"स्थायी'च्या सभेवरून सत्ताधारी-विरोधकांत जुंपली 

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 20 May 2020

शहर "रेड झोन'मध्ये असताना सभा घेण्याचे प्रयोजन काय? सभेचा अट्टाहास का? अशा आशयाचे निवेदन आयुक्तांना देऊन सभा रद्दची मागणी केली आहे. 

जळगाव ः "कोरोना'मुळे देशात चौथा "लॉकडाउन' सुरू झाला असून, तो 31 मेपर्यंत राहणार आहे. त्यात जळगाव शहरात "कोरोना'बाधितांची संख्या दिवसागणिक वाढत असून जिल्हा "रेड झोन'मध्ये आहे. त्यात 22 मेस महापालिकेत स्थायी समितीची सभा आयोजित केल्याने आज विरोधी शिवसेना तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सदस्यांनी ही सभा घेऊ नये, अशी मागणी महापालिका प्रशासनाकडे निवेदनाद्वारे केली. तसेच शिवसेनेने यातील आर्थिक विषयात संबंधितांना टक्केवारी मिळत असल्याचे गंभीर आरोपही केले. 

जळगाव महापालिकेच्या स्थायी समितीची सभा 22 मेस सकाळी अकराला सभापती ऍड. शुचिता हाडा यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केली आहे. सभेत प्रभाग क्र. 7 मध्ये सर्व्हे नंबर 7486 मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान विकसित करण्यासाठी खर्चास मान्यता देण्यासह तीन विषय असणार आहेत. या सभेवर शिवसेना व राष्ट्रवादीने प्रश्‍न उपस्थित केला असून, त्यात शहर "रेड झोन'मध्ये असताना सभा घेण्याचे प्रयोजन काय? सभेचा अट्टाहास का? अशा आशयाचे निवेदन आयुक्तांना देऊन सभा रद्दची मागणी केली आहे. 

सभा रद्द करा, अन्यथा आंदोलन 
शिवसेनेतर्फे "मनपा'तील विरोधी पक्षनेते सुनील महाजन, महानगरप्रमुख शरद तायडे, तर राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे महानगराध्यक्ष अभिषेक पाटील, ऍड. कुणाल पवार, स्वप्नील नेमाडे, गणेश निंबाळकर यांनी आयुक्तांना सभा रद्द करा, या मागणीचे निवेदन दिले. स्थायी समितीची सभा रद्द न झाल्यास आंदोलन छेडले जाईल, असा इशारा निवेदनातून दिला आहे. 

शहरात दिवसेंदिवस "कोरोना' रुग्णांची संख्या वाढत आहे. महापालिका प्रशासन यावर नियंत्रण मिळविण्यासाठी जीव तोडून प्रयत्न करत आहे. परंतु कोणताही महत्त्वाचा विषय नसताना स्थायी समितीची सभा घेण्याचे प्रयोजन काय? यामागे आर्थिक गणित आहे. आमदारांशी याबाबत संवाद साधला असता तेही हतबल झाले. त्यांचेही कोणी आता ऐकत नाही. 
- सुनील महाजन, विरोधी पक्षनेते, मनपा, जळगाव 

"कोरोना' संसर्ग कधी संपेल कोणालाच सांगता येणार नसून केव्हातरी प्रशासन व कामे सुरू करावी लागणार आहेत. "स्थायी'त आर्थिक विषय येत असून शिवसेनेने केलेले आरोप हस्यास्पद आहेत. शिवसेनेचे पालकमंत्री, 
राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे सर्व नियमांचे पालन करून बैठका घेत आहेत. त्याचप्रकारे आम्हीही "कोरोना'संदर्भातील दिलेल्या नियमांप्रमाणे सर्व काळजी घेऊन सभा घेणार आहोत. तसेच राज्यातील इतर "मनपां'तही स्थायी समितीच्या सभा झालेल्या आहेत. 
- ऍड. शुचिता हाडा, सभापती, स्थायी समिती, मनपा 

अन्य महापालिकांमध्येही झाल्या सभा 
"लॉकडाउन'च्या काळात अत्यावश्‍यक सेवा सुरूच ठेवाव्या लागतात. "मनपा'चे पाणीपुरवठा, स्वच्छता, आरोग्य, अग्निशमन विभाग सुरू असून पूर्ण क्षमतेने काम करीत आहेत. त्यामुळे स्थायी समितीची सभा घेण्यास हरकत काय? सदस्य कमी असतात, योग्य ती काळजी घेऊन, फिजिकल डिस्टन्सिंग ठेवून सभा घेता येऊ शकते, अशी भूमिका मांडत ऍड. हाडा यांनी मुंबई, नाशिक, कोल्हापूर व अन्य महापालिकांमध्येही स्थायीची सभा झाली, असा दावा केला. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon In the Municipal Corporation Standing 'meeting was joined by the ruling-opposition