खडसे पुन्हा मैदानात...काय आहे कारण 

सकाळ वृत्तसेवा
Friday, 22 May 2020

पक्षातील ज्येष्ठ नेते असलेले माजी मंत्री एकनाथराव खडसे यांचे तिकिट कापल्यानंतर पक्षातील नेतृत्वावर त्यांची नाराजी होती. या नेतृत्वाच्या विरोधात त्यांनी आवाज देखील उठविला. एकवेळ पक्ष सोडणार असल्याचे चित्र देखील यामुळे निर्माण झाले होते. 

जळगाव : पक्षातील ज्येष्ठ नेते असलेले माजी मंत्री एकनाथराव खडसे यांचे तिकिट कापल्यानंतर पक्षातील नेतृत्वावर त्यांची नाराजी होती. या नेतृत्वाच्या विरोधात त्यांनी आवाज देखील उठविला. एकवेळ पक्ष सोडणार असल्याचे चित्र देखील यामुळे निर्माण झाले होते. मात्र एकनाथराव खडसे हे पुन्हा मैदानात उतरलेले आज पाहण्यास मिळाले. पक्षाच्या "मेरा आंगण, मेरा रणागंण' या आंदोलनात सहभागी होत मुक्ताईनगरातील निवासस्थानी आंदोलनात त्यांनी राज्यातील सरकार विरोधात घोषणा दिल्या. 

भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकार विरोधात आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. "मेरा आंगण, मेरा रणागंण'च्या माध्यमातून राज्यभर आंदोलन करण्यात येत आहे. विधानसभेच्या निवडणूकांमध्ये खडसेंचे तिकिट कापून त्यांच्या मुलीला तिकिट देण्यात आले होते. यानंतर विधानपरिषदेची उमेदवारी देखील त्यांना नाकारण्यात आली होती. यामुळे एकनाथराव खडसे पक्षावर नाराज होते. त्यांनी ही नाराजी उघडपणे व्यक्तही केली होती, त्यामुळे पक्षाने पुकारलेल्या आंदोलनात ते सहभागी होणार कि नाही, याकडे जळगाव जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष होते. 

अन्‌ सरकारविरोधात फलक हाती 
मुक्ताईनगरातील कोथळी येथील निवासस्थानी पक्षावर नाराज एकनाथराव खडसे यांनी आंदोलनात सहभाग घेतला. घरासमोर अंगणात राज्य सरकारच्या विरोधात फलक घेवून ते उभे राहिले. यावेळी खासदार रक्षा खडसेही सोबत होत्या. "उध्दवा अजब तुझे, निष्फळ सरकार, "महाराष्ट्राची जनता मरणाच्या दारात, पण उध्दव मात्र घरात', "कोरोना रोखण्यास असमर्थ ठरलेल्या महाराष्ट्र सरकारचा धिक्कार असो', "कोरोना'चे संकट होतंय गडद, महाराष्ट्र सरकार वाऱ्यावर अशा घोषणाही त्यांनी दिल्या. यावेळी उपस्थित सर्वाच्या हातात फलकही होते. याप्रसंगी तालुकाध्यक्ष रामभाऊ पाटील, नारायण चौधरी, योगेश कोलते, उमेश राणे, संदीप देशमुख, आसिफ बागवान व प्रमुख कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.एकनाथ खडसे यांनी या आंदोलनात सहभाग घेवून आपण पक्षावर टीका करीत असलो तरी पक्षाशी एकनिष्ठ आहोत. हे दाखवून दिले आहे. 

खडसेंना मिळणार पद? 
एकनाथ खडसे यांची पक्षावर असलेली नाराजी दूर करण्यासाठी पक्षातर्फे प्रयत्न सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांना भारतीय जनता पक्षाच्या केंद्रातील टीमध्ये महात्वाचे संघटनात्मक पद देण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या सोबतच्या टीममध्ये ते राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon muktainagar bjp aandolan khadse participet