले होते. तर गेल्यावेळी 2014 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात स्थापन झालेल्या सरकारमध्ये धुळे मतदार संघातील खासदार डॉ. सुभाष भामरे संरक्षण राज्यमंत्रिपद देण्यात आले होते. 

खानदेशवासीयांची अपेक्षा ठरली फोल 
खानदेशात सध्या जळगाव, रावेर, धुळे, नंदुरबार अशी चार लोकसभा मतदार संघ आहेत. या चारही मतदार संघातून भाजपचे खासदार विजयी झाले आहेत. धुळ्याचे डॉ. सुभाष भामरे, नंदुरबारच्या डॉ. हीना गावित आणि रावेरच्या रक्षा खडसे दुसऱ्यांदा विजयी झाल्या आहेत. तर जळगावमधून उन्मेष पाटील प्रथमच लोकसभेवर निवडून आले आहेत. यावेळीही खानदेशला मंत्रिमंडळात स्थान मिळेल, अशी आशा होती. मात्र, ती फोल ठरली आहे. आता मंत्रिमंडळाचा विस्तारात कधी होईल तेव्हा खानदेशचा क्रमांक लागेल अशी अपेक्षा आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon modi khandesh minister