"मनपा'त पदाची "भाकरी' फिरविली, कामेही व्हावी! 

कैलास शिंदे
गुरुवार, 6 फेब्रुवारी 2020

"शंभर दिवसांत जळगावचा कायापालट करून दाखवितो', असे आश्‍वासन भाजप नेत्यांनी महापालिकेच्या निवडणुकीच्या काळात दिले होते. त्यानंतर जळगावकरांनी कधी नव्हे ते तब्बल 57 नगरसेवकांचे भलेमोठे दान भाजपच्या पदरात टाकले.

जळगाव  : "भाकरी' फिरविली नाही तर करपून जाते, "घोडा' फिरविला नाही तर धावण्याच्या कामाचा राहत नाही. अगदी त्यानुसारच सत्तेतील पदे फिरविली तर कामेही वेगाने होतात, असे म्हटले जाते. जळगाव महापालिकेत भाजपने महापौरपदाच्या सत्तेची भाकरी फिरविली आहे. मात्र, आता शहरातील कामेही तेवढ्याच वेगाने होण्याची अपेक्षा आहे. महामार्गावर तात्पुरत्या कामासाठी डांबरीकरण केले जाते, मग शहरातील रस्त्यावरही तसेच डांबरीकरण केले जावे, जनतेला त्रासापासून मुक्ततेसाठी हा खर्च झाला तरी काय फरक पडणार आहे. 
"शंभर दिवसांत जळगावचा कायापालट करून दाखवितो', असे आश्‍वासन भाजप नेत्यांनी महापालिकेच्या निवडणुकीच्या काळात दिले होते. त्यानंतर जळगावकरांनी कधी नव्हे ते तब्बल 57 नगरसेवकांचे भलेमोठे दान भाजपच्या पदरात टाकले. त्यामुळे तब्बल 30 वर्षानंतर प्रथमच महापालिकेत मोठे सत्तांतर झाले. शहरात विकासाची "अमृत योजना', भुयारी गटारी यांची कामेही सुरू झाली, शिवाजीनगर पूल उभारणीचे काम सुरू झाले. तर पिंप्राळा रेल्वे उड्डाणपुलाचे काम सुरू करण्याच्या दृष्टीने पाऊले उचलण्यात आली. महामार्गावर समांतर रस्त्याचे काम सुरू करण्यात आले. याच सोबत जळगावच्या महापालिकेवरील कर्जमुक्तीचे प्रयत्नही यशस्वी झाले. विकासाची ही कामे करीत असताना जळगाव शहरात मात्र रस्त्याच्या समस्या वाढल्या. त्यामुळे विकासाची कामे सुरू असूनही जळगावकरांमध्ये नाराजीचा सूर आहे. 

आता हवी कामांना गती 
महापालिकेत भाजपने आता पदाच्या सत्तेची भाकरी फिरविली आहे. महापौरपदी भारती सोनवणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचे पती नगरसेवक कैलास सोनवणे हे नगरसेवक आहेत. त्यांना शहरातील समस्यांची माहिती आहे. स्थायी समिती सभापती असताना त्यांनी शहरात स्वत: फिरून स्वच्छता मोहीम राबविली होती. अगदी त्याच पद्धतीने काम करून शहरातील कामांनाही गती देण्याची गरज आहे. 

आधी तात्पुरते डांबरीकरण करा 
शहरात मोठ्या प्रमाणात रस्त्यांची अवस्था खराब झाली आहे. कोणत्याही भागात रस्ते चांगले नाहीत. "अमृत योजना' आणि "भुयारी गटारी'च्या कामाच्या नावाखाली रस्त्यांची डागडुजीही केली जात नाही. त्यामुळे जनतेला विनाकारण त्रास सहन करावा लागत आहे. महामार्गावर समांतर रस्त्याचे काम करताना कच्चा रस्ता असल्याने धूळ उडते म्हणून त्यांना डांबरीकरण करण्यास सांगितले जाते. मात्र, शहरात सर्वच भागात कच्चे रस्ते आहेत. त्या ठिकाणीही तात्पुरते डांबरीकरण करून रस्त्यावरची धूळ कमी करण्यासाठी प्रयत्न का केले जात नाहीत. जरी रस्ते नंतर खोदणार असले तरी त्या ठिकाणी दोन लेअर टाकून तात्पुरते डांबरीकरण ताबडतोब केल्यास जनतेला त्रास होणार नाही. मात्र याबाबत लक्ष दिले जात नाही. त्यामुळे आता महापौरांनी आपल्या अधिकार क्षेत्रात याबाबत तातडीने लक्ष देऊन जर हे तात्पुरते डांबरीकरण करावे व जळगावकरांना धूळ आणि खड्ड्यांपासून तात्पुरते का होईना मुक्त करावे. हा धाडसी निर्णय घेण्याचे सामर्थ्य दाखविण्याची गरज आहे. तरच खऱ्या अर्थाने "भाकरी' फिरल्याची जळगावकरांना जाणीव होईल. नाही तर मग काय कुणीही "सगळे मुसळ केरातच....' 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon muncipal corporation mayer bharti sonawane